Bihar IT engineer got 2 crore package at google: गूगलसारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करण्याची इच्छा कोणाला नसेल. या कंपनीत नोकरी मिळावी यासाठी लाखो विद्यार्थी कठोर मेहनत, परिश्रम करून अभ्यास करतात. परंतु, सगळ्यांनाच यात यश मिळेल, असं नाही. गूगलची मुलाखतीची प्रक्रिया खूप खडतर असते आणि ती क्रॅक करणं काही सोपं नसतं. परंतु, सध्या चर्चेत असलेल्या बिहारमधील एका तरुणानं हे शक्य करून दाखवलंय.
बिहारमधील जमुई जिल्ह्यातील एका संगणक अभियंत्यानं गूगलच्या लंडन ऑफिसमध्ये ₹ २ कोटींचं पॅकेज मिळवलं आहे. एनआयटी पाटणामधून बी.टेक. पूर्ण केलेला अभिषेक कुमार ऑक्टोबरमध्ये त्याच्या या नव्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे.
अभिषेक कुमारचं स्वप्न
अभिषेक कुमार हा जमुई जिल्ह्यातील जामु खरिया गावात राहतो. त्याचे वडील इंद्रदेव यादव हे जमुई दिवाणी न्यायालयात वकील आहेत आणि आई मंजूदेवी गृहिणी आहेत. अभिषेकच्या घरी शिक्षणाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिलं गेलं आणि हेच त्याच्या यशाचं श्रेय आहे, असं तो अभिमानानं सांगतो.
अलीकडेच NDTVला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकनं, “ही माझी सर्वांत मोठी उपलब्धी आहे आणि मी त्यासाठी खूप उत्साहित आहे,” असं सांगितलं. “Googleसाठी काम करणं हे बऱ्याच सॉफ्टवेअर इंजिनियर्ससाठी एक स्वप्न असतं आणि आता मला गूगलमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानं मी खूप खूश आहे,” असं त्यानं आनंदित होऊन स्पष्ट केलं.
अभिषेक कुमारचं शिक्षण
अभिषेकनं आपलं प्रारंभिक शिक्षण जमुई येथून पूर्ण केलं आणि नंतर एनआयटी पाटणा येथून सॉफ्टवेअर इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केली. २०२२ मध्ये त्यानं Amazon मध्ये नोकरी केली आणि ₹ १.०८ कोटींचं पॅकेज मिळवलं. Amazon मध्ये त्यानं मार्च २०२३ पर्यंत काम केलं. त्यानंतर तो जर्मन गुंतवणूक फर्मच्या विदेशी चलन ट्रेडिंग युनिटमध्ये सामील झाला.
अभिषेकनं गाठलेल्या या यशाचा मार्ग काही सोपा नव्हता. अभिषेकला मुलाखतीची तयारी करताना त्याच्या नोकरीच्या कामांत संतुलन राखावं लागलं. अनेकदा तो आठ-नऊ तास काम करीत असे आणि उर्वरित वेळ Googleच्या मुलाखतीसाठी, तसेच कोडिंग स्किल्स परफेक्ट करण्यासाठी घालवत असे.
अशी केली गुगलच्या मुलाखतीची तयाशी
“मी आधीच दुसऱ्या कंपनीत काम करीत होतो आणि काम करताना मुलाखतीची तयारी करणं हे एक मोठं आव्हान होतं,” असा खुलासा अभिषेकनं केला. “मला माझ्या नोकरीसाठी किमान आठ ते नऊ तास काम करावं लागायचं आणि उरलेल्या वेळेत मी मुलाखतीची तयारी करायचो. मुलाखतीसाठी योग्य धोरण तयार करणं खूप महत्त्वाचं होतं आणि त्या धोरणामध्ये सातत्य राखणंही महत्त्वाचं होतं. माझ्याकडे जो काही वेळ होता, तो मी कोडिंग आणि मुलाखतीच्या प्रश्नांची तयारी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वापरला आणि त्यामुळे मला सर्व मुलाखती पार करण्याच्या दृष्टीनं मदत झाली.”
अभिषेकच्या या जिद्दीमुळे त्याला Googleची मुलाखत पार करण्यास मदत झाली. वैयक्तिक आव्हानांवर मात करण्याबाबतही त्यानं भाष्य केलं. “जरी मी लहान शहरातून आलो असलो तरी माझी मुळं एका गावात आहेत आणि त्या गावातलं माझं घर मातीचं आहे. आता योग्य संसाधनं मिळाल्यानंतर मी नवीन घर बांधणार आहे.”
अभिषेकचा खास संदेश
अभिषेकनं या यशासाठी खूप कष्ट घेतले होते. त्यामुळे त्याचा प्रेक्षकांसाठी एक खास संदेश होता : “सर्व काही शक्य आहे. माझा ठाम विश्वास आहे की, कोणतीही व्यक्ती यश मिळवू शकते. मग ती कुठेही राहत असो, एखाद्या लहान गावात असो किंवा मोठ्या शहरात. जर त्या व्यक्तीची मेहनत करायची तयारी असेल, तर ती सर्वांत मोठ-मोठ्या संधी मिळवू शकते.”
अभिषेकची आई अनेकदा आरोग्याच्या समस्यांमुळे त्रस्त होती आणि त्यामुळे त्याच्या कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. हे सर्व अभिषेकनं पाहिलं असल्यामुळेच त्यानं आपल्या पालकांना चांगलं जीवनमान देण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचं ठरवलं. “एकदा आई आजारी होती तेव्हा आम्ही तिच्यावर सर्वोत्तम रुग्णालयात उपचार केले. म्हणून मी नेहमी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आहे. कारण- मला ठाम विश्वास आहे की, शिक्षणामुळे सगळं काही शक्य आहे. शिक्षणामुळेच मी माझ्या संपूर्ण कुटुंबाचा आनंद वाढवू शकतो,” असं अभिषेक म्हणाला.
अभिषेक त्याच्या कर्तृत्वाचं श्रेय त्याला कुटुंबाकडून मिळालेल्या पाठिंब्याला देतो. माझे आई-वडील व माझा भाऊ हे तिघंही माझी सर्वांत मोठी प्रेरणास्थानं आहेत, असं त्याचं म्हणणं आहे.