BMC Clerk Recruitment 2024: मुंबई महापालिकेतील कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदासाठी दहावी आणि पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लिपिक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी २० ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेतील विविध अटींमध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण या अटीचा समावेश होता. मात्र, विविध स्तरांवरून ही अट रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ती अट रद्द करण्याचे लेखी आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार, महानगरपालिका प्रशासनाने प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसांत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
‘प्रथम प्रयत्नात’ ही अट काढून टाकावी तसेच शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर हाती घ्यावी, सुधारित अर्हतेसह पद भरतीची प्रक्रिया नव्याने राबवावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.
९ सप्टेंबर २०२४ अर्ज करण्याची अंतिम तारीख
कार्यकारी सहाय्यक (लिपिक) संवर्गातील १,८४६ जागा सरळ सेवेत भरल्या जाणार आहेत. या जागांसाठी अर्ज प्राप्त उमेदवारांकडून दिनांक २० ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यास प्रारंभ करण्यात आला होता. तर दिनांक ९ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख होती.
हेही वाचा >> success story : मुंबईत खरेदी केलं ‘सी-फेसिंग अपार्टमेंट! वाचा भारतीय व्यावसायिक ॲशले नागपाल यांची यशोगाथा
शैक्षणिक अर्हतेची अट सुधारित करून त्यास मान्यता प्राप्त करणे, सुधारित अर्हता समाविष्ट करून त्यानुसार पद भरतीची जाहिरात नव्याने प्रसिद्ध करणे, तसेच सुधारित अर्हतेनुसार पद भरतीच्या ऑनलाईन प्रक्रियेत योग्य तांत्रिक बदल करणे, ही सर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कार्यवाही येत्या १५ दिवसांत पूर्ण करून पद भरतीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.