डॉ. श्रीराम गीत
मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं तर वेगवेगळे कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. त्यातील हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. संगीतातील करिअर करताना येणाऱ्या अडचणी आणि त्याकडे पाहण्याचा या करिअरकडे वळणाऱ्या मुलाचा दृष्टिकोन..
गाणं मला कधीपासून आवडायला लागलं हे खरंतर आठवत नाही. पण एक आठवण पक्की मनात आहे ती म्हणजे पहिलीमध्ये असताना सोसायटीच्या गणेशोत्सवामध्ये मला गणेश वंदना म्हणण्यासाठी मुद्दाम माईक समोर उभं केलं होतं. माझ्यापेक्षा थोडय़ा मोठय़ा वयाच्या मुलींचा नाच त्या गाण्यावर बसवला होता. माझा मुख्य आवाज आणि बाकीच्या कोरस करता तीन-चार मोठय़ा मुली अशा त्या कार्यक्रमातील काढलेल्या अनेक फोटोंमुळे मी एका रात्रीत अख्ख्या सोसायटीत ‘गोड गळय़ाचा गाणारा मल्हार’, म्हणून प्रसिद्ध झालो. माझ्या शेजारी राहणारे एक गायनातील दर्दी आजोबा माझे आईकडे आले. मल्हारच्या गळय़ाला जरा थोडीशी तालीम देऊन बघा, तो काय काय चमत्कार करतो ते तुम्हाला चार-पाच वर्षांत कळेल. आईचा आणि आजोबांचा संवाद मला काहीच कळत नव्हता. तालीम शब्दाचा अर्थच न कळल्यामुळे मला व्यायाम करायला जायचं नाही म्हणून मी भोकाड काढल्याच मात्र मला पक्के आठवते. माझ्या रडण्यावर सगळे का हसत आहेत हे तर मला त्या वेळी न उलगडणारे कोडेच होते.
पुढच्याच महिन्यात एका गाण्याच्या शिक्षिकेकडे माझी रवानगी झाली. मधुरा मावशीकडे शिकायला विविध वयातील मुले मुली येत असत. पण शिकण्यासाठीची माझी खास जागा मावशीच्या उजव्या हाताला कायमच राखून ठेवली होती. कारण सगळय़ात लहान आणि लाडका ‘गोड गळय़ाचा मल्हार’, म्हणून माझी कायम तारीफ होत असे. शास्त्रीय संगीत म्हणजे काय? रागदारी कशाला म्हणतात? याचा मला कसलाही गंध नव्हता, मात्र माझ्या नावाचा एक राग आहे त्यामुळे सगळय़ांना माझ्या नावाचे कौतुक वाटते एवढे मात्र डोक्यात घट्ट रुतून बसले होते. छोटी छोटी बोलगाणी, एखादे भजन, कधी त्या काळचे गाजलेले हिंदी गाणे मधुरा मावशी सगळय़ांबरोबर माझे कडूनही म्हणवून घेत असे. मावशीने धरलेला पेटीवरचा सूर, तबलजीचा ठेका आणि काही वेळा मी एकटय़ाने म्हटलेले गाणे याचे सगळय़ांनी केलेले कौतुक मात्र माझ्या मनावर कायम ठसत गेले. त्यातली माझी आवडती गाणी स्वत:शी गुणगुणताना पेटीचा सूर व तबल्याचा ठेका नसला तरी सुद्धा ऐकणाऱ्यांना आवडत. माझ्याबरोबरच्या वा मोठय़ा मुलांचा मैदानावरचा खेळ किंवा धांगडिधगा संपला की आता मल्हार एक गाणे म्हणेल ते ऐकून आपण घरी जाऊया, म्हणून एखाद्या हिंदी गाण्याची फर्माईश होत असे आणि माझ्याकडून ते म्हणवून घेतल्याशिवाय इतर पोरं मला सोडत नसत.
हायस्कूलची वर्ष आता मला स्पष्ट आठवतात. दरवर्षी गॅदिरग मध्ये माझं गाणं असायचं. एखाद्या सामूहिक कार्यक्रमाकरिता मला समोर उभे करून पसायदान किंवा वंदे मातरम म्हणायला सांगणे हा तर नित्य नियम झाला होता. त्यावेळी सगळय़ांच्या नजरेतील कौतुक पाहून आनंदाने मन भरून येत असे. दहावी संपली आणि कोणी प्रश्न विचारला, पुढे तू काय करणार? तर मला गाण्यातच करिअर करायची आहे हे माझे उत्तर सहजपणे द्यायला सुरुवात झाली. या उत्तरावर नेहमी चमकलेला वडिलांचा चेहरा मात्र मला स्पष्ट आठवतो. आईच्या चेहऱ्यावरचा आनंद, पण वडिलांचा गंभीर चकित झालेला चेहरा दोन्हीचा अर्थ कळायला मला वयाची तिशी उजाडावी लागली. सोळाव्या वर्षांपासून ते तिसाव्या वर्षांपर्यंतचा १४ वर्षांचा वनवास हा मात्र माझ्या डोळय़ासमोर किंवा स्वप्नातही स्पष्ट उभा राहतो.
वनवासाची, उपेक्षेची चौदा वर्षे
मी कॉमर्सला अकरावीला प्रवेश घेतला कारण डोक्यातल्या गाण्याने माझे मार्क कसेबसे साठच्या आसपास रेंगाळले होते. माझा आवाज त्याच वर्षी फुटला. तीन-चार महिने मी गाऊ शकेन का नाही अशीही भीती माझ्या मनात होती. हे सगळे काय चालले आहे हे मला कळत नव्हते. पण मधुरा मावशीने मला जवळ घेऊन हे सारे समजावून सांगितले. पण त्याच वेळी तिने आता तुला नवीन गुरूंकडे मी पाठवणार आहे हे सांगितल्यावर मी अधिकच अस्वस्थ झालो होतो. एकीकडे बी. कॉमचा अभ्यास चालू होता. पण मनामध्ये प्रचंड उलाघाल चालू होती. मधुरा मावशीने पाठवलेल्या गुरूंकडे शास्त्रीय संगीत शिकताना खूप कंटाळा येत होता. मनापासून ते सारे न संपणारे आहे, झेपेल याची खात्री वाटत नाही असे मला दुसऱ्या वर्षांपासूनच वाटायला लागले होते. आईचा व मधुरा मावशीचा ते शिकण्याचा आग्रह मला मोडता येत नव्हता. अधे मध्ये बाबा आईला म्हणायचे, ‘अग त्याला बीकॉमचा अभ्यास करू दे गाण्याचा अभ्यास करायला नंतर आयुष्य पडले आहे.’ आई त्यांची समजूत घालायचा प्रयत्न करायची. ‘त्याला गाण्यातच करिअर करायचीय असे तो म्हणतो ते जरा समजून तरी घ्या ना.’
बाबा एका आयटी कंपनीमध्ये मोठय़ा पोस्टवर होते. सकाळी आठपासून रात्री नऊपर्यंत ते बाहेरच असायचे. अनेकदा बंगलोर, दिल्ली, कलकत्ता असे दौरेही चालू असायचे. मी एकुलता एक असल्याने माझ्या हट्टा पुढे व आईच्या आग्रहाच्या पािठब्यामुळे ते पडते घेऊन या विषयावर पडदा पाडत असत. आईचा पािठबा असल्यामुळे मला गुरूंचा क्लास सोडता येत नव्हता. मात्र आता जास्तीत जास्त हिंदी, मराठी गाणी गाणे, गुणगुणणे व त्याची प्रॅक्टिस काराओके वर करणे हा माझा अभ्यास जेमतेम सांभाळून छंदच बनला होता. तीन-चार वेळा सारेगामा मराठीकरता ऑडिशन द्यायला जाऊन आलो. तुझा आवाज छान आहे पण रियाज हवा हे तोंडावर फेकलेले वाक्य ऐकून पुढील वेळी आईने फॉर्म भरला असूनही मी गेलो नाही. इंडियन आयडॉल मधे तर पहिले कडवे संपायचे आतच माझी बाहेर पाठवणी झाली. पदवी हातात आली, बाबांच्या ओळखीने एक बरी नोकरी पण सुरू झाली. मात्र गुरूंच्या शिकवणीने शास्त्रीय संगीत शिकणे मी त्यावेळी थांबवले. एका ऑर्केस्ट्रामध्ये गायला सुरुवात करायची संधी लवकरच चालून आली. पाहता पाहता त्यांचा प्रमुख गायक म्हणून माझे नाव जाहिरातीतही झळकू लागले. बाबांच्या कंपनीतील त्यांचे मित्रांनी जाहिरातीतील माझ नाव व फोटो पाहून, हा तुमचाच मुलगा का? असे विचारले तेव्हा मात्र बाबा दुसऱ्यांदा चकित झाले.
पण ही वाटचाल तशी खडतर होती. सहा सात वर्षे विविध समूहांबरोबर काम केल्यानंतर एका दिवशी बाबांनीच मला विचारले, ‘असं दुसऱ्या करता किती दिवस गाणार? तुझ्या नावाने कार्यक्रम सुरू करायचा का? वाटल्यास मी तुला दहा लाखाचे भांडवल देतो.’ आणि त्या दिवशी माझा वनवास संपला. यथावकाश आईच्या हस्ते माझ्या यूटय़ूब चॅनलचे उद्घाटन नुकतेच झाले. त्याची सगळय़ा वृत्तपत्रात फोटो सकट बातमी छापून आली. आईच्या आयुष्यातील तो सर्वात सुवर्णक्षण असे त्या दिवशी बाबांनी तिचे कौतुक केले. आईने लाजतच बाबांना सांगितले, ‘म्हणूनच मी हट्टाने आपल्या लेकाचे नाव मल्हार ठेवले होते.’