डॉ. श्रीराम गीत
सर, माझे वय २४ वर्षे आहे. आता एम.टेक.चालू आहे, ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीत. मी यूपीएससी देण्याचे ठरविले आहे आणि तलाठीची पण तयारी करत आहे, माझ्यासाठी प्लॅन बी काय असायला हवा. कृपया मार्गदर्शन करावे.
– आरिफ पठाण, सारोळा, औरंगाबाद</strong>
तुझ्या विचारांमध्ये खूप गोंधळ आहे असे तुझा प्रश्न वाचून मला जाणवले. एम टेक करणाऱ्या विद्यार्थ्यांने तलाठय़ाची परीक्षा द्यावी हे संपूर्णपणे चुकीचे आहे असे माझे मत नोंदवत आहे. एम.टेक. कुठून करत आहेस? त्याचा उल्लेख नाही. ते जर उत्तम संस्थेतून किंवा आयआयटी मधून असेल तर तुला नोकरी मिळणार आहे. ती स्वीकारून किमान दोन वर्षे काम करणे ही तुझी पहिली गरज राहील. अन्यथा यूपीएससी करत असताना एम. टेक पर्यंतचे शिक्षण पूर्णपणे गंजून जाईल व परतीचा रस्ता राहणार नाही. इंजीनिअरिंग मधील काम करत असताना वर्षांला ४०० ते ६०० तासांचा प्राथमिक अभ्यास करणे शक्य असते त्याचा खूप फायदा होतो. इंजीनियिरग पदवी घेताना चा अभ्यास व यूपीएससीचा अभ्यास यात खूप फरक आहे. तो समजतो व दिशा मिळू लागते. या साऱ्यावर नीट विचार करून प्रथम नोकरी घ्यावीस हाच प्लॅन-बी असेल.
सर, मी सध्या अॅग्रो इंजीनियरींगच्या शेवटच्या वर्षांला शिकत असून मी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आहे. मला एमपीएससीची परीक्षा द्यावयाची आहे. माझे दहावीचे मार्क्स ७३.८० तर बारावीचे मार्क ७५.५४ आहेत. तृतीय वर्षांत माझा स्कोअर ८.३ आहे, तरी माझ्या सदरील माहितीवरून आपण मला स्पर्धा परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करावे. पदवीनंतर असणाऱ्या रोजगाराच्या संधी बद्दल देखील मार्गदर्शन करावे .
– सुरजकुमार रोहोकले, अहमदनगर.
करिअर वृत्तांतमधील एमपीएससी व यूपीएससीचे सर्व लेख सलग वाचत रहा. हाती पदवी आल्यावर त्यातून तुला नोकरी नक्की मिळेल. अॅग्रो मशिनरी मेंटेनन्स व प्रोडक्शन या क्षेत्रात भारतात अनेक कारखाने आहेत. पोस्ट डिलिव्हरी मेंटेनन्स हा प्रकार करणाऱ्या काही एजन्सी काम करतात. जागेवर जाऊन टिलर, ट्रॅक्टर, स्प्रेयर्सची दुरुस्ती गरजेची असते. या साऱ्याचे स्पेअर पार्टचे ट्रेिडग करणारे कंपन्या आहेत. ही प्राथमिक माहिती तुला देत आहे. अधिक नेमकी माहिती तुझ्या कॉलेजातील प्लेसमेंट ऑफिसर देऊ शकतील. अशा स्वरूपाची नोकरी करत असताना एमपीएससीचा संपूर्ण वर्षभर स्व-अभ्यास करून त्याचा आवाका जाणून घ्यावा. मगच क्लास लावण्याचा विचार. या पद्धतीत पाचशे तासाचा अभ्यास सहज पूर्ण होतो. परीक्षेबद्दलचा आत्मविश्वास वाढतो. नोकरीचा अनुभव मिळाल्यामुळे पैशाचे महत्त्वही कळते. घरच्यांशी चर्चा करून किती प्रयत्न, त्यासाठी किती वर्षे द्यायची हा त्यातीलच एक भाग. मला असे करायचे आहे म्हणून घरच्यांना गृहीत धरणारे दुसऱ्या प्रयत्नापासून तोंडघशी पडतात. म्हणून हा सविस्तर उल्लेख करत आहे. तुझे मार्क चांगले आहेत. मात्र, तुला स्पर्धा अन्य इंजीनिअर बरोबर करायची आहे हे विसरू नयेस.
मी लहानपणापासून टेनिस खेळायचे. मी इयत्ता ८ पर्यंत खेळत होते आणि मी रोज शाळेत जात नव्हते फक्त परीक्षेला जात होते. मी ९ वी पासून शाळेत रोज जायला लागले. मला १० वीला ६५ टक्के पडले. मी सायन्स साईड आणि पीसीएम विषय घेतले. मला बारावीत ५८ टक्के पडले आहेत आणि जेईईला ४० टक्के परसेंटाइल. तर मला इंजीनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे. कृपया सर मला मार्गदर्शन करावे.
– कथा बिरामण दहावीला ६५ टक्के मार्क होते असे तो कळवले आहेस. तसेच बारावीला ५८ टक्के मार्क मिळाले हेही कळवले आहेस. पण शास्त्र गणितात दहावीला व पीसीएमला बारावीला मार्क किती यावर तुला इंजीनियिरग करावेसे वाटले तरी झेपेल की नाही याचा अंदाज सांगता येईल. दहावीला शास्त्र व गणितात ६५ पेक्षा कमी असतील आणि बारावीला पीसीएममध्ये प्रत्येकी ५५ पेक्षा कमी असतील तर इंजीनियिरग करायचे की नाही यावर गंभीरपणे विचार करावा. जेईई परीक्षा तुझ्या करता नव्हती. त्यामुळे त्या परीक्षेचे मार्क मी विचारात घेत नाही. कदाचित इंजीनिअरिंगला तुला प्रवेश मिळेल सुद्धा. पण परीक्षेमध्ये विषय अडकून इयर डाऊन होण्याची शक्यता भरपूर दिसत आहे. दुसरा एक मार्ग सुचवत आहे त्यावर गंभीरपणे विचार केलास तर यश मिळेल. इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाला प्रवेश घ्यावा. सर्व वर्षी ७० टक्के मार्क मिळवले तर पदवीच्या दुसऱ्या वर्षांला तुला प्रवेश मिळेल आणि तुझे इंजिनिअरिंगचे स्वप्न साकार होऊ शकेल.