डॉ.श्रीराम गीत
जेईई, सीईटीचा निकाल लागला त्या सुमारास माझी वकील मुलगी माझ्याबरोबर गप्पा मारत होती. तिचे एक वाक्य मला खडबडून जागे करणारे होते. ती म्हणाली, ‘‘जेईई वा सीईटी उत्तीर्ण होऊन पहिल्या काही क्रमांकात येणाऱ्या साऱ्यांचे कौतुक वृत्तपत्रात छापून येईल. तसेच पहिल्या काही हजारातील अनेक जण इंजिनियर होतील. मात्र २०३० साली यांच्यातील कोणीही भारतात असणार नाही. या उलट यंदाचे वर्षी एमबीए, वकील, डॉक्टर, सीए किंवा सीएस होणारे, कॉमर्स पदवीधर, उत्तम संस्थेतून समाजकार्याची पदवी घेणारे सारे जण पुढचे दशक भारतीय समाजासाठी उपयुक्त काम करत राहतील. या साऱ्यांपैकी कोणाच्याही निकालाचे पोटभर केलेले कौतुक कधी वाचायला मिळत नाही.’’
खरे तर या विधानावर मी सुद्धा विचार करून लागलो. गेल्या पंचवीस वर्षांतील विविध बातम्या डोळय़ासमोर तरळून गेल्या. सीएचा निकालाची बातमी वाचलेली आठवत होती. मात्र, अन्य कोणत्याही निकालाला वृत्तपत्रात कधी मोठी जागा मिळाल्याचे फारसे स्मरत नव्हते. म्हणजे बातमीच नव्हती असे नव्हते तर कुठेतरी कोपऱ्यात बोटभर उल्लेख केलेली छोटीशी बातमी छापून येत असे.
अतिशय खडतर स्पर्धेच्या परीक्षा
खरे तर वर उल्लेख केलेल्या प्रत्येक क्षेत्रात जाण्यासाठी प्रवेश परीक्षा निव्वळ कठीण असतात असे नसून जास्त स्पर्धात्मक असतात. त्याहीपेक्षा वेगळे म्हणजे प्रत्येक अभ्यासक्रम हा अत्यंत कठीण व सविस्तर माहितीने व्यापलेला असतो.
सीएलएटी वा क्लॅट ही वकिलीची अखिल भारतीय प्रवेश परीक्षा. भारतातील सर्वोत्तम अशा नॅशनल लॉ स्कूलमधील प्रवेशासाठी घेतली जाते. भावी न्यायाधीश ते सरन्यायाधीश वा तैल बुद्धीचे वकील तयार करणाऱ्या या संस्थातील सर्व प्रवेश या परीक्षेद्वारे होतात. डिझाईन व फॅशन या क्षेत्रातील भारतातील नंबर एकच्या संस्थेमध्ये प्रवेश मिळालेला विद्यार्थी मोठय़ा शहरात सुद्धा शोधावा लागतो. वयाच्या पस्तीशीमध्ये त्याच्या नावाने विविध ब्रँडचे लोगो तयार झालेले असतात. विलक्षण क्रिएटिव्हिटीची गरज असलेले हे क्षेत्र. सीए किंवा सीएस बद्दल काय सांगावे? दहावीला संपूर्ण भारतातून पंधरा लाख विद्यार्थी ९० टक्के मार्क मिळवतात. मात्र सीए व सीएस होणाऱ्यांची संख्या काही हजार सुद्धा भरत नाही. देवनारच्या टीआयएसएस किंवा अझीम प्रेमजींच्या बंगळूरुच्या संस्थेतून सर्वोत्कृष्ट सोशल वर्कर्स बाहेर पडतात. याची प्रवेश परीक्षा सुद्धा तितकीच खडतर असते. नीट नावाच्या परीक्षेचा उल्लेख इथे करत नाही. पण सुपर स्पेशालिस्ट बनण्यासाठी तीनदा वेगळी नीट द्यावी लागते हे सहसा कोणाला माहीतही नसते. पहिल्या नीट मध्येच घाम फुटणाऱ्या असंख्य मुला मुलीतून दरवेळी फक्त पंचवीस टक्के विद्यार्थी निवडले जातात.
अभ्यासाच्या पुस्तकांची एकूण पाने वा त्यांची काही हजाराची संख्या पाहूनच अनेकांची छाती दडपते. या साऱ्यांकडून सरकारी नोकरीचा बॉन्ड लिहून घेतला जातो. त्यांना परदेशी शिक्षणाचा खर्चही परवडण्याच्या पलीकडे असतो. मात्र यंदाचे वर्षी इंजीनियिरगला प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न जीआरईची परीक्षा देऊन एम.एस. करायला जायचे असते. त्यांना कोणीही अडवत नाही. हे स्वप्न पूर्ण व्हायला फारशी कोणालाच अडचण येत नाही. यावरून कोणच्या स्पर्धेसाठी धावायचे याचा विचार यंदा दहावी पास झालेल्या विद्यार्थी व पालकांनी जरूर करावा. केवळ निकालाच्या बातम्या वाचून निर्णय घेऊ नये. माऊलींच्या शब्दात, ‘‘जो जे वांछील तो ते लाहो.’’