डॉ. श्रीराम गीत

नमस्कार सर, मी २०२० ला बी.एस्सी. ८२.२० टक्क्यांनी तर २०२२ ला एम.एस्सी. ७९ टक्क्यांनी पास झालो. सध्या बी.एड.ला आहे. फॉरेन्सिक प्रवेशपरीक्षा दिली. त्यात मी ६ गुणांनी राहिलो. आता पुढे काय करावं? एमपीएससी कडे वळावं की, बँकिंगकडे? आता बाहेरच्या परीक्षा द्याव्या का बी.एड. करून शिक्षक बनून राहावे? पुढे काय करावे.   – राहुल साळुंखे

बी.एड. किवा सेट करून कायमस्वरूपी अनुदानित संस्थेत नोकरी मिळण्याची शक्यता फारशी नाही. विना अनुदानित संस्थांमध्ये पगार अत्यल्प दिला जातो किंवा घडय़ाळी तासावर काम करावे लागते हे आपणास माहीत असेलच. त्यामुळे त्या रस्त्याला जावे असे मी सुचवत नाही. बँकिंगच्या परीक्षा द्यायला हरकत नाही. यशाची टक्केवारी जेमतेम वीस टक्के असते. तोवर एखाद्या क्लासमध्ये शिकवायला सुरुवात करावी. नववी ते बारावी यादरम्यान आपला विषय आपण सहज शिकवू शकाल. फॉरेन्सिकची पदवी घेण्यापूर्वी ती मिळालेले विद्यार्थी काय काम करत आहेत किती पगारावर काम करत आहेत याची माहिती कृपया घ्यावी. कारण त्यातील बहुसंख्य कामे सरकारी नोकरी मिळाली तरच सुरू होतात. ती शक्यता अत्यल्प असते. पास होऊन दोन वर्षे झाली आहेत. आता वेळ घालवू नये. काम करायला ते शोधून सुरुवात करावी. एमपीएससीचा विचार आत्ता तरी नको. नोकरीत तीन वर्ष झाली की करू शकता.

हेही वाचा >>> UPSC-MPSC : अक्षय ऊर्जेचे स्रोत कोणते? भारतात अक्षय ऊर्जेच्या निर्मितीसाठी कोणते प्रकल्प राबवले जातात?

सर, माझ्या मुलीने या वर्षी कॉप्युटर इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षांला प्रवेश घेतला आहे. ती हॉस्टेल वर राहते. तिला दहावीला ८८ बारावीला ७० तर सीईटीला ९२ परसेंटाईल मिळाले आहेत. तिला मार्गदर्शन हवे आहे पुढील ४ वर्षे अभ्यासासाठी व एक ते दहा रँकिंगमध्ये राहण्यासाठी अभ्यासाची दिशा कशी असावी, अभ्यास कसा करावा, क्लासेस लावावे लागतील का किंवा फक्त कोडींगसाठी क्लास लावावा.        – नेहा

नेहा मॅडम आपण मला येत्या चार वर्षांबद्दलचे मुलीचे मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे. मी येथे जे लिहीत आहे ते बहुसंख्य विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना अजिबात न आवडणारे आहे हे प्रथमच नमूद करतो. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्याला कॉम्प्युटर शाखा मिळाली म्हणजे रात्रंदिवस आपण फक्त कॉम्प्युटरवरच काम करायचे असते. कोडींग शिकणे यातच वेळ घालवायचा असतो. जोडीला आहे एआय, एमएल वगैरे वगैरे फोडणी वजा शब्द वापरायचे असतात अशी सर्वसाधारण ठाम समजूत बनली आहे. इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षी असलेले सर्व विषय सर्वांना समान असतात त्याचा अभ्यास करून त्यात व त्यानंतरच्या प्रत्येक सेमिस्टरला साडेआठ सीजीपीए राखणे हे अत्यंत कठीण काम आपल्या कन्येला करावयाचे आहे. कॉम्प्युटर सायन्सच्या सर्व कोर्सेसमध्ये, सर्व इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तीन ते चार महिन्यात एकेक प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकवली जाते. मुलांना आपल्याला आता खूप येत आहे अशा स्वरूपाची चुकीची भावना त्यातून निर्माण होते. यासाठी रामबाण उपाय कोणताच नाही. मात्र, जे विद्यार्थी सहावे व सातवे सेमिस्टरमध्ये एकाच लँग्वेजचा उदाहरणार्थ: सी, जावा, ओरॅकल वर्षभर मन लावून स्वत:चा रोज अर्धा तास अभ्यास करतील प्रॅक्टिस करतील त्यांना त्याचा आयुष्यभर उपयोग होतो. सध्या फारशा कंपन्या कॅम्पससाठी कुठेच जात नाहीत. या उलट मोठय़ा भारतीय कंपन्यांनी ऑनलाइन टेस्ट कोणीही कधीही क्रॅक करावी व त्यानंतर त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल ही पद्धत अवलंबली आहे. यातून फार तर आठ ते दहा टक्के विद्यार्थी निवडले जातात. शेवटच्या सेमिस्टरला दर रविवारी अशा स्वरूपाच्या चाचण्याची तयारी करून अनुभव घेणे हा नोकरीचा राजरस्ता राहतो. अमेरिकेला जायचे असेल तर जीआरईची तयारी करून, पैशाची पुरेशी सोय करून ‘कोणालाही’, जाता येते. ती स्वप्ने पाहण्यात वेळ घालवू नये. शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लेखी, बोली, व्याकरण शुद्ध इंग्रजी येणे गरजेचे आहे. संवादकौशल्य असे त्याला आयटीने दिलेले गोंडस नाव आहे. तिथे अनेकजण कमी पडतात.

हेही वाचा >>> १० वी पास उमेदवारांना गुप्तचर विभागात नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदांच्या ६७७ जागांसाठी भरती सुरु

आवाहन

यूपीएससी द्यायची आहे. तर मनात हजारो प्रश्न उभे राहतात. मार्गदर्शनाची गरज भासते. अर्थात प्रश्न तिथे उत्तरही असतेच, करिअरशी निगडित देशातील सर्वोच्च परीक्षांविषयीच्या शंकांचे निरसन होईल, असे एकच ठिकाण म्हणजे करिअर वृत्तांतमधील करिअर मंत्र. म्हणूनच विद्यार्थ्यांनो, लेखणी उचला आणि प्रश्न विचारा. प्रश्न विचारताना आवश्यक तेथे आपली शैक्षणिक, वैयक्तिक माहिती सविस्तर लिहावी. जेणे करून योग्य प्रकारे शंका समाधान होईल. आमचा ई-पत्ता : careerloksatta@gmail.com

Story img Loader