डॉ. श्रीराम गीत
सध्या माझे वय २३ वर्ष आहे. एम.फार्म पहिले वर्ष चालू आहे. माझ्या मनात स्पर्धा परीक्षेबद्दल प्रचंड इच्छाशक्ती आहे. परंतु एम.फार्म. करत असताना एमपीएससीच्या अभ्यासाला फारसा वेळ मिळत नाही व मनात असाही विचार येतो की ते सोडून एमपीएससी करावी. कृपया तात्काळ सविस्तर मार्गदर्शन करावे. – आकांक्षा.
एम.फार्म.ला चांगला अभ्यास करून कॅम्पसद्वारे मिळणारी नोकरी सुरू करावी. त्या दरम्यान एमपीएससीचा अभ्यासक्रमाचा आवाका समजून घ्यावा. दोन वर्षे अभ्यास करून कदाचित पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात यश मिळेल. असे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहून मला वाटते. आत्ताच पदव्युत्तर शिक्षण सोडून दिले तर नोकरीची पंचाईत होऊ शकते. राज्यसेवा स्पर्धा परीक्षेत कधी, कोणाला, कसे यश मिळेल हे सांगणे कठीण आहे. म्हणून हा खात्रीचा रस्ता सुचवत आहे. कोणाच्याही स्वरूपाचा उशीर होतो हे मनातून काढून टाकावे. त्यासाठी आपल्या हातात दोन वर्षे नोकरी केल्यानंतर किमान दहा वर्षे तरी आहेत.
मी मागील ४ वर्षांपासून लोकसत्ता वाचक आहे. माझे वय २८ वर्ष आहे. माझे शिक्षण २०१९ मधे बॅचलर ऑफ सायन्स बायोलॉजीमधून ६७ टक्के मिळवून झाले आहे. मी २०१७ ते २०१९ या साली स्पर्धा परीक्षांची तयारी करत होतो. पण यश मिळाले नाही. नंतर करोनामुळे माझा अभ्यासात खंड पडला आणि मी स्पर्धा परीक्षांची तयारी सोडून दिली. आता सध्या मी पुणे येथे ‘आय टी’चे क्लास करत. पण या मध्ये मला यश मिळेल की नाही याबद्दल शाश्वती नाही. कारण माझे शिक्षण आय टी क्षेत्रातील नसल्याने खूप अडचणी येत आहेत. सध्या मला कोणताही योग्य मार्ग दिसत नाही. मी नक्की काय करावे. – शिवाजी
चांगला कोणत्याही शाखेतील पदवीधर, उत्तम कॉम्प्युटरचा वापर करता येणारा पदवीधर, इंग्रजीतून किमान गरजेनुसार संभाषण करणारा पदवीधर सगळीकडे हवा असतो. मात्र, त्याला सुरुवातीला जेमतेम बारा हजार रुपये महिना इतपतच पगार मिळतो. अशा स्वरूपाची नोकरी शोधावीत. आयटीचा कोर्स करून काहीही फायदा होईल असे वाटत नाही. कारण आयटीमधील इंजीनिअर्सनाही नोकऱ्या मिळत नाहीत. आपले वय वाढत आहे. लवकर योग्य तो निर्णय घ्यावा.
माझी मुलगी बायो इंजीनिअरमध्ये बीटेक करत आहे. सध्या ती शेवटच्या वर्षांला असून तिचा सीजीपी ८.५ च्या वर आहे. पुढे एम.टेक. बायो इंजीनिअरमध्येच करून तिला भारतात काही स्कोप आहे का? सविस्तर मार्गदर्शन करावे. – स्वाती
बायो मेडिकल इंजीनिअरिंगमध्ये दोन वर्षे मिळेल ते काम करून अनुभव घेणे सगळय़ात महत्त्वाचे असते. त्यानंतर भारता बाहेर शिकायला जायचे का एम.टेक. करायचे हा निर्णय तिचा ती घेईल. या क्षेत्रातील अनेक संधी भारतात निर्माण होत आहेत. मात्र, त्यासाठी प्रथम अनुभवाची गरज राहील. या विषयात पास झालेल्या तिच्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भेटून तिला भारतातील स्कोप बद्दल मार्गदर्शन मिळू शकते. ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’चा वापर करून आरोग्य क्षेत्रातील, वैद्यकीय उपकरणातील विविध यंत्रणा कशा निर्माण केल्या जात आहेत, याचे अवांतर वाचन तिने करणे उपयुक्त ठरेल.
मी सध्या १२ वी कला शाखेमध्ये मध्ये शिकत आहे. मला १० वी ला ८८ मार्क आहेत. ९ वी पासूनच मला राज्यसेवा परीक्षा द्यायची आहे असे ध्येय आहे. याच विचाराने मी ११ वीला अभ्यास करत करत लोकसत्ता पेपर वाचून त्यावरील संपादकीय पानावरून कोणत्याही एका विषयावर निबंध लिहते आहे. त्याच बरोबर इतर इंग्रजी, गणित याविषयतील काही मूलभूत गोष्टी सुद्धा मी अभ्यासल्या आहेत. सध्या या गोष्टी सुरू असतानाच माझा १२ वीचा अभ्यास सुरू आहे. याच बरोबर पदवीच्या पहिल्या वर्षी मी अजून काय काय सुधारणा करायला हव्यात? – श्रावणी पोवार
पाचवी ते दहावीची सर्व विषयांची पुस्तके सवड मिळेल तशी वाचायला सुरुवात करावी. करिअर वृत्तांतचे मंगळवार ते शुक्रवार वाचन सतत चालू ठेवावे. तीन वर्षे दहावीच्या गणिताचा व व्यावहारिक गणिताचा अभ्यास दर रविवारी एक तास करणे गरजेचे. त्याचा उपयोग सी सॅट करता होईल. पदवीच्या तीन वर्षांत ऐंशी टक्के मिळवणे हे गरजेचे राहील. सध्या एवढेच पुरे. पदवी संपेपर्यंत राज्यसेवा परीक्षा हा विषय डोक्यात नको. त्याची सुरुवात पदवीनंतरच होणार आहे.