वडिलांना विद्यापीठात जाता आलं नाही, कारण ते डॉक्टरेट झालेले नव्हते एवढंच मला त्या वेळेला कळलं. पण ही पदवी म्हणजे काय असतं हे आईला किंवा वडिलांना विचारण्याची अक्कल नव्हती आणि धाडस पण नव्हतं. पण मनाशी पक्कं ठरवून टाकलं की वडिलांना जे जमलं नाही ते काहीही करून मिळवून दाखवायचं म्हणजे विद्यापीठातील प्राध्यापकच बनायचं.

मी मीनलएका मराठीच्या प्राध्यापकाची मुलगी. माझी आजी आणि आजोबा हे दोघेही माध्यमिक शिक्षक होते. आज-आजोबांचे फलटणजवळ वडिलोपार्जित मोठे घर. माझे वडील एका पश्चिम महाराष्ट्रात पसरलेल्या नामांकित संस्थेमध्ये मराठीचे लेक्चरर म्हणून रुजू झाले. ते लेक्चरर म्हणून रुजू झाले त्यावेळी आजी-आजोबांना प्रचंड आनंद झाला होता. त्यांनी अख्ख्या गल्लीला पेढे वाटले होते. ही झाली १९७५ सालच्या आसपासची गोष्ट. वडील कायम झाले, मात्र एकच गोष्ट बोचणारी होती, दर पाच वर्षांनी संस्थेच्या एखाद्या नवीन कॉलेजमध्ये त्यांची नेमणूक व्हायची. अर्धवट बांधलेली इमारत, नवीन येणारी मुले हाताशी नवशिके मदतनीस लेक्चरर या सगळ्याला तोंड देत त्यांची पहिली पंचवीस वर्षे वाटचाल झाली. शेवटी सातारच्या एका नामवंत कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्यांची फिरती थांबली.

त्या काळात प्राध्यापकाने डॉक्टरेट करण्याची टूम निघाली नव्हती त्यामुळे एमए ला फर्स्ट क्लास असून सुद्धा वडिलांनी त्या रस्त्याचा कधी विचारच केला नाही. कधीकधी बोलताना त्यांच्या बोलण्यात रुखरुख दाटून येते की शिवाजी विद्यापीठात किंवा पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात मला सहज जाता आले असते, पण डॉक्टरेट नाही म्हणून विद्यापीठातील गेटवरच थांबावे लागले. हे वाक्य मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा माझे ज्युनिअर कॉलेज नुकते संपले होते. दहावीला चांगले मार्क मिळाल्यामुळे मी विज्ञान शाखेत बारावी पूर्ण केली होती. आईच्या सांगण्यानुसारच मी दहावीनंतर सायन्सला जायचे ठरवले होते.

हेही वाचा >>> नोकरीची संधी : कोंकण रेल्वेमध्ये विविध पदांची भरती

वडिलांना विद्यापीठात जाता आलं नाही कारण ते डॉक्टरेट झालेले नव्हते एवढंच मला त्या वेळेला कळलं. पण ही पदवी म्हणजे काय असतं हे आईला किंवा वडिलांना विचारण्याची अक्कल नव्हती आणि धाडस पण नव्हतं. पण मनाशी पक्क ठरवून टाकलं की वडिलांना जे जमलं नाही ते काहीही करून मिळवून दाखवायचं म्हणजे विद्यापीठातील प्राध्यापकच बनायचं. आईची इच्छा होती की मी इंजिनिअरिंग करावं, वडिलांना वाटत होतं की मी डॉक्टर बनावे. पण दोन्ही बनण्याची माझी अभ्यासाची कुवत नाही हे मला माहिती होते. पीसीएमबीचा व्यवस्थित अभ्यास करून बीएससी व्हायचं हे मी मनाशी पक्कं केलेलं होतं.

कसेबसे ५५ टक्के गुण मिळवत मी अकरावी पास झाले व बारावीला जेमतेम फर्स्ट क्लास मिळाला. वडील त्यावेळेला सातारला प्राध्यापक म्हणून आले होते. त्यांच्याच कॉलेजात सायन्सला प्रवेश घेऊन माझा पुढचा प्रवास सुरू झाला. गणित, फिजिक्स कळायला अवघड जात होतं. म्हणून ते दोन विषय बाजूला पडले व केमिस्ट्री, बॉटनी, झूलॉजी यातून मी बीएससी पूर्ण केलं. मास्टर्स करता बॉटनी हा विषय घेऊन मी शिवाजी विद्यापीठात दाखल झाले.

माझं मास्टर्स पूर्ण झाल्यानंतर बरोबर असलेली निम्म्यापेक्षा जास्त मुलं मुली बीएडला गेली होती. काही मुलींची लग्न झाली होती. दोन मुले परदेशात जेनेटिक्स विषयाचा अभ्यास करण्यासाठी निघून गेली. तशी एमएस्सी बॉटनीची क्षमता ६० ची असली तरी वर्गात जेमतेम ३५ मुलं असत. रिकाम्या २५ जागा बघूनतरी मला अक्कल यायची, पण तेही झालं नाही. दुसऱ्या वर्षाच्या जानेवारीपासूनच मला माझ्या प्राध्यापकांनी माझ्या हाताखाली डॉक्टरेट करणार का असा प्रस्ताव मांडला असल्यामुळे मला माझ्या नावामागे डॉक्टर लागल्याची स्वप्ने पडू लागली होती.

एमएस्सी झाल्यावर आईने मुले पाहायला सुरुवात केली. त्याला मी कडाडून विरोध केला. विरोधाचे कारण काय असे वडिलांनी विचारल्यानंतर मग मात्र माझ्या तोंडातून वडिलांची अपूर्ण इच्छा प्रथमच बाहेर पडल्री. ‘‘बाबा तुम्हाला विद्यापीठात प्राध्यापक व्हायचे होते ना? त्यासाठी लागणारी डॉक्टरेट मी पहिल्यांदा पूर्ण करणार. ते तुमचे स्वप्न मी पूर्ण करणारच.’’ बाबा दिलखुलासपणे हसले, म्हणाले, ‘‘मला ते आवडेल. पण आजकाल ते तितकसं सोपं राहिलेलं नाही.’’ आईने बाबांना सुनावले, ‘‘म्हणजे ही घोडनवरी होईपर्यंत आपण वाट पाहायची का?’’ आईच्या बोलण्याचा माझ्यावर कसलाच परिणाम होत नव्हता.

घरच्यांचा विरोध पत्करून मी विद्यापीठाच्या होस्टेलवर राहायला गेले आणि कामात प्रचंड उत्साह होता. आपण काहीतरी नवे वेगळे संशोधन करणार अशी मनात ईर्षा होती. वनस्पतीशास्त्र किती अवाढव्य आहे याचा थोडाफार आवाका पहिले वर्ष संपतांना येऊ लागला. आधीच्या पाच-सहा वर्षात वनस्पतीशास्त्र शिकले ते किती प्राथमिक होते हेही कळू लागले. आंतरशाखीय वाचन केल्याशिवाय आपली सुटका नाही हे जेव्हा कळले त्यावेळी मात्र अभ्यासाचे व पुढच्या भविष्याचे दडपण मनावर येऊ लागले होते. दुसरे वर्ष संपताना सोडून दिलेले गणित समोर येऊन उभे ठाकले. गणिताची व संख्याशास्त्राची मी तर चक्क तीन महिने शिकवणीच लावली होती. तिसऱ्या वर्षी आता आपल्या हातात काहीतरी सापडत आहे असे वाटताना माझे प्राध्यापक निवृत्त झाले. त्यांच्या जागी नवीन नेमणूक झालेले दुसरे प्राध्यापक मला प्रथमदर्शनीच आवडले नव्हते.

मास्टर्ससाठी दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांची काही लेक्चर्स घेण्याचे काम त्यांनी माझ्याकडे सोपवले. खरे तर त्या विषयाशी माझा फारसा संबंध आला नव्हता. पण त्यांना विनंती करूनही त्यांनी ती मान्य केली नाही. विसंवादाची ठिणगी म्हणतात तशी ती पडली होती. त्याचाच पुढे वणवा झाला. चार वर्षात पूर्ण होणारी माझी पीएचडी नंतर सहाव्या वर्षी कशीबशी संपली. आईच्या भविष्यवाणीप्रमाणे मी आता तिशीतली घोडनवरी झाली होते. महाराष्ट्रातच काय पण संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी अर्ज करूनही मला नोकरीसाठी एकही कॉल आला नाही. त्याच सुमारास माझ्याबरोबर मास्टर्स करून परदेशात स्थायिक झालेल्या एका विद्यार्थ्याने मला स्वीडनमध्ये पोस्ट डॉक्टोरलसाठी दोन वर्षाची संधी देऊ केली. ती घेण्याशिवाय मला पर्याय नव्हता व मला जाऊ नको असे सांगण्याचे आई बाबांना कोणतेच कारण राहिले नव्हते. नंतरचा माझ्या करिअरचा प्रवास युरोपातील विविध देशात मिळतील तशा नोकऱ्या करण्यात गेला. काही ठिकाणी पदवीसाठी शिकवण्याची संधी मिळाली. मात्र बाबांचे भारतातील विद्यापीठात प्राध्यापक बनण्याचे स्वप्न अजूनही मला वेडावून दाखवते. लग्न, संसार,देश या तिन्हीला मी मुकले आहे. अन्यथा बाकी सारे माझे छानच चालले आहे… (क्रमश:)