मिलिंद आपटे

मला दहावीत ९३ तर बारावीत ९० मार्क होते. सीईटी देऊन मी मला हव्या असलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेत प्रवेश घेतला. आता मी पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे. माझा सीजीपीए ८.० राहिला आहे. मला पदवीनंतर मास्टर्स करायला परदेशात जायची इच्छा आहे (मास्टर्स साठी आवश्यक असलेली शैक्षणिक प्रोफाइल माझी आहे. शिवाय आर्थिकदृष्ट्या पण तयारी आहे). पण याच बरोबर मला AFCAT (एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट) IES (इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस) यासारख्या परीक्षांबद्दल पण जाणून घ्यायची इच्छा आहे. या दोन मार्गांपैकी कोणता मार्ग निवडावा?

गौरिष वझे

– मास्टर्स करायला परदेशात जायची इच्छा आहे, असे असेल तर स्वत:ला खूप संभ्रमात ठेऊ नका. तुमच्या दोन इच्छा अतिशय भिन्न आहेत असे दिसते. AFCAT (एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट) IES (इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस) यासारख्या परीक्षांमधून निर्माण होणारे करिअर हे देशसेवा, समाजसेवा याला धरून असते , त्याला मी व्यावहारिक म्हणून बघत नाही , त्या ठिकाणी वैयक्तिक कामाचे समाधान हे सेवेमधून मिळते. त्या विरुद्ध परदेशी शिक्षण हे लाइफ स्टाइल, पैसा, करियर केवळ यापुरते असते, तुमचं आयुष्यातील ध्येय हे स्पष्ट असावे, कारण त्यानुसार यातील निवड करावी लागेल केवळ वरवर बघून निवड नसावी, तुमची मानसिकता ही यात फार महत्त्वाची आहे. त्यामुळे आयुष्यभर समाधान कशात मिळेल हे बघून निर्णय घ्यावा.

मी बीकॉम दुसऱ्या वर्षात शिकत आहे. मला बारावीमध्ये ८८ गुण होते.मला पुढे सीए करायचे होते . परंतु सीए ची तयारी सुरू करायला उशीर झाला.मी आता सीए ची तयारी चालू केली आहे.त्यामुळं माझे ग्रॅज्युएशन संपेपर्यंत सीए पूर्ण नाही होणार. त्यासाठी मी बीकॉम नंतर सीए करत एमकॉम किंवा एमबीए ला प्रवेश घेऊ का? की, बीकॉम नंतर फक्त सीए ची तयारी करू? मी काय करावे ?

ऐश्वर्या हावळे

– सीए करण्यासाठी निर्धार लागतो, फक्त इच्छा असल्यास होत नाही हे आधी लक्षात घ्यावे. बीकॉम नंतर सीए सुरू असताना एमकॉम शक्य आहे, एमबीए नाही. आजकाल सीए निर्णय विद्यार्थी बारावी असताना घेतो व खूप निर्धाराने २३,२४ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय ठेवतो. त्यानुसार त्याला व्यावसायिक यश मिळते. या सर्व बाबींचा विचार करावा. शुभेच्छा.

careerloksatta@gmail. com