डॉ. श्रीराम गीत
सर मी बारावी आर्टस शाखेतून केली आहे मला बारावीला ८१ टक्के आहेत. नंतरचे पुढील शिक्षण मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथून घेत आहे. मी सध्या यूपीएससीची तयारी करीत आहे. मी बीएनंतर मी प्लॅन बी म्हणून लॉ कडे पाहत आहे. तर माझे पुढील भविष्य कसे असेल? – रोहित नरूटे.
पहिल्यांदा बीए तर होऊ दे तुझे. एक डोळा स्पर्धा परीक्षांवर. दुसरा डोळा कायद्याच्या पदवीवर. डोक्यात विचार सारे अस्थिरतेचे. याचा अजिबात उपयोग नसतो. प्लॅन बीचा अर्थ नीट समजून घे. तुझ्यासाठी सविस्तर सांगत आहे. मी किती वर्षे स्पर्धा परीक्षांकरिता देणार? त्या दरम्यानचा माझा राहण्याचा क्लासचा खर्च कोण करणार? त्याला घराची पूर्ण संमती व पाठिंबा आहे काय? हे सगळे करण्यासाठीची माझी स्वत:ची क्षमता किती आहे? ती क्षमता वाढवण्यासाठी व तीव्र स्पर्धेला तोंड देण्यासाठी मी काय दैनंदिन प्रयत्न करत आहे? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधणे ही पहिली गरज असते. यानंतर मग प्लॅन बी सुरू होतो. थोडे विषयांतर करून सांगत आहे. नीरज चोप्राने सध्या अप्रतिम यश संपादन केले. मी खेळ संपल्यानंतर काय करणार हा विचार त्याने कधीच केला नाही. यूपीएससीची स्पर्धा परीक्षा म्हणजे अशीच तीव्र स्पर्धा असते हे या उदाहरणावरून तुला कळले असावे. जे विद्यार्थी स्वत:चे दहावीचे, बारावीचे, पदवीचे सर्व मार्क विसरतात आणि आपल्यापेक्षा किमान एक लाख हुशार विद्यार्थी आपल्या स्पर्धेत आहेत हे मनात सतत गृहीत धरून सुरुवात करतात तेच यशाची पहिली पायरी चढतात. या सगळय़ाचा विचार तुला करायचा आहे. अन्यथा बीए झाल्यावर प्रथम एलएलबी पूर्ण कर. त्या दरम्यान यूपीएससीचा नीट अभ्यास समजून घे. तरीही तुझ्या हाती त्या परीक्षेसाठी आठ वर्षे राहतील.
दहावीला ८५ टक्के मार्क मिळवून मी सध्या अकरावी सायन्स करत आहे. मला पुढे ऑटोमोबाईल इंजिनीअिरग करावेसे वाटते. ते चांगले आहे का? मेकॅनिकल इंजिनीअिरग? दोन्हीमधून स्कोप कसा असतो मला माहिती नाही कृपया माहिती द्याल का? – यज्ञेश
बारावी सायन्स पीसीएम मध्ये ७५ टक्के टिकवणे हे तुझे पहिले ध्येय राहील. सीईटी ही इंजिनीअिरगची प्रवेश परीक्षा असते. त्यात किमान १२०/२०० पैकी मिळवणे गरजेचे राहील. चांगल्या कॉलेजमधील मेकॅनिकलचा प्रवेश त्याशिवाय मिळण्याची शक्यता नाही. मेकॅनिकल इंजिनीअिरग केलेला इंजिनीअर कधीही ऑटोमोबाईलमध्ये जाऊ शकतो पण या उलट मात्र फारसे घडत नाही. ऑटोमोबाईलमध्ये फक्त विविध वाहनांच्या इंजिन निर्मिती प्रक्रिये संबंधित व वाहनांच्या आकाराशी संबंधित प्रशिक्षण असते. मला कार्स आणि बाईक्स आवडतात म्हणून मला ऑटोमोबाईल इंजिनियर बनायचे आहे हे वाक्य मी गेले वीस वर्षे अनेक मुलांकडून ऐकत आलो आहे. आवडणे आणि निर्मिती करणे यात प्रचंड फरक असतो. मेकॅनिकल इंजिनीअर हा सर्व प्रकारच्या मशीनची संबंधित कामे सहजरित्या करू शकतो. इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती सुरू झाल्यापासून ऑटोमोबाईल इंजिनअरची कामे खूप मर्यादित होत आहेत. पुढे काय करू या ऐवजी बारावीचा अभ्यास व सीईटीचे मार्क यावर लक्ष केंद्रित कर.
मी मध्यम वर्गाचा विद्यार्थी राहिलो आहे. मला १० वी ला ७२.६० आणी १२ वीला ४९.२३ मार्क्स आहेत. माझे बीएस्सी. झाले आहे. सध्या माझे वय २७ आहे आणि एमपीएससी क्लास लावले आहेत. या अगोदर मी रेमंडमध्ये काम करत होतो. नोकरी सोडून मी क्लास करत आहे. २०२५ साठी तयारी करत आहे. सुरुवात करताना मला त्रास होत आहे. अभ्यास नकोसा वाटत आहे. तर मी काय करायला पाहिजे – शुभम खडसे
तुमचा सगळा प्रश्न वाचल्यावर मला सगळय़ात महत्त्वाचा प्रश्न असा पडला की वयाच्या २७ व्या वर्षी तुम्ही कोणाच्या मदतीने व आधारावर दैनंदिन खर्च चालवत आहात? वयाच्या २५ नंतर स्वत:च्या पायावर उभे राहणे ही प्राथमिक गरज समजावी. अशा वेळेस रेमंडसारख्या कंपनीतील नोकरी सोडून आपण स्पर्धा परीक्षांच्या रस्त्याला लागलेला आहात. त्यासाठीची तयारी करण्या करिता लागणारे किमान मराठी व इंग्रजी हे सुधारणे खूप गरजेचे आहे. मी क्लास लावला आहे हे वाक्य भाषा सुधारण्याच्या दृष्टीने पूर्णपणे निरुपयोगी ठरणारे आहे. एकूणात या सगळय़ाचा सारसार विचार करावा. वाटल्यास २०२५ मध्ये एक प्रयत्न देऊन पहावा. यापेक्षा मी आपल्याला मार्गदर्शनासाठी मदत करू शकत नाही. तांत्रिक पदाकरता जागा उपलब्ध असेल तर त्याचा विचार करावा.