डॉ. श्रीराम गीत
सर, मी पुण्यात अकरावीला शिकत आहे. मी पीसीएम गट निवडला आहे. एसएससी बोर्डाच्या परीक्षेत मला ९६ टक्के गुण मिळाले आहेत. मी लोकसत्ता, विशेषत: तुमचे करिअर मार्गदर्शनावरील लेख नियमितपणे वाचते. तुम्ही करिअर मंत्राद्वारे अनेकदा सुचविल्याप्रमाणे, मी माझे दहावीचे मार्क्स आता विसरले आहेत. माझ्या लक्षात आले आहे की १० वी मध्ये गुण मिळवणे खूप सोपे आहे पण सीईटी/जेईईमध्ये ते खूप अवघड आहे. खासगी कोचिंग क्लासमध्ये दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनानुसार मी सातत्याने अभ्यास करत आहे आणि जेईई मेन्सची तयारी करत आहे. मी २०२५ मध्ये या प्रवेश परीक्षा देणार आहे. मी नियमितपणे अभ्यास करत असले तरी वर्गात घेतल्या जाणाऱ्या साप्ताहिक किंवा मासिक चाचण्यांमध्ये मला चांगले परिणाम मिळत नाहीत. जेईई मेन्स आणि सीईटीमध्ये चांगले गुण मिळवणे हे माझे उद्दिष्ट आहे जेणेकरून मला एनआयटी / चांगल्या प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल. त्यामुळे या परीक्षांची तयारी कशी करावी आणि चांगले गुण कसे मिळवावेत याविषयी कृपया मला मार्गदर्शन करा. – श्रावणी कुलकर्णी, पुणे</p>
जेईई मेन्स वर फोकस करायचा, का सीईटीवर यावर प्रथम तुला निर्णय घ्यावा लागेल. दोन्ही मध्ये किती फरक असतो ते तुला जरी माहीत असले तरी तुझ्या आई-वडिलांकरता, इतर वाचकांसाठी मी इथे समजावून सांगत आहे. सीईटी ही बारावीच्या एकूण ८८ चॅप्टसर्वर आधारित असते तर जेईई एकूण १२० चॅप्टरचा अभ्यास करून द्यावी लागते. काही मुलामुलींची जेईईचा अभ्यास करताना खूप दमछाक होते. त्याचा परिणाम चाचणी परीक्षेत कमी गुण मिळण्यावर होतो. अशा साऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य वेळेत सीईटीवर फोकस केल्यास त्यात उत्तम मार्क मिळवता येतात. आकडय़ातून सांगावयाचे झाले तर १५०/२०० हे मार्क सीईटीचे चांगले समजले जातात. जेमतेम तीन ते चार टक्के विद्यार्थी या मार्काच्या पलीकडे पोहोचतात. अर्थातच चांगले कॉलेज मिळण्यासाठी हे उपयुक्त राहतात. जेईई मेन्सद्वारे तुला एनआयटीमधे पोचायचे असेल तर संपूर्ण भारतातून पहिल्या तीस हजारात येणे गरजेचे राहील. तिथे मेन्स मधील मार्क किती हा आकडा फारसा महत्त्वाचा राहत नाही. मेन्स मध्ये १००/३०० पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सात ते आठ टक्के असते.
त्यासाठी केवळ क्लास, क्लासची परीक्षा व खूप अभ्यास पुरत नाही तर क्रमिक पुस्तकातून स्वत: समजून घेऊन त्याच्या नोट्स काढणे हे गरजेचे राहते. हे करणारा विद्यार्थी दोन्ही परीक्षांना समर्थपणे तोंड देऊ शकतो. त्याला सुरुवात कर. मेन्स मध्ये १०० तर सीईटी मध्ये १५० व पीसीएम मध्ये प्रत्येकी ८० मार्काचे ध्येय ठेव. अजून भरपूर वेळ तुझे हाती आहे. नक्की यश मिळेल