डॉ.श्रीराम गीत
मी बी. ए. अर्थशास्त्र पदवीधर आहे. चार-पाच वर्ष एमपीएससी करून आत्ता हाती काहीच लागलेले नाही. घरची परिस्थिती बेताची आहे. थकलेले आई वडील, रोजंदारीवर काम करणारा मोठा भाऊ त्याचं कुटुंब असा परिवार माझ्या निकालाची वाट आशेनं पाहत आहेत. स्पर्धा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशात मला मात्र काहीच सुचत नाही आहे. वय ३० झालं आहे. आत्ता मला मार्ग बदलून नेमकं काय करावं सुचत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.- प्रकाश वाकडे
प्रकाशजी, आपल्या निमित्ताने स्पर्धा परीक्षेच्या मृगजळामागे लागणाऱ्या सगळय़ांना जागे करण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे. सरकारी नोकरी असो, खासगी असो किंवा व्यवसाय यामध्ये उमेदीची वर्षांचा एकूण कालावधी सहसा 35 वर्षांचा असतो, काहींना चाळीस वर्षांचा मिळतो. त्यातील दहा वर्षे आपण पूर्णत: वाया घालवली आहेत. आणि तेही घरातील परिस्थिती चांगली नसताना. कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असताना मी फक्त अभ्यास करतो ही स्वच्छ फसवणूक असते. तीही स्वत:चीच. एखाद्या वर्षांभराच्या सलग अभ्यासानंतर परीक्षेत यश मिळणार आहे का नाही याचा थोडाफार अंदाज प्रत्येकाला येतो. नंतर प्रयत्न किती वर्षे करायचे हे त्यावर अवलंबून असते. अगदी थोडक्यात यश हुकले तर अजून दोन प्रयत्न ठिक असतात. अन्यथा एखादी नोकरी करत रोज दोन तासाचा अभ्यास केला तरी सुद्धा यश मिळण्याची शक्यता वाढते. स्पर्धा परीक्षातून मिळेल ते पद पहिल्यांदा घेऊन पुन्हा पुन्हा परीक्षा देत विविध चांगली पदे मिळवत आयएएसपर्यंत पोहोचलेली अनेक उदाहरणे आहेत. आपण लगेच मिळेल ते काम, मिळेल ती नोकरी, मिळेल तो पगार स्वीकारा. अनेक कामे मिळतील. विक्रेते, संगणक नोंदी, क्लासेसमधे कारकुनी, भांडार संभाळणे याला माणसे लागतात. तिथे नोकरी मिळेल. ती करत मग प्रयत्न चालू ठेवायला हरकत नाही. त्यासाठी उमेद पण मिळेल.
नमस्कार सर, मला १० वी आणि १२वी ला ८५ टक्के गुण मिळाले होते. एमपीएससी द्यायची आहे म्हणून मी आता बी.ए. च्या पहिल्या वर्षांत शिकत आहे. माझे मराठी, इंग्रजी, समाजशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, भूगोल हे विषय असून माझे आवडते विषय इतिहास आणि समाजशास्त्र आहेत. माझ्या कुटुंबात ५ बहिणी आणि एक भाऊ आहे. मी सर्वात मोठी असल्यामुळे मला ऑप्शन बी निवडायचा आहे. आमची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने काय करू ते सांगा.- ऋतुजा.
प्रथम उत्तम मार्कानी बीए, शक्य झाल्यास इंग्रजी विषयातून. त्या दरम्यान संगणक शिकून घे. तो वापरायची सवय ठेव. पदवी हातात येत असताना या दोनातून तुला एखादी सहाय्यकाची नोकरी मिळेल. आवडत्या विषयातून नोकरी कठीण. दोन वर्षे नोकरी करताना एमपीएससी परीक्षेचा अभ्यास प्राथमिक दृष्टय़ा पूर्ण करणे सहज शक्य आहे. केवळ घरच्या जबाबदारीशी याचा संबंध नसून, स्वत:च्या पायावर आर्थिकदृष्टय़ा सक्षम असलेली व्यक्ती स्पर्धा परीक्षेत यश मिळवते, असे आजवरचे आकडेवारीतून लक्षात येते. सध्या वृत्तपत्र वाचन व करिअर वृत्तांतचे वाचन हे मात्र चालू ठेव. पदवीला ऐंशी टक्के मार्क टिकवणे हे तुझे सध्या एकमेव ध्येय राहील.