डॉ. श्रीराम गीत
माझ्या मुलीने, मे २०२३ मधे दादर, मुंबई येथील केटिरग संस्थेमधून बी.एस्सी. हॉटेल मॅनेटमेंट हा कोर्स तिच्या आवडीनुसार पूर्ण केला आहे. आणि सध्या जून २०२३ पासून ती मुंबईत एका खासगी कंपनीत मार्केटिंग विभागात उमेदवारी करत आहे. यापुढे नोकरी च्या कोणत्या संधी तिला उपलब्ध आहेत? १ किंवा २ वर्ष अनुभव घेऊन पुढे चांगल्या संस्थेतून एमबीए करण्याचा तिचा विचार आहे. तरी तिच्यासाठी एमबीएमधील कोणते क्षेत्र तिच्या साठी योग्य राहील? तसेच एमबीए भारतातच करावे की परदेशात? – श्रीकांत अत्रे
हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण केल्यानंतर एका कंपनीत मार्केटिंगमध्ये ती उमेदवारीने काम करत आहे याचा अर्थ मला नीटसा लागला नाही. तिला हॉटेल इंडस्ट्रीज नोकरी करायची नाही का? तसेच असेल तर तिने एमबीए एंट्रन्स देऊन मार्केटिंगमध्ये एमबीए करणे हा रस्ता असू शकतो. ते भारतात करावे. सरकारी नोकरी नावाचा पर्याय या रस्त्यात फारसा येत नाही. सहसा हॉटेल मॅनेजमेंटमधील पदवी असली तर एमबीए करण्याच्या रस्त्याला फारसे कोणी जात नाही. खरे तर तिने हॉटेल व्यवसायातील तिशीच्या एखाद्या विद्यार्थिनीला भेटून विविध पर्याय समजावून घ्यावेत. आपण दिलेल्या उपलब्ध माहितीतून एवढेच मी सुचवू शकतो.
माझे १० वी व १२ वी कलाचे गुण अनुक्रमे ९६ व ९० टक्के आहेत. आता बी.ए.च्या प्रथम वर्षांची परीक्षा दिलेली आहे. कॉलेज करता करता स्पर्धा परीक्षेचा क्लास करून जोमाने अभ्यास करायचे ठरवले आहे. या वर्षीच्या पोस्ट ऑफिस जीडीएसच्या भरतीत सहज फॉर्म भरला तर, निवड झाली व कामावर रुजू झाले. ५-६ तासाचे असलेले हे काम करत अभ्यास ही उत्तम करता येईल असा समज होता; परंतु जॉब दरम्यान येत असलेल्या अनेक अडचणींमुळे म्हणावा तितका क्वालिटी टाईम अभ्यासाला देता येत नाही, हे आता लक्षात आले आहे. जॉब चालू ठेवून अभ्यास करावा की जॉब सोडून? या संभ्रमात आहे. घरची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. कृपया मार्गदर्शन करावे.- सई बांदल
प्रथम बीए ऐंशी टक्के मिळव. हे ध्येय तुला नोकरी चालू ठेऊन करणे शक्य आहे. पोस्टातील मिळालेली नोकरी सोडून फक्त बीए करण्यात काहीही अर्थ नाही. स्पर्धा परीक्षा हा विषय पदवीनंतर खऱ्या अर्थाने सुरू होतो. क्वालिटी टाईम, वेळ मिळणे वगैरे सगळे शब्द हातात उत्तम पदवी आल्यानंतरचे असतात. परीक्षेला बसले आणि मी सिलेक्ट झाले असे यूपीएससीच्या संदर्भात कधीच नसते. दहावी व बारावीचे टक्के लवकरात लवकर विसरशील तर या पुढच्या प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये तुझी दमदार तयारी होऊ शकेल. तुझ्यापुढे असलेले हजारो इंजीनियर या परीक्षांना बसणार आहेत. म्हणून हा उल्लेख करत आहे. पदवी हातात आल्यानंतर जोपर्यंत प्रीलीम परीक्षा पार करून मुख्य परीक्षेपर्यंत तुझी मजल जात नाही तोपर्यंत हातातली नोकरी सोडण्याचा विचार करू नये असे सुचवत आहे. घरचे सारे आर्थिकदृष्टय़ा कितीही चांगले असले तरी स्वयंपूर्ण असणे महत्त्वाचे ठरते.
मी २०१३ मधे एमएससी होम सायन्स पूर्ण केले आहे. २०१३ ते २०२२ मी आहारतज्ञ म्हणून रुग्णालयामधे जॉब केला आहे. मे २०२२ मधे मी रिझाईन केलं. सध्या मी एमपीएससीची तयारी करत आहे. ४ जून २०२३ च्या पूर्व परीक्षेत सी सॅट सुटले. स्व-अभ्यास करत आहे. वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी कुणी ओळखीच नाही, त्यामुळे शिकवणी घेण्याचा विचार करत आहे. २-३ वेळा परीक्षा देण्याचा विचार आहे कृपया मार्गदर्शन करावे. – आशा बोरुडे
आपली पदवी, दहा वर्षे केलेले काम, या दोन्हीचा एमपीएससी परीक्षेशी अर्था अर्थी फारसा संबंध नसताना आपण हा निर्णय घेतलेला आहेत. मात्र, परीक्षेचा आवाका नीट समजून घेतला असावा असे मी गृहीत धरतो. मी दोन-तीन अटेम्ट देणार आहे असं मोघम ठरवण्यापेक्षा नक्की किती ते ठरवावे. दैनंदिन रित्या पूर्ण लोकसत्तेचे वाचन व करिअरवृत्तांतचे अर्धा तास सलग वाचन याची तुम्हाला खूप गरज लागेल. मेंटॉरशिप घेण्याऐवजी किंवा क्लास लावणे आधी पाचवी ते बारावीची सर्व विषयांची पुस्तके नीट वाचून काढा. होम सायन्स व आहारतज्ज्ञ असल्यामुळे सायन्स विषय आपणास सोपे वाटतील पण समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल या संदर्भातील सामान्य ज्ञान वाढवायला लागेल. समासात स्वत:च्या नोट्सकाढून ठेवणे हे काम वाचता वाचता करणे गरजेचे राहील. एक उल्लेख करून ठेवतो. आपण नोकरी सोडून या रस्त्याला वळला आहात तेव्हा जे मिळेल ते पण स्वीकारून मग वरच्या पदाकरिता पुन्हा प्रयत्न करणे हा एक टप्पा सुचवत आहे त्यावरही विचार करावा.