● मी २८ वर्षांचा आहे, एमएससी, बीएड, एलएलबी केले आहे. मला यूपीएससी परीक्षा द्यायची आहे. पण मनात खूप सारे प्रश्न उपस्थित होत आहेत. मी एसटी प्रवर्गातील असल्याने मला ३८ वर्ष पर्यंत मला संधी आहे. ग्रामीण भागाचा असल्याने इंग्लिश फार जमत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.- शिवराम पाडवी

वयाच्या ३८ व्या वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतो म्हणून मी त्या रस्त्याला लागतो हा विचार पूर्णत: चुकीचा आहे. नेमके सांगायचे तर शास्त्र शाखेतून एमएससी आणि कायद्याची इंग्रजीतून शिकून घेतलेली पदवी हाती असूनही इंग्रजी विषयाबद्दल, इंग्रजी भाषेबद्दल, मनात साशंकता असेल तर ती सुधारण्याकरता प्रयत्न करणे हा सुरुवातीचा रस्ता आहे. तसेच यूपीएससीचा संपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती सध्या करिअर वृत्तांत मध्ये विस्ताराने येत आहे. त्याचे वाचन सुरू करावे. यंदाचे वर्ष आत्ता सुरू झाले आहे. वर्ष अखेरीपर्यंत त्या रस्त्याला जायचे का नाही याचा निर्णय तुमचा तुम्ही घेऊ शकाल. या उलट राज्य सेवा परीक्षा मधील गट ब व क यासाठी प्रयत्न केला तर यशाची शक्यता जास्त.

● मी बारावी सायन्सला आहे. मला प्रथम सत्र परीक्षेत इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र या विषयांत उत्तम गुण आहेत परंतु रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व जीवशास्त्र या विषयात कमी गुण आहेत. मला इंग्रजी विषयात करिअर करायचे आहे मी जळगाव जिल्ह्यात राहतो. स्पेशल इंग्रजी करण्यासाठी उत्तम कॉलेज कोणते? पदवीचे शिक्षण झाल्यानंतर माझ्यासाठी उत्तम पर्याय कोणते असतील?- भूमिका योगेश चौधरी

बारावी सायन्स नंतर कला शाखेत प्रवेश देण्यासाठी उत्तम कॉलेजे उत्सुक नसतात. तेव्हा उत्तम कॉलेज कोणते, हा विषय सोडून देऊन जळगाव मधील मोठ्या कॉलेजच्या कला शाखेला प्रवेश कसा मिळतो हा तुझ्या पुढचा महत्त्वाचा प्रश्न राहील. इंग्रजी विषयात गुण चांगले मिळतात या ऐवजी इंग्रजीवर व्याकरणात्मक प्रभुत्व आहे का? इंग्रजीतून निबंध लेखन करता येते का? इंग्रजीतून कोणत्याही विषयावर स्वत:ला व्यक्त करता येते का? या साऱ्या गोष्टींचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर इंग्रजी विषयातून बीए पदवी घेऊन तसे हाती काही लागणार नाही. बीएला इंग्रजी विषय घेऊन पदवी हाती आल्यानंतर मास कम्युनिकेशन, जाहिरात क्षेत्र, वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रम,अशा संधी तुझ्यासाठी उपलब्ध असतात. शाखा बदल आपण नक्की कशाकरता करत आहोत याचा विचार करण्यासाठी बारावीची परीक्षा झाल्यावर तुझ्या हाती १००दिवस आहेत. त्या दरम्यान नीट माहिती घे आणि मगच तो निर्णय अमलात आण.

● मी बीएच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. मला दहावीत ९१ टक्के तर बारावी सायन्सला ८० टक्के गुण होते. इयत्ता ८वी पासून द हिंदू आणि लोकसत्ता चे वाचन करते. राज्य शास्त्र, इतिहास व भूगोल असे विषय आहेत. तीन वर्षांनी स्टाफ सिलेक्शन कमिशन व यूपीएससी परीक्षा द्यायची आहे. यावर मार्गदर्शन करावे. या सर्वांच्या शेवटी राज्यशास्त्र विषयात पी.एचडी करणे शक्य आहे का?- नियती घागरुम

तुला एक वेगळा रस्ता सुचवत आहे, तो तुला मान्य झाल्यास विचार करावा. यूपीएससीचा अभ्यास व स्टाफ सिलेक्शनसाठी चा अभ्यास पूर्णपणे वेगळा असतो. पदवी दरम्यान स्टाफ सिलेक्शन साठी जोरदार तयारी करून प्रथम मिळेल ती नोकरी हाती घ्यावी. त्यानंतर यूपीएससीचा विचार करण्याकरता आर्थिक स्थैर्य व वयानुसार सखोल समज वाढेल. नोकरी करताना बहिस्थ पद्धतीत राज्यशास्त्रात एमए पूर्ण केले की मग यूपीएससीचा जोरदार प्रयत्न करणे तुला सहज शक्य आहे. त्यावेळी तुझे वय जेमतेम २५ किंवा २६ असेल. पूर्ण प्रयत्न करून त्यात यशाची शक्यता वाढेल. ते नाही जमले तर नोकरी चालू ठेवून राज्यशास्त्रात डॉक्टरेट यथावकाश होऊ शकते. त्यानंतरचे निर्णय तुझ्या हाती राहतील. शेवटचा एक उल्लेख गरजेचा, हिंदू किंवा लोकसत्ता यांच्यातील विषयांवर तुलनात्मक वैचारिक निबंध लेखन तुला जमते का? तशी टिप्पणी तयार करता येतात का? असा विचार करणे गरजेचे आहे ही यूपीएससीची प्राथमिक गरज असते.

Story img Loader