माझ्या मुलाचे वय २१ आहे. त्याला बारावीला गणितासहित कॉमर्सला (BAF) ९० टक्के आहेत. त्याला ८.९३ पॉईंट आहे. तो दोन वेळा सीए एंट्रन्स बसला होता. पण पास झाला नाही. एमबीएच्या कॅट आणि सीईटीत मेरीटला आला नाही. त्याला सीएमए करायचे आहे. ते काय आहे? तो सक्सेसफुल होईल का? प्रायव्हेट कंपनी त्याला घेतील का? त्यात भविष्य काय आहे? त्या कंपनी सीएला प्राधान्य देतात का? दुसरा कोणता करिअरसाठी ऑप्शन आहे? सध्या तो महिना सात हजार रुपयांवर सीएकडे काम शिकत आहे. कृपया मार्गदर्शन करा. – दीपक शिंदे.

मुलाने सध्याचे काम चालू ठेवावे, जोडीला डीटीएल संपवावे. टॅक्सेशन संदर्भातील हा कोर्स पूर्ण केल्यानंतर टॅक्स कन्सल्टंट म्हणून त्याला काम करण्याची संधी मिळेल. सीएमए,सीए,सीएस या तीनही अभ्यासक्रमामध्ये ६० साम्य असते. सीएची पूर्व परीक्षा आणि एमबीएची सीईटी त्याने यशस्वीरित्या पूर्ण न केल्यामुळे सीएमएच्या रस्त्याला जाणे धोकादायक ठरेल. मुलाने कॉमर्स शाखेतील अवांतर वाचन वाढवून व्यवहार ज्ञानावर भर द्यावा. हा रस्ता स्वत:च्या व्यवसायाकडे जाणारा असा आहे. सीएमए मुलगा कधी पास होईल व त्यानंतर कोणत्या स्वरूपाची नोकरी मिळेल हे आता सांगणे कठीण आहे. म्हणून हा वेगळा सुसंगत रस्ता सुचवत आहे.

मी कल्याणमध्ये राहते. मला १२ वी मध्ये कॉमर्स शाखेमध्ये ७५ टक्के होते. सध्या माझे एसवाय संपले आहे. मी एक वर्षाचा आयटीआय कोपा ट्रेड मधून केला आहे, तसेच अदाणी इलेक्ट्रिसिटीमध्ये एक वर्षाची उमेदवारी केली आहे. मला अजून पुढे काय करता येईल? – अंकिता.

पुढे काय करता येईल या विचारापेक्षा बी कॉमला ७५ टक्के टिकवणे हे एकमेव ध्येय तू ठेव. आयटीआयचा कोर्स आणि इंटर्न ची पूर्ण केल्यामुळे कामाचा अनुभव आहे. बीकॉम नंतर मिळेल ती नोकरी घेऊन एक वर्षानंतर एमबीए करण्याचा विचार करावा. नोकरी दरम्यान त्याच्या प्रवेश परीक्षेची तयारी करणे तुला नक्की शक्य होईल.

सध्या माझे वय २२ वर्षे असून थोडक्यात माझी शैक्षणिक पार्श्वभूमी येथे नमूद करत आहे. २०१७ साली इयत्ता दहावीमध्ये ९२, कला शाखेतून इयत्ता बारावीमध्ये ७८,बीए (संस्कृत) करुन बीएड केले.सोबतच डिस्टन्स लर्निंग या माध्यमातून एम.ए. (संस्कृत साहित्य) करतो आहे .सध्या शाळेत आणि खाजगी क्लासमध्ये संस्कृत शिक्षकाची नोकरी करत आहे. अनुभवासाठी एक वर्ष नोकरी करून पुढे यूपीएस्सी परीक्षेची दिल्लीत जाऊन तयारी करण्याचे ठरवले आहे ज्यामागील कारणे मला माहीत आहेत. त्याचे किमान २ प्रयत्न पूर्ण वेळ देऊन करेन आणि त्यातही यश नाही मिळालं तर तिसरा. त्याच्या पुढचे प्रयत्न एखाद्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करता करता करेन असा विचार आहे. यादरम्यान जर का केंद्र सरकार, राज्य सरकार मार्फत एखादी शिक्षक भरती निघाली तर तिथेही प्रयत्न असेलच. हा एक मार्ग डोक्यात आहे आणि दुसरा मार्ग म्हणजे खरतर शिक्षक म्हणून काम करायला मला आवडतं आहे. आंतरवासितेमध्येही तसेच सध्या शिक्षक म्हणून करत असलेल्या पहिल्या नोकरीत मी अनुभवतो आहे परंतु एकंदरीत भारतातील सध्याची परिस्थिती, कंत्राटी पद्धत पाहता शिक्षकांचे भविष्य थोडे अनिश्चित आहे असे वाटत आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या ३-४ प्रयत्नांनंतर संस्कृत विषयातच शिक्षण असल्यामुळे जर्मनीमध्ये अध्यापनाच्या संधी मिळतील का त्याबद्दल विचार चालू आहे. भविष्याचा विचार करून पुढील महिन्यापासून जर्मन भाषा शिकायला सुरुवात करणार आहे. पण जर्मनीमध्ये संस्कृत अध्यापनाचा रस्ता नेमका कसा आहे, खरंच तिथे संस्कृत अध्यापनाच्या संधी उपलब्ध आहेत का याबद्दल काहीच कल्पना नाही. ते सांगावे. – अथर्व

-तुझी शैक्षणिक वाटचाल वाचली. पहिले ध्येय यूपीएससी, दुसरे शिक्षकी पेशातील सरकारी नोकरी, तिसरे जर्मनीत जाऊन संस्कृत शिकवणे. यूपीएस्सी हा प्रकार काय आहे हे समजून घे. त्यासाठी किमान एक वर्ष द्यावे लागेल. तो सगळा अभ्यास तुझ्या वाटचालीशी फारसा संबंधित नाही.वैकल्पिक विषय कोणता घ्यायचा याचा निर्णय त्यादरम्यान घेऊ शकतोस. त्यासाठी लागणारा खर्च, घरच्यांचा पाठिंबा, व किती वर्षे परीक्षा द्यायची या साऱ्या गोष्टींचा कागदावर आराखडा तयार करून मग सुरुवात करावीस. केंद्रीय विद्यालयासाठी किंवा नवोदय विद्यालयासाठी शिक्षकांची भरती केली जाते त्याच्या जाहिरातीवर लक्ष ठेवून त्या निवड प्रक्रियेत यश मिळाले तर तोही रस्ता चांगला आहे. जर्मनीत संस्कृत शिकवण्यासाठी उत्तम जर्मन येणे आवश्यक आहे. त्याकरता सहाव्या पातळीची मॅक्समुल्लरची परीक्षा पास होणे गरजेचे राहील. कदाचित मॅक्समुल्लर मधून याचे मार्गदर्शन मिळू शकते किंवा डाड या जर्मन सरकारच्या माहिती देणाऱ्या संस्थेतून हे कळू शकेल. या वाटचालीमध्ये स्वत:चे मार्क कृपया विसरून जावे. याचे एकमेव कारण म्हणजे या तिन्ही पातळ्यांसाठी या स्वरूपाचा बायोडाटा असणे ही किमान गरज असते. स्पर्धा त्यांच्यातूनच सुरू होते व यश मिळते.