डॉ.श्रीराम गीत
नमस्कार मला १० वी ला ७४.८० व १२ वी ला ८२ टक्के होते सध्या मी कला शाखेतून द्वितीय वर्षांतील प्रथम सत्र परीक्षा दिली आहे. बीए च्या प्रथम वर्षांपासून मी लोकसत्ता वर्तमानपत्रासहित करिअर वृत्तांत आवर्जून वाचून संग्रहित करून ठेवलेले आहेत आणि एक जसं येईल तसं इंग्रजी वर्तमान पत्र देखील वाचत आहे मला मराठी माध्यमातून परीक्षा द्यायला काही हरकत नाही परंतु यूपीएससीसाठी आवश्यक असलेलं इंग्रजी आणि गणित हे विषय अडथळा आणत आहेत माझा प्रश्न आहे की मी खेडेगावात राहून इंटरनेटच्या मदतीने कोचिंग शिवाय यूपीएससीमधील कोणतेही पद मिळवू शकतो का? आणि असेल तर इथून पुढे कशी तयारी करू? आणि जरी यश नाही मिळाले तर मला या परीक्षेतील प्लॅन बी साठी कशी मदत होईल? – ओंकार जोशी
इंडियन एक्स्प्रेस मधील लेख, अग्रलेख व बातम्या प्रथम वाचणे. त्याच बातम्यांचे मराठीतील रूपांतर किंवा दिलेली बातमी लोकसत्तात मराठीत वाचणे हा रोजचा अध्र्या तासाचा तुझा कार्यक्रम राहिला पाहिजे. जे इंग्रजी शब्द कळणार नाहीत ते अधोरेखित करून डिक्शनरीतून त्यांचा अर्थ समजावून वही ते लिहून ठेवणे हा त्या पुढील टप्पा. आवडलेल्या मराठी विषयावरील स्वत:चे टिप्पण इंग्रजीमध्ये लिहिण्याची सवय लावून घे. ज्यावेळी अशी टिप्पणी सलग दोन पाने लिहिता येतील तेव्हा इंग्रजीशी मैत्री होईल. खरे तर बीएचे सर्व विषयांवरील अवांतर वाचन इंग्रजी पुस्तकातून करणे हाही एक प्रकारे यूपीएससीचा अभ्यासच असतो. सी-सॅटचा अभ्यास तुलाच करायचा आहे. इंटरनेटवरच्या अभ्यासातून पूर्व परीक्षा दोन प्रयत्नात जर पास झालास तर तुझे गावात राहून परीक्षा देण्याचे स्वप्न शक्य आहे. अन्यथा क्लास लावण्याची गरज राहील. पर्यायी रस्त्याचा विचार पदवी हातात आली त्यातील मार्क पडले तर विषयानुरूप तुला ठरवणे शक्य आहे. त्याचा आत्ता विचार नको.