मला दहावीत ७८.८० टक्के, बारावी सायन्सला ८७.९० टक्के असून सध्या मी बीएचएमएसला आहे. माझा पदवीनंतर स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार आहे. सध्या मी वृत्तपत्र वाचनास सुरुवात केली आहे. (लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस, द हिंदू) पदवीमध्ये मी काय करायला पाहिजे? याबद्दल मला सविस्तर मार्गदर्शन करावे.
- श्रुती म्हैसने
होमिओपॅथीतला मेडिकलचा अभ्यासक्रम ही मजेत शिकण्याची गोष्ट नाही. पदवी हातात आल्यानंतर तुला इंटर्नशिप देखील करायची आहे. त्यानंतर मॉडर्न मेडिसीन मधला ब्रिज कोर्स करायची इच्छा आहे का नाही हे तुझ्या लिहिण्यात नाही. स्पर्धा परीक्षेत यश न मिळाल्यास पुन्हा प्रॅक्टिसमध्ये जाण्याचा तो राजमान्य रस्ता आहे. तुझे दहावी व बारावी शास्त्राचे गुण चांगले असले तरी अखिल भारतीय तीव्र स्पर्धात्मक नीट परीक्षेत तुझे खूप कमी मार्क आले आहेत हे मी नोंदवतो. असे का झाले यावर तुला नीट आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नीट मधून हवे ते मिळाले नाही म्हणून तू यूपीएससीकडे वळत आहेस का? यावर जरा गंभीरपणे विचार करावा. अजून एका गोष्टीचा शोध तुला घ्यायचा आहे, तो म्हणजे होमिओपॅथित डॉक्टर झालेल्या किती व्यक्तींनी एमपीएससी यूपीएससी मध्ये यश मिळवले आहे? माझ्या माहितीप्रमाणे अशा व्यक्ती फार नाहीत. मी पेपर वाचायला सुरू केले आहे असे तू लिहिले आहेस. ते फक्त सुरू ठेव आणि करिअर वृत्तांत च्या अंकांचे वाचन करून त्याची एक फाईल बनवून ठेव त्याचा उपयोग होईल. सातत्याने प्रथम वर्ग मिळवून पदवी हातात आल्यावर इंटर्नशिपच्या दरम्यान खरा अभ्यास सुरू करावा असे मी आवर्जून सुचवेन. पदवीदरम्यान अन्य अभ्यास करायला गेलीस तर पदवीच्या गुणांमध्ये उतरण सुरू होईल.
सर, मी सध्या इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक पूर्ण केले आहे. मी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण माझी आर्थिक परिस्थिती स्थिर नाही. मी या तयारीत दुसरी परीक्षा देऊ शकतो का आणि जर दिली तर त्याचा माझ्या अंतिम तयारीवर परिणाम होऊ शकतो का?
- अभिषेक लोमटे
इलेक्ट्रिकल शाखेमधील पदवी हातात असताना आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणून नोकरी करणे सोडून पळत्याच्या म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या मागे लागणे हे चुकीचे ठरेल. मला मान्य आहे की इलेक्ट्रिकल इंजिनीअरला चांगला पगार मिळत नाही. पण स्वत:च्या पायावर उभा राहून आर्थिक स्वास्थ्य मिळवणे ही प्राथमिक गरज आहे. आधी तुझ्या शिकण्याच्या क्षेत्रात नोकरी शोध, उमेदवारी करून नोकरीत पगार वाढतो. तीन वर्षांत रोज एक तास यूपीएससीचा अभ्यास करणे किंवा इंजिनीअरिंग सर्व्हिसेससाठी तयारी करणे यातील एक पर्याय तुला सहज निवडता येईल. तेव्हा पुरेसा अभ्यास झालेला असेल व यशाची शक्यता वाढेल. पहिल्या प्रयत्नात यश किती, कसे मिळते यावर नोकरी सोडण्याचा विचार करावा. तरीसुद्धा तुझ्या हाती किमान सात वर्षे राहतील. आर्थिक शांतता नसेल तर अभ्यास करण्याकरता मानसिक शांतता कधीच राहात नाही.
मी, २०२० मध्ये डिप्लोमा पूर्ण केला. २०२३ मध्ये मेकॅनिकलची पदवी पूर्ण केली. सध्या मी पॉलिटेक्निकमध्ये व्याख्याता म्हणून काम करत आहे. २०२० साली कॉलेजमधून बजाजला निवडलो होतो. २०२३ ला पदवी पूर्ण झाल्यानंतर एका इंडस्ट्रीत ११ लाखांचे पॅकेज आणि आता २०२४ मध्ये टेस्ला (कॅलिफोर्निया ) या ठिकाणी १८ लाखाचं पॅकेज ऑफर झाले होते. पण सर मला फक्त सरकारी नोकरी मिळावी म्हणून मी प्रयत्न करत आहे. मी पुढे शिक्षणासाठी एमबीए करावे की एमई करावे याबाबत संभ्रमात आहे. पुढे काय केलेले योग्य असेल?
- सागर पाटील
तू दिलेल्या सर्व माहिती मध्ये कच्चे दुवे भरपूर आहेत. भोपाळची नोकरी किंवा टेस्लामधली १८ लाख वार्षिकची ऑफर न घेता पॉलिटेक्निक मध्ये लेक्चरर म्हणून नोकरी तू का स्वीकारली? हे मला कळलेले नाही. सरकारी नोकरी हवी असे म्हणताना सरकारी नोकरीतील जास्तीत जास्त पगार टेस्लाने पहिल्याच दिवशी तुला देऊ केला होता. तुझे आजवरचे शैक्षणिक वाटचालीतील कोणतेच मार्क कळवले नाहीस. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याबाबत मी काहीच सांगू शकत नाही. एमबीएचा सरकारी नोकरीशी संबंध नाही. सध्याच्या लेक्चररच्या नोकरीमध्ये प्रगती हवी असेल तर नोकरी करता करता येणे करणे हा पर्याय तुझ्यासमोर उपलब्ध आहे. त्याचा प्राधान्याने विचार करावा. त्या रस्त्याला कोणतीही अडचण येणार नाही.
careerloksatta@gmail. com