एम. ए. राज्यशास्त्र च्या प्रथम वर्षाला शिकत असून, त्यासोबत स्पर्धा परीक्षेची (एमपीएससी) तयारी तीन वर्षांपासून नाशिकला करत आहे. बीएला ८१ टक्के मिळाले आहेत. पुढे करिअरच्या आणखी कोणत्या संधी उपलब्ध आहेत? राज्यसेवेच्या नवीन २०२५ च्या पॅटर्न नुसार कशा पद्धतीने अभ्यास करायला हवा ?
– आदित्य बोराडे
राज्यशास्त्राचा उपयोग, उपयोजन कुठे कुठे करायचे याची तुलाच माहिती गोळा करायची आहे. ती करण्याकरता संपूर्ण एक वर्ष तुझ्या हाती आहे. कोणालाही शिक्षण क्षेत्रात नोकरी मिळण्याची शक्यता जवळपास नाही. तुझे शिक्षण मराठीतून का इंग्रजीतून याचा उल्लेख नाही. म्हणून कॉम्प्युटरचा उत्तम वापर शिकून घेणे, लेखी व बोली इंग्रजी वाढवणे यातून पदवीधर म्हणून तुला बऱ्या नोकरीची सुरुवात करणे शक्य आहे. त्याचा शोध घे. त्यानंतर राज्यसेवा स्पर्धा परीक्षांचा रस्ता खऱ्या अर्थाने सुरू होतो. नाहीतर हाती ना नोकरी ना पद अशा अवस्थेत वय वाढत जाते. एकीकडे वृत्तांतचे वाचन हाच अभ्यास.
माझं बी.कॉम ७.२३ सीजीपीए ने पूर्ण झालं आहे. युपीएससीला बसणं हे स्वप्न मी शाळेत असताना पाहिलं होतं. दहावीला थोडे चांगले मार्क मिळाले म्हणून क्लासच्या सरांनी सल्ला दिला की बी.कॉम. करून स्पर्धा परीक्षा देऊ शकते. एक वर्षापासून तयारी करते आहे. बऱ्यापैकी अभ्यास होत आला आहे. माझा विषय मराठी साहित्य आहे. २०२५ ला मी पहिला प्रयत्न करणार आहे. मला माहित आहे स्पर्धा परीक्षा कोणाच्या हातात नसते. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा करत असताना प्लॅन बीचे महत्व थोडक्यात सांगावे. मला मार्गदर्शन करावं की मी काय करावे? मी रेल्वेची परीक्षाही देणार आहे.
– कोमल माने
कोमल, तुझ्या अपेक्षेनुसार तू पहिला प्रयत्न यूपीएससीचा २५ साली देऊन बघ. त्यात काय होते याचा अंदाज घे. तुझी संपूर्ण वाटचाल व मार्क पाहता राज्यसेवा स्पर्धा परीक्षातील विविध पदांकरता एकत्रित परीक्षा तू देणे जास्त हितकर आहे असे मला वाटते. सी सॅटचा पेपर तुला कठीण असेल. एखादे पद किंवा नोकरी हाती आल्यानंतर आर्थिक स्थैर्य मिळते त्यालाच प्लॅन बी म्हणतात. तो विचार तुलाच करायचा आहे. त्यानंतर पुन्हा केंद्रीय स्पर्धा परीक्षांची तयारी तू करू शकतेस त्यासाठी तुझ्या हाती वय ३२ पर्यंत वेळ आहे.
मी बारावीत शिकत आहे. मला दहावीत ९२ टक्के आहेत आणि आता १२ वी चांगल्या पद्धतीने करत आहे, माझा प्रश्न असा आहे की मला पहिल्यापासून स्पर्धा परीक्षा कोणीतरी अधिकारी व्हायचे स्वप्न आहे. माझे वडील वनरक्षक आहेत, तर मी सुद्धा बारावीनंतर वनरक्षक भरती होऊन बाहेरून बीएससी अशी पदवी घेऊ शकतो का? पदवी होईपर्यंत, वनरक्षक नोकरी करताना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू का?
– प्रतीक मुटके
तुझे वडील वनरक्षक आहेत त्यांच्या मदतीने वनखात्यात काम करणाऱ्या विविध माणसांना भेटून शिक्षणाची, परीक्षांची, अभ्यासाच्या कष्टाची अधिक माहिती घे. बारावी नंतर तू वनरक्षक बनण्याचा रस्ता नक्की नको. तुझे आजवरचे मार्क टिकवून पदवी घे. त्यातून उत्तम रस्ता सुरू होतो. पदवीनंतर राज्यसेवा स्पर्धा परीक्षेतील अन्य पदांकरताही तू विचार करू शकतोस.