माझ्या मुलीने एमबीए फायनान्स केलेले आहे. त्यात प्रथम दर्जा तिने प्राप्त केलेला आहे. आता तिचे वय वर्षे ३४ आहे. पाच ते सहा बँका बदलत ती आता कोटक महिंद्रा बँकेत नोकरीला असून प्रबंधक आहे. पण तिच्या नोकरीचे स्वरूप पाहता तिच्या एमबीएचा उपयोग होताना दिसत नाही.आता तिला पुढच्या पायऱ्या गाठण्यासाठी काय करावे लागेल? कोणता कोर्स केल्यास पुढील आयुष्यात तिची सतत प्रगती होत राहील किंवा तिने कोणता कोर्स केल्यास तिला बँकेऐवजी दुसरीकडे संधी उपलब्ध होऊ शकेल? कंपनी सेक्रेटरी करावे की आणखी काही, यावर मार्गदर्शन करावे.— विजयकुमार इंदिरा वासुदेव माने
आपल्या मुलीची करियरची काळजी आपण करणे सोडून द्यावे ही मला पहिली विनंती करावीशी वाटते. सीएसचा विचारही नको. दहा वर्षे विविध बँकिंग सेक्टर मध्ये काम केल्यानंतर त्यात प्रगती कशी होऊ शकते हे आपल्या कन्येला चांगले माहिती आहे. एखाद्या व्यक्तीच्या एमबीएचा आणि कामाचा संबंध कसा जोडावयाचा हे नोकरी देणाऱ्या कंपनीला चांगले माहिती असते. तो केला जात आहे. कोणत्याही बँकेमध्ये ट्रेझरी आणि मार्केटिंग ही दोन महत्त्वाची खाती असतात. या दोन खात्यामध्ये शिरकाव करून घेतला तर कोणाचीही वैयक्तिक प्रगती होत जाते. पण तो कधीही सोपा नसतो. सध्याची नोकरी सोडून बदल कसा करायचा, कोणत्या बँकेमध्ये जायचे वा नाही हे आपल्या कन्येला ठरवू देत. नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स मध्ये काम करणे हे जोखमीचे असते. ती जोखीम घ्यायची व नाही हे तिने ठरवावे.