मी (वय २९) सध्या नुकत्याच झालेल्या सरळसेवामध्ये नियुक्त कनिष्ठ अभियंता पदावर जि. प. भंडारा स्वगावी कार्यरत आहे. मला सिव्हिल इंजिनीअरिंगमधील एमपीएससी क्लास १ साठी प्रयत्न करायचा आहे, याबद्दल मार्गदर्शन करावे.- हरीश कुंभारे.
तुमची शैक्षणिक वाटचाल व किती वर्षे नोकरी झाली आहे याचा कोणताही उल्लेख नाही. तो असता तर नेमके उत्तर देता आले असते. मी फार दूरवरचा विचार न करता आर्थिक फायद्याच्या दृष्टीने उत्तर देत आहे त्यावर वाटल्यास आपण विचार करावा. स्वत:च्या गावी सध्या नोकरी मिळाली आहे, त्यामुळे राहण्याचा महिना पंधरा हजार खर्च वाचत आहे. बदली फारतर त्याच जिल्ह्यात होईल. वय २९ नंतर सरळसेवा भरतीतील अशी आजची नोकरी सोडून समजा क्लासवन पदाची अभियंत्याची नोकरी मिळाली, तरी लहान वयाच्या अभियंत्याच्या हाताखाली काम करणे आपल्याला आवडेल का? तसेच सातत्याने राज्य भरात होणाऱ्या बदल्यांचाही विचार करावा. उशिरा नोकरीत शिरून पद मिळाले तरी हे प्रश्न समोर उभे ठाकल्यावर नकोसे वाटतात आणि याची चर्चा संबंधित तयारी करून घेणाऱ्यांना माहिती असली तरीही कोणी करत नाही. थेट उदाहरण द्यायचे झाले तर २४ वर्षांच्या क्लासवन अभियंत्याच्या हाताखाली ३६ वर्षांचा नवीन दाखल झालेला प्रोबेशनरी अभियंता असला तर काम करणे अनेकदा मनस्तापाचे ठरते. सर्व परिस्थिती आपल्यासमोर ठेवली आहे त्यावर विचार करून आपणच निर्णय घ्यावा.
काहीही करून कोणत्याही वयात सरकारी नोकरीत पद काढायचे अशा पद्धतीत विचार करणाऱ्या इच्छुक लाखो पदवीधरांना ह्यकदाचितह्ण, हे उत्तर विचार करण्यास भाग पाडेल.
२०२० मध्ये मी अॅनालिटीकल केमिस्ट्रीमधून मास्टर्स केले. तेव्हापासून मी एका फार्मा कंपनीत क्यूसी केमिस्ट म्हणून काम करत होते. अलिकडेच मी राजीनामा दिला कारण मला या क्षेत्रात काही वाढ दिसेना. काही नवे शिकायलाही मिळत नव्हते. पगारही फार नव्हता. मी एक कोर्स केला, जेणेकरून क्लिनिकल रिसर्चमध्ये काम करता येईल. हा कोर्स एप्रिलमध्ये संपेल. आता मी एमबीए करण्याचा विचार करत आहे. माझे दोन प्रश्न आहेत – क्लिनिकल रिसर्चमध्ये करिअर करायचे असेल तर कोणते एमबीए करावे आणि लवकरात लवकर नोकरी मिळण्यासाठी आणखी काय शिकण्याची आवश्यकता आहे?- आदिती वडके
आपण २०२० मध्ये केमिस्ट्री विषयात मास्टर्स पूर्ण केले आहे. त्याला आता चार वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. क्लिनिकल रिसर्च कोर्स यंदा संपेल. पण त्यातील कामाची सुरुवात म्हणून तुम्हाला एक-दोन वर्षे उमेदवारीतच घालवावी लागतील. बायोलॉजी किंवा फार्मसी ची पार्श्वभूमी असेल तर या कोर्सचा खऱ्या अर्थाने उपयोग होतो. याला तुम्ही प्रवेश कोणत्या कारणाने घेतला हे मला कळलेले नाही. एमबीएचा व या कोर्स चा काहीही संबंध नाही. यानंतर एमबीएची प्रवेश परीक्षा देऊन ते दोन वर्षांनी पूर्ण करण्यात नोकरीच्या दृष्टीने फारसा फायदा होणार नाही. आपले घेतलेले सर्व निर्णय मला कोणत्याही दृष्टीने सुसंगत वाटत नाहीत. ते सांगणे मात्र माझे काम आहे, हे वास्तव लक्षात घ्या. मना जोगते काम, मना जोगता पगार, अपेक्षेप्रमाणे त्यात होणारी वाढ या करता नोकरीत कोणताही बदल करताना त्यात काम करणाऱ्या व्यक्तींकडून मार्गदर्शन घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्या अर्थाने क्लिनिकल रिसर्च मध्ये काम करणाऱ्या किमान तीन व्यक्तींना भेटा व माहिती घ्या एवढेच मी येथे सुचवत आहे.
careerloksatta@gmail. Com