मिलिंद आपटे
मी सध्या तृतीय वर्ष कला शाखेत शिकत असून, मला एमपीएससी करायची आहे. मी तयारीही सुरू केली आहे. मी कॉलेजमध्ये ग्रंथालयात काम करतो, पण इथे पगार ७ हजारच मिळतो आणि ते अर्धवेळ काम आहे. माझा एक विचार होता की पुढे प्लॅन बी मध्ये मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स करावे. पण यात खरं करिअर आहे का आणि आता माझे वय १९ वर्ष आहे. माझे मन खूप विचलित राहते. आधी अभ्यास नीट व्हायचा पण आता मन भरकटते. आळस येतो. मला मार्गदर्शन करा की मी मास्टर पॉलिटिक्स मध्ये करू का मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून करू?
– सचिन बोरकर
– पार्टटाइम काम व शिक्षण सुरू आहे, एमपीएससी द्यायची इच्छा आहे, हे सगळे कौतुकास्पद आहे, ग्रंथालयाचा फायदा करून घ्या MLib करणे हा पूर्णपणे तुमचा निर्णय राहील, कारण संधी कधी आणि कोणत्या भावात पडेल सांगता येत नाही, पार्ट टाइम काम करून शिक्षण घेणाऱ्या व्यक्तिमध्ये चिकाटी आणि जिद्द दिसते, त्यालाच आकार देणे हे माझे काम मी समजतो. त्यामुळे एमपीएससीकडे फोकस कर, उगाच प्लान बी चा विचार नको, जिद्दीने तयारी कर, भरपूर सराव कर, अंकगणिताकडे विशेष लक्ष दे. मास्टर हे राज्यशस्त्र किंवा समाजशास्त्र या मध्ये करावेस असे वाटते.
मी सध्या बारावी (विज्ञान) ला आहे. मला दहावी ला ८५.२० होते. गणितात ९२ व विज्ञानात ८४ गुण होते. मला भौतिकशास्त्र व गणित या विषयांची खूप आवड आहे. मला स्पेस सायंटिस्ट किंवा अॅस्ट्रोफिजिक्स मध्येच करिअर करायचे आहे. हे बारावीचे वर्ष बघता बारावीत ८५ किंवा अधिकची अपेक्षा आहे. मला जेईई न देता, पुढे काय करावे याचे मार्गदर्शन करावे. पुढे कोणती परीक्षा द्यावी हेही सांगावे. दुसरे पर्याय काय असावेत हेही सांगावे.
– देवांग शिंदे
– तुझ्या गुणांवरुन नक्कीच तू विज्ञानाचा एक चांगला विद्यार्थी आहेस, पण जेईई न देता तुला तुझ ध्येय गाठायचे आहे. त्यासाठी BSc भौतिकशास्त्र, गणित या विषयासोबत पूर्ण करणे किंवा फिजिक्स ऑनर्स करावे, त्यानंतर JAM , JEST, GATE, या परीक्षांद्वारे आयआयटी, टीआयएफआर, आयआयएपी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स) मधून एमएससी एमटेक पूर्ण करणे आणि पुढे पीएचडीसाठी विषयाची निवड करणे असा मार्ग आहे. पण खूप मेहनत आणि जिद्द या साठी आवश्यक आहे. मार्ग खडतर आहे हे सतत लक्षात असू दे.
careerloksatta@gmail.com