डॉ. श्रीराम गीत
नमस्कार सर, मला संरक्षण दलात जायचे आहे. त्यातही माझे भारतीय वायू सेनेत जाण्याचे ध्येय आहे. तर मी आता एनडीएची तयारी करत आहे. अजून कुठल्या पातळीवर मी माझा अभ्यास करू शकतो? मला १० वीला ९१ तर १२ वीला ६१ टक्के आहेत. मी विज्ञान या शाखेतून शिकत आहे.- रमेश माने
गणिताचा बारावीचा अभ्यास खूप वाढवणे गरजेचे आहे त्यात ऐंशी मार्क तरी हवेत. एनडीए परीक्षेत गणिताचा स्वतंत्र पेपर असतो. त्या परीक्षेतून यश मिळाले तर हवाई दलाचा प्रवेश मिळण्याची शक्यता निर्माण होते. अन्यथा इंजिनिअिरग पूर्ण करून एफकॅट नावाची परीक्षा देऊन तुला हवाई दलात प्रवेश मिळू शकतो. अभ्यासाच्या जोडीला शारीरिक तंदुरुस्ती वाढवणे सुद्धा गरजेचे असते.
मला १२ वी नंतर मॅनेजमेंट स्टडीज करायचे आहे. त्यात नोकरीच्या दृष्टीने वाव आहे का? तसेच इतर काय पर्याय असू शकतात? कृपया मार्गदर्शन करावे. तसेच मी तबल्याच्या ६ परीक्षा दिल्या आसून त्यात मला गती आहे. – सानिका मोहले
तबल्याच्या किती परीक्षा दिल्या म्हणण्यापेक्षा तो साथीचा आणि हौशीचा विषय आहे. तो चालू ठेवायला हरकत नाही. त्यातून अर्थार्जन किंवा करिअर करण्याकरिता अजून किमान दहा वर्षे लागू शकतात, हे नीट लक्षात घे. बारावीनंतर मॅनेजमेंट स्टडीच्या अभ्यासक्रमाला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. चांगले कॉलेज मिळाले तर नंतर कॅम्पसमधून कदाचित नोकरीची शक्यता निर्माण होते. मार्केटिंग किंवा सप्लाय चेनमध्ये नोकरी मिळाली तर अनुभवानुसार प्रगती होत जाते. दोन वर्षे कामाचा अनुभव घेतल्यावर एमबीए करायचे की नाही याचा निर्णय तुझा तूच घेऊ शकशील. ज्या संस्थेत प्रवेश देणार आहेस तेथून पास झालेल्या कुठल्याही विद्यार्थ्यांला भेटून अधिक माहिती घेणे हा सगळय़ात उपयुक्त रस्ता ठरतो. प्रवेश घेताना याची काळजी घ्यावी.
मला दहावी मध्ये ८८.४० टक्के होते आणि बारावीमध्ये ८५ टक्के होते. आता मी बीकॉम पहिल्या वर्षांला आहे. मला एमपीएससीची तयारी करायची आहे. तर मला काहीच समजेनासे झालेय. मी काय करू? कुठून सुरुवात करू? आता सध्या मी खो खो खेळते आणि पूर्ण दिवस वेळ मिळत नाही. तर कृपया मला मार्गदर्शन करावे. – वैष्णवी सुरवसे
सध्या खूप खेळणे व त्यातून जे जे साध्य होईल ते करावे. याच्या जोडीला बीकॉमसाठी ६५ टक्के टिकव एवढेच कर. एमपीएससीची तयारी वगैरे बाजूला ठेवावीस. कॉमर्समधून करिअर करायचे का खेळातून करायचे का एमपीएससी करायचे हा सारा निर्णय बीकॉम झाल्यावर तू घेऊ शकतेस. अन्यथा तिन्ही गोष्टींमधे पुरेसा वेळ मिळणार नाही. खेळता खेळता बीकॉम ला ६५ टक्के मार्क मिळवणे सहज शक्य आहे. येथे तीन वर्ष लोकसत्ताचे रोज संपूर्ण वाचन व करिअर वृत्तांतची कात्रणे काढून ठेवणे हे पुरे.
माझी मुलगी मृण्मयी ही सृष्टी मणिपाल इन्स्टिटय़ूटमधून डिझाईन करत असून सध्या शेवटच्या वर्षांत आहे. तिचे मेजर क्रिएटिव एज्युकेशनमधे आहे. तिच्या ग्रेड सातत्याने चांगल्या आहेत. गेल्या वर्षी एक सेमिस्टर ती एका प्रोग्राम अंतर्गत नेदरलँडला एचकेयु विद्यापीठात जाऊन आली. बारावीनंतर डिझाईन किंवा आर्किटेक्चरमधे डिग्री करायची असे नववीपासून पक्के होते. अकरावी-बारावी दरम्यान पहिला पर्याय डिझाईन इतपत विचारात स्पष्टता होती. सध्या तिच्या मनात पुढे काय करावे असा गोंधळ आहे. पदवीनंतर लगेचच मास्टर्स करावे की एखादे वर्ष नोकरी करून कशामधे मास्टर्स करावे हे ठरवावे? कारण नक्की कोणत्या विषयात पुढील शिक्षण घेऊन करियर करावे हे ठरवता येत नाहीये. कृपया या बाबत मार्गदर्शन करावे. – प्रदीप विष्णु साठे
एनआयडी आणि आयआयटी यांची मास्टर्सची प्रवेश परीक्षा द्यावी. त्यातून प्रवेश मिळाला तरच घ्यावा. नाहीतर वर्ष दोन वर्षे काम करून अनुभव घेताना पुन्हा परीक्षा देऊन प्रवेश मिळवावा. अन्यथा कुठे मास्टर्स करून फार मोठा फायदा होईल असे नाही. परदेशात जिथे इंटर्नशिप केली त्याच देशात काही उपलब्ध आहे का व खर्च परवडतो का? असाही निर्णय तुम्हाला घेता येऊ शकतो.