डॉ.श्रीराम गीत
माझ्या मुलीला दहावीला २०२३ मधे ९८ टक्के मार्क मिळाले. ‘नीट’ साठी तयारी करत आहे. गणित विषय फारसा चांगला नाही. २०२५ साली नीट देणार आहे. एम.बी.बी.एस. साठी प्रवेश मिळणं खूप कठीण आहे याची कल्पना आहे. माझा प्रश्न आहे एम.बी.बी.एस. सोडून कुठले पर्याय उपलब्ध आहेत? तिचा बायोलॉजी आणि केमिस्ट्री विषय चांगला आहे. रिसर्चमध्ये आवड आहे. अभियांत्रिकी किंवा तत्सम विषय आवडत नाहीत. – आशिष टिळक
आपला प्रश्न मी नीट वाचला. आजपासून १६ महिन्यांनी असलेल्या परीक्षेच्या संदर्भात आत्ताच निष्कर्ष का काढत आहात? असा माझा तुम्हालाच प्रश्न आहे. अन्य पर्यायांचा आज विचारपण नको. ते खूप आहेत पण कंटाळवाणे, किमान बारा साल शिक्षणाचे आहेत. नीटचा बागुलबुवा मुलीच्या आणि आपल्या मनातून काढण्याकरता काही गोष्टी इथे स्पष्ट करत आहे. ती परीक्षा अवघड आहे म्हणण्यापेक्षा ती परीक्षा जास्त स्पर्धात्मक आहे हे प्रथम लक्षात घ्या. परीक्षा मार्कातून मोजण्याऐवजी आपल्याला त्यासाठी किती प्रश्न सोडवायचे आहेत याच्यावर लक्ष केंद्रित केले तर सर्वप्रथम तिची भीती कमी होत जाते. बरोबर सोडवण्याचे १५० प्रश्न योग्य पद्धतीने, जलद पद्धतीने निवडणाऱ्याला त्या परीक्षेत यश मिळते व सरकारी जागाही नक्की होते. हे गणित ज्यांना समजले ते उरलेले ३० प्रश्न वाचून घालवायचा वेळ सुद्धा वाया घालवत नाही. या उलट खूप हुशार मुले १८० प्रश्न वाचण्यातच वेळ घालवतात व सोडवण्यास वेळ देत नाहीत. अभ्यास सारेच करतात. कष्टही सगळे करतात, पण परीक्षेचे तंत्र समजून घेण्याकरता प्रयत्न करणारे यश हातात घेऊन सरकारी कॉलेजमध्ये दाखल होतात. आता सगळय़ात महत्त्वाची गोष्ट नोंदवतो. २०१४ साल संपूर्णपणे अकरावी व बारावीची सर्व टेक्स्टबुक वाचणे व विषय सखोल रीतीने समजावून घेणे याकरिता द्यायची आहेत. २०२५चे चार महिने त्याचा वापर करून प्रश्नाचे हवे असलेले योग्य उत्तर कोणते त्याची निवड करण्याचे तंत्र शिकायचे आहे. दुर्दैवाने अशा परीक्षांची तयारी करणारे मुले मोठे मोठे ठोकळे पाठ करून प्रश्न आणि उत्तरे काढण्यात तपासण्यात सारा वेळ व श्रम घालवतात. माझ्या या उत्तराने निदान आपल्या मनातील व मुलीच्या मनातील नीटची भीती कमी झाली तरी खूप झाले असे मी समजेन.
सर, मला १२ वी (कॉमर्स) ला ८५ टक्के प्राप्त झाले. मी मे २०२३ मध्ये बीकॉम ७९ टक्के मिळवून झालो. मी एमबीए करण्याचा विचार करतोय. पण खर्च परवडत नाही. आणि इतर स्पर्धा परीक्षाबद्दल माझी काही तयारी नाही. मी डिजिटल आणि शेअर मार्केटिंग संबंधीत कोर्स केलेत. कृपया आपण यावर मार्गदर्शन करावे.- कैवल्य औसेकर, लातूर</strong>
बीकॉम ही तशी परिपूर्ण पदवी आहे. हेच तू विसरत आहेस. तुझे आजवरचे सगळे मार्कही चांगले आहेत. खरेदी, विक्री, अकाउंटिंग, मार्केटिंग, स्टोअर्स, टॅक्सेशन, बँकिंग, सप्लाय चेन, आणि कॉिस्टग यातील नोकऱ्या तुझी वाट पाहत आहेत. नवीन काय? खूप पगार देणारे काय? अशांच्या मागे तू भरकटत आहेस. डिजिटल मार्केटिंग करणारे काय स्वरूपाचे काम करतात याची चौकशी न करता क्लास लावणाऱ्यांची संख्या सध्या प्रचंड वाढत आहे. जे कामात आहेत, त्यांना त्याचा नक्की फायदा होतो. नाहीतर क्लासची फी फक्त खरी होते. तीच गोष्ट शेअर बाजाराच्या संदर्भात सांगता येईल. एमबीए न करताही वर लिहिलेल्या क्षेत्रात काम स्वीकारावे. दोन-तीन वर्षांच्या अनुभवानंतर पीजीडीबीएम करून एमबीए समकक्ष पदवी तुझे हातात येईल.