मी सध्या मुक्त विद्यापीठातून बी.ए. च्या द्वितीय वर्षाला शिकत आहे. मी यूपीएससीची तयारी करत आहे. आर्थिक स्थिती ठीक नसल्यामुळे मी रात्रपाळीचे काम करत आहे. सकाळी क्लासेस व अभ्यास हा सर्व प्रवास खूप खडतर जात आहे.अशा परिस्थितीत काय योग्य दिशा असेल? – अंजनीकुमार जोगदंड

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुझे आजवरचे कोणतेच गुण तू कळवलेले नाहीस. बीएचे विषय कोणते त्याचाही उल्लेख नाही. आर्थिक स्थिती चांगली नाही व रात्रपाळीचे काम करत आहे तर प्रथम आर्थिक स्थितीकडे लक्ष द्यावे, स्वत:च्या पायावर उत्तम उभे राहण्याचा विचार करावा. त्यासाठी नोकरीतील प्रगती जास्त गरजेची आहे असे मी तुला सुचवत आहे. प्रथम ७५ टक्के मार्क मिळवून पदवी, त्यानंतर दोन ते तीन वर्षे नोकरी करत आर्थिक स्थैर्य व नंतर वय २५ ते ३२ केंद्रीय स्पर्धा परीक्षांची तयारी करून त्यात यश, अशी तुझ्यासाठी योग्य आखणी सुचवत आहे. लवकर सुरुवात म्हणजे लवकर यश या चुकीच्या संकल्पनेतून प्रथम बाहेर येण्याची गरज आहे. नवीन वर्षात त्यासाठी सुरुवात कर. चांगले इंग्रजी,उत्तम संगणकाचा वापर व कोणतीही किमान ७० टक्क्यांची पदवी यातून आर्थिक स्थैर्य देणारी नोकरी नक्की मिळते.

मी सध्या इग्नूतून बीए इन पॉलिटिकल सायन्सच्या अंतिम वर्षात शिकत आहे. एसएससी सीजीएल परीक्षा देण्याच्या महत्त्वाकांक्षेतून मी माझी विज्ञानशाखा बदलून कला शाखेत प्रवेश घेतला होता. पण मला आता माझ्या निर्णयाचा पश्चात्ताप होत आहे. अभ्यासातही लक्ष लागत नाही. ही परीक्षा क्रॅक करता आली नाही तर काय करायचे, कृपया मार्गदर्शन करा. – आशिष रणदिवे

विज्ञान शाखा सोडून देऊन आता तीन वर्षे झाली आहेत. चांगला पदवीधर बनणे, त्यात शेवटच्या वर्षाला किमान ७० टक्के मार्क मिळवणे, अवांतर वाचन व सामान्य ज्ञान अद्यायावत ठेवणे यावर सर्व लक्ष केंद्रित कर. पदवीनंतर स्टाफ सिलेक्शन परीक्षेची तयारी करत आहेस ती द्यायला सुरुवात कर. त्या दरम्यान पत्रकारितेतील पूर्णवेळाचा मास्टर्स अभ्यासक्रम पूर्ण करावा. राज्यशास्त्र या विषयाचा व परीक्षेतील अभ्यासाचा त्याला फायदा होईल. चुकीच्या निर्णयावर पश्चाताप न करता किंवा दु:ख न करता पुढच्या रस्त्याबद्दल विचार सुरू कर म्हणजे यशाची शक्यता नक्की सुरुवात होते. एका बाबतीत तुझे कौतुक करावे वाटते. मराठी मुले केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शन च्या परीक्षेकडे पूर्ण दुर्लक्ष करून राज्यसेवा किंवा केंद्र सेवा परीक्षांवर भर देतात. या उलट अन्य राज्यातील कित्येक विद्यार्थी या परीक्षांची तयारी सलग तीन वर्षे करतात. अखिल भारतीय सेवा असल्यामुळे आणि केंद्र सरकारचा पगार असल्यामुळे त्यांची दमदार करिअरची सुरुवात होते. यातील काही जिद्दी विद्यार्थी नोकरी करताना केंद्रीय स्पर्धा परीक्षांचा विचार करतात आणि यशही मिळवतात. तुझ्या निमित्ताने महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थ्यांना जाग करण्याचा माझा हा अल्पसा प्रयत्न.

careerloksatta@gmail. com

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career mantra upsc exam preparation journalism course css