सर मला १० वी मध्ये ८० व १२ वी मध्ये ८२.८० टक्के मिळाले. १० वी पासूनच यूपीएससीच्या परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. नंतर ११ वी मध्ये विज्ञान शाखा निवडली, पुन्हा विज्ञान शाखेची परीक्षा अवघड जाईल असे वाटल्यामुळे मी १२ वी मध्ये कला शाखा घेतली. १२ वी ची परीक्षा झाल्यानंतर प्रथम वर्षा पासून मी महाविद्यालयात न जाता या परीक्षेची तयारी सुरू केली रोज ‘लोकसत्ता’ व ‘द हिंदू’ हे दोन वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली आणि महत्त्वाच्या लेखकांची कात्रणे काढून ठेवली. आज पण वाचत आहे. NCERT ची पुस्तके पण वाचली, परंतु वेळेत उजळणी झाली नाही. आता समजले परिस्थिती बिकट आहे आणि सदरील परीक्षेस जो खर्च लागणार आहे तो परवडण्यासारखा नाही आहे. मी तृतीय वर्षात असून मला आवडणारा अर्थशास्त्र हा विषय मी घेतला आहे. कौशल्याचा विचार केला तर मला धावणे खूप आवडते आणि मी रोज सराव पण करतो. मी इतर कोणतेही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त परीक्षेकडे वळालो आहे. आता असं वाटत आहे की मी जे काही पूर्वीच्या दोन वर्षात केले ते सगळे व्यर्थ गेले. गरजेनुसार व्यक्तिमत्त्व विकास पण झाला नाही अभ्यास पण करावास वाटत नाही. आता कोणतीही एक नोकरी मिळवून पुन्हा स्वत:चे स्वप्न पूर्ण करेल असे वाटत आहे. कारण घरची परिस्थिती. इथून पुढे मी काय करू कृपया मार्गदर्शन करा.- विठ्ठल बहिरवाल.
मला करावेसे वाटले म्हणून मी करत गेलो, अशा पद्धतीत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी निर्णय घेणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यातही ऐकीव माहितीवर विविध टप्प्यावरचे निर्णय चुकीचे घेण्याच्या पद्धतीत फार मोठी भर पडत आहे. बारावी सायन्स करून बघू. कला शाखेत पदवी घेताना राज्यशास्त्र किंवा अर्थशास्त्र घेतले म्हणजे ते यूपीएससीला उपयुक्त असते. या करता बारावी सायन्स झाल्यानंतर कला शाखेत प्रवेश घेणे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा म्हणून कॉलेजमध्ये न जाता त्या अभ्यासावरच भर देऊन पदवीचे मार्क व अभ्यास दोन्ही कमी होणे. आर्थिक पाठबळाचा कोणताही विचार न करता स्पर्धा परीक्षांच्या मागे लागणे व नंतर क्लास परवडत नाही म्हणून चिडचिड करत बसणे. घरच्यांना विश्वासात न घेता मी अमुक करणार आहे म्हणून सांगणे व त्यांच्यावर दडपण टाकणे. किती प्रयत्न देणार व यश न मिळाल्यास काय करणार याचा सुरुवातीला विचार हवा तो न करता वयाच्या तिशी पर्यंत परीक्षा देतोय म्हणून स्वत:लाच फसवत राहणे अशा गटात तुझा प्रश्न जाऊन मोडतो. प्रथम तीन वर्षे मिळेल ती नोकरी शोध. मिळेल त्या पगारातून अनुभव शिकायला मिळेल. या दरम्यान एमपीएससी परीक्षे संदर्भातील सर्व वाचन रोज तासभर केलेस तरी पायाभूत तयारी होईल. मग प्रत्यक्षात परीक्षा देण्याचा विचार सुरू होईल. प्रथम चांगल्या गुणांनी पदवी नंतर दोन वर्षे नोकरी स्वत:च्या अर्थार्जनातून स्वत:बद्दलची खात्री पटवणे केल्यास स्पर्धा परीक्षेमध्ये यशाची शक्यता खूप वाढते. जे विद्यार्थी दहावी पासून पदव्युत्तर पर्यंत शिकत आहेत त्या साऱ्यांना एक वाटचालीसाठीचा मार्गदर्शक आराखडा म्हणून हे लिहिले आहे.
माझा मुलगा १२ वी पास आहे. तो काही कारणास्तव दूरस्थ पद्धतीने पदवी बीए शिकत आहे. आता तो दुसऱ्या वर्षांत आहे. भविष्यात त्याला पुढे रीतसर प्रवेश घेवून एमबीए करायचे असेल तर फायनान्समध्ये करता येईल का? कृपया मार्गदर्शन करावे. हीच विनंती.- शशी किणीकर, नांदेड
दुरस्थ शिक्षणातून बीए केले तर एमबीए करता येते, पण एमबीए प्रवेश परीक्षा कठीण असते व त्यातून मिळणाऱ्या गुणांनुसार संस्था मिळत जाते. इथे तीव्र स्पर्धा असते त्यासाठीची तयारी मुलाला करावी लागेल. आपल्या मुलाबद्दल अन्य कोणतीही माहिती दिलेली नसल्यामुळे मोघम उत्तर देत आहे. आपण एमबीए फायनान्स झालेल्या काही व्यक्तींना भेटून त्यांची कामाची पद्धत आणि वाटचाल समजून घ्यावीत.