श्रीराम गीत
मला २०२५ ची एमपीएससी (वर्णनात्मक) परीक्षा द्यायची आहे . मी वाणिज्य शाखेतून २०२२ ला पदवी प्राप्त केली आहे. माझी या वर्षी सरळसेवेतून वरिष्ठ सहाय्यक लेखापदी निवड झाली आहे. मी पदवीच्या काळात दोन वर्ष यूपीएससीसाठी सुद्धा अभ्यास केला आहे. २०२३ मध्ये मी त्याची पूर्व परीक्षा दिली. पण पास होऊ शकलो नाही. मी आता नोकरी बरोबरच अभ्यासाचं नियोजन कसं करू याबद्दल मार्गदर्शन करा.- जे.पी. नाईक
सगळ्यात प्रथम तू योग्य रस्त्यावर वाटचाल करत आहेस याबद्दल अभिनंदन करतो. आपल्याला ध्येय कोणते हवे आहे? कधी हवे आहे? त्याची तुला जाणीव झाली आहे, असे मला तुझा प्रश्न वाचताना जाणवत होते. हातात येईल त्याला सुरुवात करायची. ती करत असताना पुढचे ध्येय व त्याची तयारी सुरू करायची. हा आजवर गेल्या ३० वर्षांत विविध स्पर्धा परीक्षातून यशस्वी झालेल्या प्रत्येकाचा यशाचा फंडा आहे असे समजायला हरकत नाही. आता तुझ्या प्रश्नाची फोड करून सविस्तर उत्तर देतो. यूपीएससी पूर्व परीक्षेची तयारी करून एक प्रयत्न तू केला आहेस. याचा अर्थ वर्णनात्मक,विश्लेषणात्मक, लघु व दीर्घ उत्तरांच्या वाचनाचा तुझा सराव झाला आहे. त्याचा फायदा उठवून आता फक्त नेमके, मोजके, संदर्भ लक्षात ठेवून लिखाण करायचे आहे. राज्यसेवा परीक्षेकरता प्रचंड घोकंपट्टी करून अभ्यास करण्याची जी सवय असते, ती लावून न घेता वाचन करताना समासात नोट्स काढून ठेवणे. नंतर त्याआधारे नेमके लिखाण करून उत्तर देणे याचा सराव रोज करत रहा. नोकरी करत अभ्यास कसा होईल ही शंका प्रथम बाजूला करावी. यासाठी दोन-तीन उदाहरणे मी अन्य वाचकांसाठी पण उपयोगी पडणारी देत आहे. मर्चंट नेव्हीमध्ये निवड झालेला प्रत्येक जण पुढची आठ वर्षे दिवसाचे आठ दहा तास काम करतच पुढच्या परीक्षेची तयारी करत असतो. एमडी, एमएस करण्यासाठी डॉक्टर मंडळी १८ ते २० तास सुद्धा काम करत तीन वर्षे अभ्यास करतात. प्रथम बँकेत क्लार्क म्हणून नेमणूक झाल्यावर परीक्षा देऊन ऑफिसर बनणारे किंवा बनलेले हजारो जण आहेत. यासाठी स्वत:चे वेळेचे काटेकोर नियोजन केले तर अडचण येत नाही. रात्री नऊ ते दहा किंवा दहा ते अकरा असे सहा दिवस वाचनाकरिता दिल्यास सर्व सुट्टीच्या दिवशी दोन दोन तासांचे चार तुकडे करून आठवडाभराचा अभ्यास रिचवता येतो. या खेरीज करिअर वृत्तांत व अग्रलेखाचे वाचन चालू ठेवावेस. हाती नोकरी आहे, म्हणून आर्थिक चिंता नाही. योग्य वेळी यश मिळेल. शुभेच्छा.
मला इंग्रजी माध्यमातून १० वीला ७५, १२ वीला ८५ टक्के गुण होते. आता बीएमएसच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देत आहे. मला एमबीए करायचे आहे. परंतु माझी आर्थिक स्थिती बरी नाही. सध्या कोठे नोकरीलाही नाही. तरी कृपया मला मार्गदर्शन करा की मी हे कसं करू किंवा अन्य काही विकल्प सांगा.– रुची नलावडे
एमबीए चांगल्या संस्थेतून पूर्ण केले तरच चांगला पगार मिळतो हे वास्तव तुला समजून घ्यायला हवे. बारावी आर्ट्स, कॉमर्समध्ये का सायन्समध्ये? गणित घेऊन का सोडून याचा उल्लेख नाही. दहावीचे मार्क लक्षात घेता एमबीएची प्रवेश परीक्षा तुला जड जाईल हे मला दिसत आहे. त्या परीक्षेला सरसकट सत्तर टक्के इंजिनीयर बसतात. त्यांचे गणित उत्तम असते. गेल्या पाच वर्षात तुझा गणिताशी संबंध तुटला असला तर त्याची तयारी करणे हे तुझे पहिले काम राहील. कोणत्याही संस्थेतून एमबीए करण्यासाठीचा खर्च किमान पाच लाख असतो. सर्वांना प्रवेश देऊन सुद्धा ३५ /४० हजार जागा रिकाम्या राहतात. याचाच दुसरा अर्थ पहिल्या पाच हजार विद्यार्थ्यांना सोडून इतरांना जेमतेम पगाराच्या व कशाबशा नोकऱ्या लागतात. बीबीए बीएएमएस केले म्हणजे चांगले हा भ्रमाचा भोपळा फुटतो. उत्तम नोकरी मिळते हा भ्रम निर्माण झालेला आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षानंतर बहुतेकांचा हा भोपळा फुटतो. विविध आस्थापनांमध्ये, सेवा क्षेत्रांमध्ये, आरोग्य सेवा क्षेत्रात तुला महिना बारा ते वीस हजार रुपयाची नोकरी लागण्याची शक्यता खूप आहे. ती नोकरी दोन वर्षे करताना एमबीए प्रवेश परीक्षेची तयारी करणेही शक्य असते. समजा प्रवेश परीक्षेत यश मिळाले नाही किंवा आर्थिक अडचण दूर झाली नाही तर पीजीडीबीएम हा एमबीए समकक्ष दूरस्थ अभ्यासक्रम तुला पूर्ण करता येईल. त्याचा खर्च जेमतेम दीड लाख रुपये येतो. प्रथम नोकरी शोध. सहा महिन्यानंतर या साऱ्याबद्दल विचार सुरू कर. योग्य तो निर्णय घेणे सहज शक्य होईल.