बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, मात्र करोना महामारीनंतर जो पर्याय प्रकर्षाने पुढे आला आहे तो म्हणजे सूक्ष्मजीव शास्त्रात बीएस्सी करण्याचा. आज रोजी देशात जवळपास अडीचशे सरकारी, सव्वाशे निमसरकारी तर सहाशे खासगी महाविद्यालयांत सूक्ष्मजीवशास्त्र विषयात शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत.
गेल्या पाच वर्षांपासून संपूर्ण जग एका सूक्ष्मजीवाशी लढत आहे. करोना जागतिक महामारी एका व्हायरसमुळे उद्भवली आणि जगभरात कोट्यवधी लोक बाधित झाले तर लाखो लोक मृत्युमुखी पडले. आता नव्याने एचएमपीव्ही व्हायरसमुळे जगभरात भीतीची लाट आली आहे. जगाच्या इतिहासात असे प्रसंग अनेकदा आले आहेत. प्लेग, देवी यांपासून ते स्पॅनिश फ्लूपर्यंत अनेक साथींनी जगभरात कोट्यवधी लोकांचा बळी घेतला आहे. बॅक्टेरिया, व्हायरस अशा सूक्ष्मजीवांनी हा उत्पात घडवून आणला आहे. यांच्याशी दोन हात करण्याचा प्रयत्न मानव अनेक वर्षं करतो आहे. आज रोजी अस्तित्वात असलेल्या सूक्ष्मजीवांपैकी फक्त ५ सूक्ष्मजीवांची माहिती मानवाला आहे. हे बघता सूक्ष्मजीव शास्त्रात किती काम करणे बाकी आहे हे लक्षात येते. सूक्ष्मदर्शकाशिवाय दिसू न शकणाऱ्या तसेच साधी संरचना असणाऱ्या जीवांना सूक्ष्मजीव म्हणतात. सूक्ष्मजीव ओळखणे, त्यांचे वर्गीकरण करणे, त्यांच्या रचना व कार्ये यांचा अभ्यास करणे आणि त्यांचा मानव, प्राणी व वनस्पती या जीवसृष्टीवर होणारा परिणाम अभ्यासणे या गोष्टींचा समावेश सूक्ष्मजीव शास्त्रात होतो.
बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, मात्र करोना महामारीनंतर जो पर्याय प्रकर्षाने पुढे आला आहे तो म्हणजे सूक्ष्मजीव शास्त्रात बीएस्सी करण्याचा. आज रोजी देशात जवळपास अडीचशे सरकारी, सव्वाशे निमसरकारी तर सहाशे खासगी महाविद्यालयांत सूक्ष्मजीवशास्त्र विषयात शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. सीयूईटी (यूजी) परीक्षेमधून काही महाविद्यालय/ विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळतो तर काही महाविद्यालयांत प्रवेशासाठी महाविद्यालयीन स्तरावर प्रवेश परीक्षा घेतली जाते तर अनेक महाविद्यालयांमध्ये बारावीच्या मार्कांवर प्रवेश मिळतो हे लक्षात घेता विद्यार्थ्यांना बारावी बोर्डाच्या परीक्षेतही उत्तम गुण मिळवणे आवश्यक आहे.
सूक्ष्मजीव शास्त्रात करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध होण्यासाठी या विषयात मास्टर्स डिग्री मिळवणे आवश्यक आहे. बीएस्सीच्या शेवटच्या वर्षी आय आय टी, एन आय टी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा संस्थांमध्ये एमएस्सी प्रवेशासाठी ‘जाम’ ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेतून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या संस्थांमध्ये बायो टेक्नॉलॉजी, लाइफ सायन्सेसमध्ये एमएस्सीसाठी प्रवेश मिळू शकतो. याशिवाय पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, बेंगलोर विद्यापीठांपासून व्हीआयटी वेल्लोर, जामिया मिलिया, अमिटी विद्यापीठांपर्यंत अनेक विद्यापीठांमध्ये / संस्थांमध्ये सूक्ष्मजीव शास्त्रात पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवला जातो.
सूक्ष्मजीव शास्त्रात संशोधनाच्या तसेच पीएचडी करण्याच्या अनेक संधी भारतात तसेच परदेशात उपलब्ध आहेत. करोनापश्चात जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये सूक्ष्मजीवशास्त्र विषयांत संशोधनाच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि त्याकरिता सरकारी तसेच खासगी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य उपलब्ध केले जात आहे. नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे अनेक विद्यापीठांमध्ये चार वर्षांचा पदवी कोर्स सुरू झाला आहे ज्यानंतर विद्यार्थ्यांना थेट परदेशात जाऊन मास्टर्स डिग्रीसाठी प्रवेश घेता येतो.
सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांना इम्युनॉलॉजी, व्हायरॉलॉजी, फारमॅकॉलॉजी, मायकॉलॉजी, जेनेटिक्स, मरीन बायोलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, नेमॅटॉलॉजी, इकॉलॉजी, अॅग्रिकल्चर अशा विविध विषयांत पदव्युत्तर तसेच पीएचडीपर्यंत शिक्षणाच्या भारतात व परदेशात संधी मिळू शकतात.
सूक्ष्मजीव शास्त्रात पदवी / पदव्युत्तर/ पीएचडी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना औषध कंपन्या, क्लिनिकल लॅबोरेटरी, फूड इंडस्ट्री, बिव्हरेज इंडस्ट्री, केमिकल इंडस्ट्री, अॅग्रिकल्चर इंडस्ट्री, अध्यापन क्षेत्र, क्लिनिकल ट्रायल याबरोबरच शासकीय व निमशासकीय संस्थांमध्येही करिअर संधी उपलब्ध आहेत.
vkvelankar@gmail. com