फलटण जवळच्या एका छोट्या गावात आमचा चौसोपी भला मोठा वडिलोपार्जित वाडा. गावातील प्राथमिक शाळेत आई शिक्षिका तर जिल्हा परिषदेच्या शाळेत वडील माध्यमिक शिक्षक. मला मोठ्या तीन बहिणी. तिघींची लग्न मॅट्रिक झाल्या झाल्या वडिलांनी लावून दिली व खात्यापित्या घरी पाठवून दिले. माझे सारे शिक्षण फलटण व सातारा या ठिकाणी झाले. इतिहास खूप आवडता, भूगोल पाठ करून आवडायचा, आईकडून मराठीची शिकवण अगदी लहानपणापासून कानावर पडायची. पण शास्त्र आणि गणिताची भीती वाटायची. माझ्या लहानपणी आमच्या भागात प्रचंड विस्तार असलेली एक शिक्षण संस्था होती त्यातील एक संचालक वडिलांचे मित्र. त्यांनीच वडिलांना सुचवले, मुलाला सुटसुटीतपणे बीए आणि एमए करू देत. सोपासा विषय मराठी घेऊ देत. त्याला चिकटवून घेण्याचे काम माझ्याकडे. मी एमए झाल्यावर त्यांच्या संस्थेत चिकटलो. संचालकांचा माणूस म्हटल्यावर तेथेही माझे कौतुकच होत असे. नोकरीत कायम झाल्यानंतर वडिलांच्या खडकीच्या मुख्याध्यापक मित्राकडून सांगून आलेल्या मुलीशी लग्न झाले आणि आमचा राजा-राणीचा बदलीच्या गावी संसार सुरू झाला. दर बदलीनंतर सुरू होणाऱ्या एखाद्या नवीन कॉलेजातील बित्तमबातमी वर पोहोचवण्याचे काम माझ्याकडे असल्यामुळे संचालक त्यांना हव्या त्या जागी मला पाठवत असत. इथे पोहोचण्याच्या आधीच राहण्याची सोय व मुलीच्या शिक्षणाची सोय व पत्नीसाठी काहीतरी कामचलाऊ नोकरी या गोष्टींची सुद्धा संचालक काळजी घेत होते. आता या काय जगाला सांगायच्या गोष्टी आहेत का?…

तीन प्रकारचे प्राध्यापक

आमच्या संस्थेमध्ये प्राध्यापकांचे तीन प्रकार होते. संचालकांच्या खास मर्जीतले प्राध्यापक,ज्यांना पूर्ण पगार मिळत असे. संचालकांच्या ओळखीतून चिकटवून घेतलेले प्राध्यापक त्यांना फक्त ६० टक्के पगार मिळे व कोऱ्या चेकवर सही घेऊन पैसे परत घेतले जात. तिसऱ्या गटात घड्याळी तासावर नेमलेले प्राध्यापक असत. त्यांना महिन्याला २५ ते ३५ हजार कसे मिळतील अशा पद्धतीत त्यांची घड्याळी तासांची आखणी केली जाई. आमची संस्था इतकी उदार होती की दुसऱ्या व तिसऱ्या गटातील प्राध्यापक मान खाली घालून जर काम करत असेल तर त्याला हातउसने कर्जसुद्धा कधीही मागून मिळत असे. दिवाळीला दहा हजार रुपये पाहिजेत. मुलीच्या लग्नाला पंधरा हजार रुपये पाहिजेत. मुलाची फी भरायची आठ हजार देता का, असे म्हणायचा अवकाश की नोटांची गड्डी त्याच्यापुढे पडत असे. सुरुवातीला मला हे सारे विचित्र वाटायचे. पण पहिल्या बदलीनंतर व मीनलच्या जन्मानंतर या साऱ्याची छानशी सवयच होऊन गेली.

माझी नोकरी सुरू झाली त्या काळात शिक्षण महर्षी नावाचा शब्द अस्तित्वात नव्हता. पण आता असे महर्षी प्रत्येक जिल्ह्यात पसरलेले आहेत. सुदैवाने मीनल आता परदेशात असते आणि आम्ही दोघेजण निवृत्तीच्या वयात आहोत. म्हणून महर्षींचा जाच काय असतो तो सहन करायची वेळ आमच्या दोघांवर आली नाही. मीनलची आई मात्र या साऱ्यापासून अलिप्त असल्यासारखी वागे. माझ्या मराठी शिकवण्याचे तिला फारसे अप्रूप नाही हे मला सुरुवातीची अनेक वर्ष मानसिक त्रास देणारे ठरत होते. हळूहळू माझ्या शिकवण्यात सफाई येऊ लागली आणि ते विद्यार्थ्यांना खूप आवडू लागले. बदल्यांचा काळ संपून जेव्हा सातारच्या कॉलेजात आम्ही कायमचे स्थायिक झालो त्यावेळी माझी विभागप्रमुख म्हणून नेमणूक होती. संचालकांनी मला दोनदा विचारून सुद्धा मी प्राचार्य पद नाकारले. पगारात काडीचाही फरक नाही आणि शिव्या मात्र सगळ्यांच्या खायच्या. एका संचालकाऐवजी संचालक मंडळासमोर हुजरेगिरी करायची. शिवाय साऱ्या शिक्षकांच्या, पालकांच्या तक्रारींना तोंड द्यायचे या प्रकारातून मी माझी गोड बोलून सुटका करून घेतली. सातारच्या दोन-तीन वर्षानंतर मात्र मला शिवाजी विद्यापीठात काम करता येत नाही याची बोच सुरू झाली होती. काही आसपासच्या महाविद्यालयातील केवळ डॉक्टरेट असलेले प्राध्यापक मानद प्राध्यापक म्हणून तेथे काम करत होते. पीएचडी केली असती तर तशी संधी मिळाली असती हे अनेकदा मनात येई. तेच माझे बोलणे मीनलने कधीतरी ऐकले. विद्यापीठातील प्राध्यापक ही काहीतरी वेगळीच चीज असते हे तिच्या मनात इतके ठसले की त्याचे तिने वेडच लावून घेतले.

माझ्यात व मीनलच्या आईमध्ये वादाचे काही कारणच नसे. कारण दोघेजण दिवसभर आपापल्या कामात असू. मीनलने बीएस्सी करायचे ठरवले तेव्हा थोडीशी चिडचिड झाली. पण तिचा आवाका लक्षात आल्यानंतर तो निर्णय योग्य होता असे मला वाटते. पदवी हातात आली त्यानंतर तिने एमएस्सी पूर्ण केले. मला वाटले ती आता लग्न करून सासरी जाईल किंवा बीएड करून आमच्या संस्थेत कामाला लागेल. या अपेक्षेवर तिने माझेच वाक्य वापरून मला विद्यापीठात प्राध्यापक बनायचे आहे असे ऐकवले. तशी ती बनली तर उत्तमच असे मला जरी आतून वाटत असले तरी विद्यापीठातील प्राध्यापक पदासाठीची निवड ही अशीतशी आमच्या संस्थेसारखी होत नसते याची मला पूर्ण कल्पना होती. एखाद्या विद्यापीठातील पदाकरता भारतभरातून अर्ज येतात व पन्नासातून एखाद्याला निवडले जाते. त्यातही थोडीफार वशिलेबाजी होतेच. यात मीनलचा नंबर कसा लागणार ही माझ्या मनात शंका होती. त्यातच मीनलची पीएचडी रखडली. वयाच्या तिशीमध्ये डॉक्टरेट हातात आल्यावर कुठेच नोकरी नाही म्हटल्यावर ती हताश चेहऱ्याने तीन महिने घरात बसून होती. ते मला बघवत नसे. तिच्या सुदैवाने तिला परदेशी कामाला जाण्याची संधी मिळाली आणि भारतीय शिक्षण क्षेत्रातील दुर्दैवाच्या फेऱ्यातून तिची कायमची सुटका झाली. आता हे सारे मीनलच्या आईला समजावून कोण बरे सांगणार, अशा प्रश्नाने रोजची संध्याकाळ खाऊन टाकली जाते. पण त्यात मीनलचा फोन आला की पुन्हा दुसरा दिवस आनंदात सुरू होतो. ‘दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम’,हे या अर्थाने मला पूर्णपणे मान्य आहे.

(क्रमश:)