विमानांचे आकर्षण अगदी लहानपणापासून सगळ्यांनाच असते. वैमानिक किंवा पायलट या करिअरकडे विद्यार्थ्यांचा ओढा असणे नैसर्गिक आहे. या क्षेत्रात दोन प्रकारच्या संधी आहेत. एक म्हणजे भारतीय संरक्षण दलांमध्ये वैमानिक बनण्याच्या संधी आणि दुसरी म्हणजे व्यावसायिक विमान कंपन्यांमध्ये वैमानिक होण्याची संधी. भारतीय वायु दलामध्ये बारावीनंतर एनडीएमधून शिक्षण घेऊन संधी मिळते तसेच पदवीनंतर सीडीएस किंवा ॲफकॅट परीक्षांमधून संधी मिळते. यासंबंधीची माहिती आपण नंतर घेणारच आहोत, मात्र आज माहिती घेणार आहोत ती व्यावसायिक विमान कंपन्यांमध्ये वैमानिक बनण्याच्या संधी बद्दल.
हेही वाचा >>> ICSE 2024 Results Out: १० वी, १२ वीचा निकाल जाहीर; मुलींची बाजी! कुठे व कसा पाहाल आयसीएसईचा निकाल?
भारतातील विमान प्रवाशांमध्ये सातत्याने होत असणाऱ्या वाढीमुळे खासगी विमान कंपन्यांमध्ये वैमानिकांची गरज वाढत आहे. वैमानिकांना मिळणारा गलेलठ्ठ पगार, देशविदेशात फिरण्याची संधी, समाजात मिळणारे मानाचे स्थान यामुळे हे करिअर आकर्षक बनले आहे. फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी वैमानिक होण्यासाठी पात्र असतात.यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत, मात्र त्या खासगी आहेत. शासकीय प्रशिक्षण संस्था एकच आहे जी रायबरेलीमध्ये आहे आणि भारत सरकारच्या हवाई वाहतूक मंत्रालयांतर्गत स्थापित या संस्थेचे नाव आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय उडाण ॲकेडमी. या संस्थेमध्ये वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व अद्यायावत सुविधा आहेत. ज्यामध्ये स्वत:चा चोवीस विमानांचा ताफा, दीड किलोमीटरची धावपट्टी, अद्यायावत यंत्रशाळा, सिम्युलेटर इ. गोष्टींचा समावेश आहे. या संस्थेमध्ये बारावीनंतर दोन वर्षांच्या वैमानिक प्रशिक्षणासाठीची जाहीरात प्रसिद्ध झाली आहे. किमान १५८ सेमी उंची असलेले फिजिक्स व मॅथेमॅटिक्स विषय घेऊन किमान ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पात्र आहेत. (यंदा बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात) ज्यांना या कोर्स बरोबरच बीएससी एव्हिएशन पदवी कोर्स करायचा असेल त्यांना ३ वर्षांच्या कोर्स साठी प्रवेश घेता येईल. प्रवेश प्रक्रिया त्रिस्तरीय असेल. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना सोमवार ३ जून रोजी मुंबई व पुणे शहरात ऑनलाइन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यावी लागेल ज्यामध्ये इंग्रजी, फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, रिझनिंग ?बिलिटी व करंट अफेअर्स या विषयांची बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा घेतली जाते. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसेल. यातून निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत जुलै महिन्यात घेतली जाईल व त्यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांची पायलट ॲप्टिट्यूड टेस्ट घेऊन अंतिम निवड यादी होते. कोर्स २५ सप्टेंबर पासून सुरू होईल. या संस्थेचे प्लेसमेंट रेकॉर्ड उत्तम आहे.
यासाठी अर्ज ९ मे पर्यंत ऑनलाइन पद्धतीने संस्थेच्या https://igrua.gov.in या संकेतस्थळावर करता येतील ● विवेक वेलणकर