Success Story: भूक लागली, तर वरण-भाताबरोबर खायला किंवा ऑफिसमध्ये दुपारच्या वेळेस भूक लागली की, आपल्यातील अनेक जण चिप्स किंवा वेफर्स खातात. वेफर्स किंवा चिप्सच्या बऱ्याच कंपन्या आहेत. पण, कोणत्या कंपनीचे चिप्स खाणार, असं विचारलं तर आपल्यातील अनेक जण बालाजी या कंपनीचं नाव घेतील. कारण- बालाजी कंपनीच्या वेफर्सची चव, त्याचे वेगवेगळे फ्लेवर्स अनेकांच्या मनात खूप वर्षांपासून घर करून आहेत. तसेच या वेफर्सची सुरुवातीची किंमत फक्त पाच रुपये असल्याने बालाजी हा अनेक ग्राहकांचा लाडका ब्रॅण्ड आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का? या प्रसिद्ध ब्रॅण्डची निर्मिती कशी झाली कोणी केली? तर याचबद्दल या लेखातून अधिक जाणून घेऊ.
बालाजी वेफर्सच्या संस्थापकांचे नाव चंदूभाई विराणी, असे आहे. चंदूभाई विराणी गुजरातचे आहेत. त्यांचा जन्म हा शेतकरी कुटुंबात झाला आहे. १९७४ मध्ये त्यांनी जामनगर सोडले आणि नोकरीच्या शोधात ते राजकोटला गेले. पण, त्यांना व्यवसाय करायचा होता. त्यांच्या वडिलांनीही शेतजमीन विकून त्यांना व्यवसाय सुरू करता यावा यासाठी २०,००० रुपयांची व्यवस्था केली. त्यानंतर चंदूभाईंनी राजकोटमध्ये शेतमालाची विक्री करणारा एक छोटासा व्यवसाय सुरू केला; मात्र त्यांना त्या व्यवसायात अपयश आले. अपयश आल्यावर त्यांनी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. अखेर चंदूभाईंना त्यांच्या भावाबरोबर ॲस्ट्रॉन सिनेमा कॅन्टीनमध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली.
चंदूभाईंना कॅन्टीनमध्ये काम करून ९० रुपये महिन्याला पगार मिळत होता. तसेच याव्यतिरिक्त पोस्टर्स चिकटवणे आणि खुर्ची दुरुस्ती आदी अनेक कामे त्यांनी केली. नंतर चंदूभाई यांचे काम पाहून त्यांना १,००० रुपयांचं कंत्राट मिळालं . चंदूभाईंनी अंगणात एक लहान शेड बांधली आणि एका खोलीतून चिप्स बनवायला सुरुवात केली. त्यांनी बनविलेल्या वेफरनी थिएटरच्या प्रेक्षकांची मनं जिंकली.
व्यवसाय वाढविण्यासाठी चंदूभाईंनी बँकेकडून कर्ज म्हणून दीड लाख रुपये घेतले आणि १९८२ मध्ये त्यांच्या बटाटा वेफर व्यवसायासाठी पहिला कारखाना उघडला. त्यांच्या कारखान्याच्या मिळालेले यश पाहता, १९९२ मध्ये बालाजी वेफर्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करण्यात आली. कंपनीनं दररोज ६.५ दशलक्ष किलोग्राम बटाटे आणि १० दशलक्ष किलोग्राम नमकीनचं उत्पादन करीत असल्याचा दावा केला आहे. सध्या बालाजी वेफर्स कंपनीमध्ये पाच हजार कर्मचारी आहेत; ज्यात ५० टक्के महिला आहेत. कितीही कठीण परिस्थिती असली तरी चंदूभाई विराणी यांनी स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द कधीच सोडली नाही आणि अखेर त्यांनी पाच हजार कोटी रुपयांची कंपनी उभारली.