मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं की, अनेक कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. शोध पत्रकारितेच्या वास्तवाचे चटके सहन केल्यानंतर मुलगी नीना पाटीलनेही त्यातच करिअर करणे तिच्या आईसाठी काळजीचे कारण असले तरी सध्याची या क्षेत्रातली बदलेली स्थिती कुठेतरी तिला आश्वासकही वाटते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियातील एका छोट्या गावी आशिषशी लग्न करून मी येऊन पोचले आणि भारताबरोबरचे सगळे मानसिक बंध मी तोडले. आशिषच एक छोटस हॉटेल होतं आपल्या भारतीय भाषेत. आईकडून नीना बद्दल कळत असे तेवढेच. पण तिला फोन करणे, पत्र लिहिणे, वगैरे मी मुद्दामून टाळत होते. तिचे आयुष्य तिला जगू देत मनासारखे आणि माझे आयुष्य जसे फरपटत गेले तसे होऊ नये यासाठी हा अट्टाहास होता. ऑस्ट्रेलियासारख्या दूर ठिकाणी असले तरी आशिषची एक सवय होती, रोज इंटरनेटवर भारतातील एका प्रसिद्ध वर्तमानपत्राचं प्रत्येक पान नीट वाचून काढायचे. एकदा त्यातील एका लेखाचा प्रिंट काढून त्याने माझ्यासमोर टाकले. नीना पाटील या नावाने तो लेख लिहिलेला होता. असेल कोणीतरी नीना पाटील म्हणून नावाकडे दुर्लक्ष करत मी संपूर्ण लेख वाचला. मेट्रो कार शेडच्या निमित्ताने आरेतील वृक्षतोड आणि त्यावरून उठलेले मोठे वादळ यावर मुंबई ढवळून निघाली होती. पण या लेखाचे वेगळेपण पहिल्या ओळीपासूनच सुरू झाले होते. मुंबईचा सारा इतिहास व पर्यावरण, आसपासच्या खाड्या, कांदळवने बोरिवलीचे जंगल व पवईचा तलाव याचे वर्णन वाचताना मी मुंबईतच आहे काय असे वाटू लागले. पुन्हा नेमक्या आकडेवारीतून लेख पुढे सरकत होता. लेखाच्या शेवटी घेतलेल्या सगळ्या संदर्भांच्या लिंक्स होत्या. पटापट एका मागून एक लिंक उघडत माझे दोन-तीन तास कसे गेले ते माझे मलाच कळले नाही. एका लिंकच्या शेवटी नीना पाटील ही अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठातून शोध पत्रकारिता नुकतीच पूर्ण केलेली मुलगी आहे हे वाक्य वाचले आणि मेंदूत लख्ख प्रकाश पडला माझी नीना ती हीच. माझी अवस्था बघून आशिषने मला जवळ घेतले व पुन्हा पाठीवर आश्वासक थोपटले.

सारा भूतकाळ सामोरा

दादरला आमच्या कॉलनीत आशिष राहायचा. वयाने माझ्याबरोबरचा. तो हॉटेल मॅनेजमेंट करत होता. मी बारावी नंतर इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये पडले. कामे करत करत एकीकडे त्यातीलच बीबीएची पदवी घेतली. आशिषचे आजोळ सातारचे, नीनाचे वडील पृथ्वीराज आशिषचा बालमित्र. महिना दोन महिन्यांनी मुंबईत कामासाठी आल्यानंतर आशिषकडे त्याची चक्कर होत असे. त्याची वाटचाल पहात असताना त्याकडे आकर्षित होऊन मी त्याच्या प्रेमात कधी बुडले ते मलाच कळले नाही. दर भेटीत पृथ्वीराजकडे इतके काही नवीन असे की मी आणि आशिष त्याने सांगितलेल्या विषयातील गप्पामधे पुरेपूर रंगून जात असू. पृथ्वीराजने शाळा संपल्यावर घरच्या मोठ्या शेतीशी संबंधित म्हणून थेट कृषी मधील पदविका पूर्ण केली. घरचा ऊस जेथे घालायचा त्या साखर कारखान्यातील संचालकांशी वाद झाला म्हणून पत्रकारितेतील पदविकेला प्रवेश घेतला आणि तो अभ्यासक्रम उत्तम पद्धतीत पूर्ण करून एका जिल्हा वृत्तपत्रात तो मुक्त पत्रकार म्हणून काम करू लागला. अभ्यासू वृत्ती असल्यामुळे एकीकडे ते काम करताना पदवी पण मिळवली. ज्या वृत्तपत्रात तो काम करायचा त्यांचे व साखर कारखान्याच्या संचालकांचे साटेलोटे होते. साखर कारखान्यातील एका मोठ्या गैरव्यवहारावर त्याने एक लेख मालिका लिहून दिली. ती छापण्यावरून संपादकांशी त्याचे कडाक्याचे भांडण झाले. त्याने मग कायद्याच्या पदवीला प्रवेश घेतला. ती उत्तम पूर्ण केली. पृथ्वीराज या साऱ्या बद्दल बोलत असताना मी त्याच्या प्रेमात पूर्ण बुडले होते व आमचे लग्न तो वकील झाल्या झाल्या झाले. माझा भाऊ पाच वर्षांनी लहान. त्याने आयटी पूर्ण करून अमेरिकेला शिकायला जायचे ठरवले. वडील पूर्वीच गेलेले. आईची पृथ्वीराज बरोबर लग्नाला संमती पण भावाचा माझ्या लग्नाला पूर्ण विरोध असे त्रांगडे असताना मी सातारला सासरी आले. घरची मोठी शेती व त्याचे भरघोस उत्पन्न यामुळे पृथ्वीराजला हे सारे निर्णय घेताना एक स्वरूपाचा आत्मविश्वास होता. अस्सल सातारी भाषेत त्याला लोक ‘माज’, असेही म्हणत. पत्रकारितेतील झुंजार वृत्ती वकिली करताना उपयोगी पडली. सलग पहिल्या पाच केसेसमध्ये यश मिळाल्यानंतर तरुण यशस्वी फौजदारी वकील म्हणून त्याचे नाव जिल्हा कोर्टात प्रसिद्ध झाले होते. पृथ्वीराजने वकिली सुरू केली व नीनाचा जन्म झाला. आशिषने साताऱ्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून नोकरी स्वीकारली असल्याने आमचे त्रिकूट नियमितपणे भेटत असे. आशिषच्या लग्नावरुन पृथ्वीराज त्याची कायम टिंगल करत असे. हॉटेलवाल्याला मुलगी मिळणे कठीण असते तेव्हा तूच एखादी पकडून आण असे त्याचे कायम सांगणे होते. आमच सार छान चाललं होतं. नीनाची शाळा सुरू झाली होती आणि एका दिवशी पृथ्वीराजचे जुने वैर असलेल्या साखर कारखान्याच्या अध्यक्षावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला. साऱ्या जिल्ह्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले असताना दुसरी बातमी माझ्या कानावर येऊन आदळली ती म्हणजे त्या महिलेचे वकीलपत्र पृथ्वीराजने घेतले आहे. बलात्काराचे प्रकरण आशिषच्या हॉटेलमध्ये घडले असल्याने त्याची बित्तंबातमी पृथ्वीराजकडे होती. दोन वर्षे चाललेल्या त्या प्रकरणाचा मानसिक ताण पृथ्वीराजलाच घेऊन गेला. नीनाला जवळ घेऊन माझा आकांत चालू असताना पाठीवर आश्वासक हात पडला, तो होता आशिषचा. आईकडे नीनाला सोपवून आम्ही दोघे वर्षभरातच ऑस्ट्रेलियाला स्थायिक झालो. पृथ्वीराजची पत्रकारिता आता पुन्हा नीनामध्ये अशी उफाळून आली आहे याचे कौतुक करावे, आनंद मानावा का काय करावे असे वाटत असताना आशिषचे पुन्हा आश्वासक वाक्य आले, ‘नीनाला आता कोणीही धक्का लावू शकणार नाही’. (क्रमश:)