माझी मुलगी बीएससी मध्ये पहिले वर्षात शिकत असून तिला दहावीत ६९ (कोव्हिड बॅच) व बारावीत ५२ मार्क मिळाले. तिला मायक्रोबायॉलॉजी ला प्रवेश हवा होता, तो मिळाला नाही. आता रसायन शास्त्र व वनस्पती शास्त्र तिचे मुख्य विषय आहेत, हाच माझ्या काळजीचा विषय आहे, पुढे तिने काय करावे कृपया मार्गदर्शन करावे. — अमर सावंत
मुलीला आवडत असले व मान्य झाले तर रसायनशास्त्रात पदवी घ्यावी असे सुचवत आहे. दहावी बारावीचे कमी मार्क वाढवून पदवीला ७० टक्के मार्क मिळवण्याची गरज आहे. वनस्पतीशास्त्रातून पुढे जाण्यासाठी रस्ता खूप लांबचा आहे. या उलट रसायनशास्त्रातून मास्टर्स पूर्ण केल्यानंतर किंवा पदवीनंतर एमबीए केल्यावर तिला योग्य स्वरूपाची कामे मिळू शकतात. मला अमुक आवडत होते असे म्हणण्याऐवजी त्यासाठी लागणारे हातातील गुण किती, यावर पालक विद्यार्थ्यांनी नीट व शांतपणे विचार करण्याची गरज असते. तो आपल्या कन्येच्या बाबतीत अजिबात झालेला नाही असे नमूद करत आहे. करोना बॅच सगळीच होती ना? यानंतरही तिला मायक्रोबायोलॉजीच करायचे असेल तर वनस्पतीशास्त्रातील पदवीला डिस्टिंक्शन मिळवून त्या शाखेची प्रवेश परीक्षा ती देऊ शकते किंवा बायोटेक्नॉलॉजीत प्रवेश घेऊ शकते. शांतपणे विचार करून, माहिती घेऊन निर्णय घ्यावा. त्यासाठी या क्षेत्रात काम करणारी व्यक्ती शोधावी त्यांच्याशी चर्चा करावी. त्याकरता आपल्या हातात तीन वर्षे आहेत.
careerloksatta @gmail.com