आशुतोष शिर्के

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीन आपल्या उच्च शिक्षणाच्या पायाभूत सुविधांमध्ये प्रचंड गुंतवणूक करत आहे. अनेक जागतिक शिक्षण आणि उद्योग संस्थांसोबतची भागीदारी, अत्याधुनिक संशोधन सुविधा अशा अनेक कारणांमुळे चीन पुढील काही वर्षांत जगातील प्रमुख शैक्षणिक केंद्र बनणार आहे याची नोंद उच्च-शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा विचार करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी घेण्याची गरज आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता, रिन्युएबल ऊर्जा आणि क्वांटम कॉम्प्युटिंग यासारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये प्रचंड गुंतवणूक करून, चीनने भविष्याच्या दिशेने झेप घेतली आहे. गेल्या एका वर्षात चीनमधून दीड लाखांहून अधिक पेटंट अर्ज दाखल करण्यात आले यावरूनच नाविन्य किंवा इनोवेशनच्या दृष्टीने चीनमध्ये काय घडत आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. आज चीनमध्ये पाच लाखांहून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्याकीय शास्त्र आणि त्याबरोबरच मानव्य शास्त्र, व्यवस्थापन या सर्वच ज्ञानशाखांमध्ये चीनची विद्यापीठे इंग्रजी माध्यमामधून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. जागतिक स्तरावरील सर्वोत्तम १०० विद्यापीठांच्या यादीमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही हे खेदपूर्ण सत्य समोर असताना चीन मधील दहा विद्यापीठे या याद्यांमध्ये गेल्या पाच वर्षांत झळकू लागली आहेत आणि आणखी दहा विद्यापीठे येत्या दोन वर्षांमध्ये या याद्यांमध्ये स्थान पटकावण्याच्या तयारीत आहेत, ही नोंदही आपल्याला घ्यावी लागेल.

आज अनेक भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी चीनचा दरवाजा ठोठावत आहेत. एका माहितीनुसार २०२३ मध्ये अंदाजे वीस हजार भारतीय विद्यार्थ्यांनी चीनमधील विविध विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला. यामध्ये अर्थातच वैद्याकीय अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांचा अधिक ओढा असल्याचे दिसून आले. आज भारतीय विद्यार्थी चीनमध्ये मेडिकल कोर्सेससाठी वळत आहेत याचे प्रमुख कारण अर्थातच शुल्क कमी असणे हे आहे. एकूणच इतर देशांच्या तुलनेत चीनमधील शिक्षण आणि वास्तव्याचा खर्च हा कमी आहे. याशिवाय चीनमध्ये सरकार आणि अनेक विद्यापीठांतर्फे अनेक स्कॉलरशिप्स, फेलोशिप्स दिल्या जातात. चायनीज स्कॉलरशिप्स काऊंन्सिलच्या वेब साईटवर याबद्दलची माहिती मिळू शकते. भारत आणि चीन दरम्यानच्या गेल्या पन्नास वर्षांतील अनेक करारांन्वये भारतीय विद्यार्थ्यांसाठी अनेक विशेष फेलोशिप्स उपलब्ध आहेत. सिल्क रोड स्कॉलरशिप, कनफ्युशियस स्कॉलरशिप, मॉफकॉम स्कॉलरशिप या यातील काही प्रमुख शिष्यवृत्ती आहेत.

चीन आपला शेजारी असला तरी चीनने अलिकडे केलेल्या घुसखोरीमुळे आणि सतत चिघळत असलेल्या सीम-रेषेवरील वादामुळे आपले संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. परंतु भारतीय विद्यार्थ्यांचे चीनमधील वास्तव्यादरम्यानचे अनुभव मात्र चिनी समाजाची भारतीय व्यक्तीकडे पाहण्याची दृष्टी खूपच सकारात्मक असल्याचे दाखवून देतात. आज चीनमधील सर्वच शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर जगभरातील लोक कामानिमित्त वास्तव्य करताना दिसत आहेत. अनेक भारतीय नागरिक भारतीय आणि चिनी कंपन्यांमध्ये कार्यरत राहून चीनमध्ये राहात आहेत. त्यामुळे चीनबद्दलची मराठी मनामधील अढी बाजूला सारून नवीन वास्तवाशी परिचय करून घेण्याची वेळ आज आलेली आहे.

mentorashutosh@gmail. com

चीनमधील काही प्रसिद्ध विद्यापीठ

त्सिंगहुआ विद्यापीठ (बीजिंग)

शाखा: अभियांत्रिकी, संगणक शास्त्र, व्यवसाय आणि वास्तुकला.

लोकप्रिय अभ्यासक्रम: MBA, कृत्रिम बुद्धिमत्ता, पर्यावरण अभियांत्रिकी आणि आंतरराष्ट्रीय संबंध.

(आशिया आणि जगातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक म्हणून सातत्याने क्रमांकित.)

पेकिंग विद्यापीठ (बीजिंग)

शाखा: मानवशास्त्र, सामाजिक शास्त्र, नैसर्गिक शास्त्र आणि वैद्याकशास्त्र.

लोकप्रिय अभ्यासक्रम: अर्थशास्त्र, कायदा, सार्वजनिक आरोग्य आणि चिनी भाषा व संस्कृती.

(उत्कृष्ट शैक्षणिक दर्जा आणि उत्साही कॅम्पस जीवनासाठी ओळखले जाते.)

फुदान विद्यापीठ (शांघाय)

शाखा: व्यवसाय, अर्थशास्त्र आणि जैव शास्त्र.

लोकप्रिय अभ्यासक्रम: आंतरराष्ट्रीय व्यवसाय, वित्त, बायोमेडिकल विज्ञान आणि पत्रकारिता.

(शांघायमध्ये स्थित असल्यामुळे उत्कृष्ट करिअर संधी उपलब्ध.)

शांघाय जिआओ टोंग विद्यापीठ (शांघाय)

शाखा: अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन.

लोकप्रिय अभ्यासक्रम: यांत्रिकी अभियांत्रिकी, संगणक शास्त्र, टइअ आणि लॉजिस्टिक्स.

(उद्याोगांशी संबंध आणि उत्पादन क्षेत्रातील संशोधनासाठी ओळखले जाते.)

झेजियांग विद्यापीठ (हांगझोऊ)

शाखा: अभियांत्रिकी, कृषीशास्त्र आणि वैद्याकशास्त्र.

लोकप्रिय अभ्यासक्रम: नागरी अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान आणि क्लिनिकल मेडिसिन.

(नाविन्यपूर्ण उपक्रम आणि आंतरशाखीय संशोधनासाठी प्रसिद्ध.)

चीन विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (USTC) (हेफेई)

शाखा: नैसर्गिक शास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र.

लोकप्रिय अभ्यासक्रम: क्वांटम भौतिकशास्त्र, पदार्थ विज्ञान आणि संगणक अभियांत्रिकी.

(अत्याधुनिक तंत्रज्ञानावर केंद्रित असलेले एक प्रमुख संशोधन विद्यापीठ.)

नानजिंग विद्यापीठ (नानजिंग)

शाखा: मानव्यशास्त्र, सामाजिक शास्त्र आणि पर्यावरण अभ्यास.

लोकप्रिय अभ्यासक्रम: इतिहास, पर्यावरण विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय संबंध.

(चीनमधील सर्वात जुने आणि प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक.)

सुन यात-सेन विद्यापीठ (ग्वांगझोऊ)

शाखा: वैद्याकशास्त्र, व्यवसाय आणि सामाजिक शास्त्र.

लोकप्रिय अभ्यासक्रम: क्लिनिकल मेडिसिन, MBA आणि सार्वजनिक धोरण.

(समृद्ध आर्थिक क्षेत्रात स्थित असून उद्याोगांशी घनिष्ठ संबंध)

महत्त्वाची वेब साईट :

http://www.chinesescholarshipcouncil.com