भारतात बेकार असलेल्या कमर्शियल पायलट लायसन्स होल्डरची संख्या २०२४ सालात दहा हजारांचा आकडा पार करेल. त्यांना लागणारी निर्णय क्षमतेची बुद्धिमत्ता व गरजेचे कौशल्य मात्र त्या विद्यार्थ्यांकडे असतेच असे नाही. त्यालाही अनुभवाची आणि त्यानंतर आलेल्या शहाणपणाची जोड गरजेची.

भारत हा जगातील असा एक देश आहे की जिथे सर्वात जास्त पायलट तयार होतात, पण सर्वात जास्त पायलट बेकारही राहतात. एकीकडे भारतीय विमान कंपन्यांना अनुभवी पायलट मिळत नाहीत म्हणून त्यांना परदेशातून पायलट निवडून बोलावून त्यांना नोकरीवर ठेवण्याची वेळ येते आणि दुसरीकडे बेकार असलेल्या कमर्शियल पायलट लायसन्स होल्डरची संख्या २०२४ सालात दहा हजारांचा आकडा पार करेल.

हे कोडे उलगडण्याचा प्रयत्न केला असता काही ठळक गोष्टी लक्षात येतात. विमान उडवण्याचे पहिले लायसन्स (पीपीएल) घेतल्यानंतर कमर्शियल पायलटसाठीची (सीपीएल) परीक्षा द्यावी लागते. दोन्ही परीक्षा पास झाल्यानंतर नोकरीसाठी एकच गोष्ट विचारली जाते, ती म्हणजे तुमचा ‘फ्लाईंग अवर्स’चा अनुभव किती तासांचा आहे? तो अनुभव त्यानंतर मोजायला सुरुवात केली तर जेमतेम काही तासांतच मोडतो. यावर उपाय म्हणून ज्यांच्याकडे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर स्वखर्चाने विमानात पेट्रोल भरून अनुभवासाठी ते उडवण्यासाठी पैसे असतात त्यांच्या खात्यात फ्लाईंग अवर्स भरले जातात. या वरचा दुसरा उपाय, काही जण ट्रेनर म्हणून नोकरी घेतात. पण अशांची संख्या पंचवीसात एक एवढीच राहाते. भारतात उड्डाण करण्यासाठी विमानांचे अनेक प्रकार आहेत. दोन सीटर सेस्ना तर चार सीटर सहा सीटर ही झाली खासगी छोटी विमाने. विविध उद्याोगपतींची अशी विमाने जुहू विमानतळावर पार्क करून ठेवलेली असतात. १८ सीटर २४ सीटर असलेली विमाने भारतात अत्यल्प वापरात आहेत. अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसाठी अशा पद्धतीची विमाने वापरात आहेत. कोणत्याही निवडणुका आल्या की या विमानांची मागणी वाढते. मोठ्या विमान कंपन्यांसाठी असलेली विमाने ९० पासून ४०० प्रवाशांना एका वेळी वाहून नेतात. या विमानांसाठी पायलटची नोकरी मिळणे हा खरा प्रश्न असतो.

अशा मोठ्या विमानांसाठीचे प्रशिक्षण खऱ्या अर्थाने खडतर असते. अनेक प्रोटोकॉल्स त्यात शिकावे लागतात. एखादा बारिकसा प्रोटोकॉल चुकला तर तुम्हाला त्या प्रशिक्षणातून बाहेर फेकले जाऊन पुन्हा सुरू करावे लागते. एक विनोदी पण अक्षरश: खरी असलेली तुलना येथे करावी वाटते. अनुभवी सर्जन जेव्हा एखादे ऑपरेशन करत असतो तेव्हा त्याला तात्काळ निर्णय घ्यावे लागतात व ते अमलात कसे आणायचे याकरिता मदत उपलब्ध नसते. तसाच काहीसा प्रकार ही मोठी विमाने चालवताना क्षणोक्षणी घ्यावा लागतो. फरक एवढाच की तिथे मदतीला को पायलट, नॅवीगेटर किंवा कॅप्टन शेजारी असतो व कंट्रोल रूममधून तुम्हाला सूचना मिळू शकतात.

भारतीय प्रशिक्षणात ज्यांना डॉक्टर व्हायचे आहे किंवा पायलट बनण्याचे स्वप्न पाहिले आहे, त्यांचे पालकांकडे भरपूर पैसे असतील तर दोन्ही बनता येते. पण दोन्हीसाठी लागणारी निर्णय क्षमतेची बुद्धिमत्ता व गरजेचे कौशल्य मात्र त्या विद्यार्थ्यांकडे असतेच असे नाही. दुर्दैवाने पैशाच्या बळावर दोन्हीमध्ये सध्या प्रवेश घेता येतो. काही विमान कंपन्यांत कॅडेट पायलट अशी प्रशिक्षणातून भरती अलीकडे सुरू झाली आहे. मात्र, प्रशिक्षणाचा खर्च मोठा असतो. किमान ३५ ते ७५ लाख एवढा खर्च येतो.

नवशिक्यांची बेकारी का?

पायलटमधील बेकारीचे दुसरे एक महत्त्वाचे कारण म्हणजे इंडियन एअर फोर्स, इंडियन नेव्ही या दोन्हीमध्ये पायलट म्हणून काम केलेली, अत्यंत कौशल्यपूर्ण विविध सेवा देऊन काहीशे तासांचा फ्लाईंग अवर्सचा अनुभव असलेली अधिकारी पायलट मंडळी वीस वर्षांची सेवा झाल्यानंतर अधिकृतपणे ऐच्छिक निवृत्तीचा अर्ज करतात. यांचे वय सहसा ४२ ते ४८ च्या दरम्यान असते. अशा निवृत्त झालेल्या अनेक अधिकाऱ्यांनी जगभरातील विविध विमान कंपन्यांमध्ये उत्तम स्वरूपाच्या नोकऱ्या पटकावल्या आहेत. त्यांच्या अनुभवाशी शिकाऊ कमर्शियल पायलट लायसन्स धारकांची तुलना नाही होऊच शकत नाही.

एअर फोर्समधून निवृत्त झालेल्या अनेक पायलटना खासगी मोठे उद्याोजक स्वत:च्या विमानावर पायलट म्हणून नोकरीला बोलावून घेतात व गलेलठ्ठपगारही देतात. शिस्तीत वाढलेल्या पायलटचे उद्याोजकाशी जुळले तर ते अनेक दिवस त्यांचे बरोबर मजेत काम करतात.

रशियाचे विघटन झालेल्या अनेक देशातील निवृत्त लष्करी पायलट जगभरातील विविध कंपन्यांत काम करत आहेत. हे एक महत्त्वाचे नवीन मुलांना संधी न मिळण्याचे कारण आहे. मात्र, यातील कुठलीच चौकशी न करता मुलाचा हट्ट पुरवणाऱ्यांची स्थिती आधीच्या तीन भागात सांगितलेल्या पालकांसारखी होते. पुन्हा याआधी दिलेल्या उदाहरणाशी तुलना करत आहे. कोणीही स्वत:चे ऑपरेशन करून घेण्याकरिता अनुभवी सर्जनच शोधत असतो तीच गोष्ट इथेही लागू पडते.

पायलटच्या कामाबद्दल थोडेसे

हा नऊ ते पाच सारखा ऑफिस जॉब नाही. अतिशय कटाक्षाने वेळेचे नियोजन करून महिनाभराच्या कामाच्या वेळा ठरतात. स्वाभाविकपणे सुट्ट्या सलग मिळतातच असे नाही. जोपर्यंत तुम्ही विमान उडवत असता तोपर्यंत मिळणारे भत्ते मूळ पगारात धरून ऐकिव पगार सुरू होतात. काही कारणाने आजारपणामुळे किंवा दुखापतीमुळे पायलटला विमान उडवण्यापासून प्रतिबंधित केले गेले, त्याला सोप्या भाषेत ‘ही इज ग्राऊंडेड’, असेही म्हणतात तर फक्त मूळ पगार मिळत राहतो. अशी वेळ आलेले अनेक जण माहितीमध्ये आहेत. पाठीचे, मानेचे मणक्याचे दुखणे मागे लागले तर दरवर्षी होणाऱ्या कठोर तपासणीमध्ये तुम्हाला ग्राउंडेड केले जाते. अपस्मार, दृष्टिदोष, मानसिक संतुलन, व्यसन यातील कोणत्याही गोष्टीमुळे नोकरी जाऊ शकते. लेखाचा शेवट आकर्षक करायचा झाला तर मोठ्या विमानाचा अनुभवी कॅप्टन बनलेला पायलट वर्षाला ८० लाख रुपये सहज मिळवतो. त्याचा रुबाब संपूर्ण कंपनीतील अनेकांना हेवा करण्याजोगा असतो.