विवेक वेलणकर

आयआयटीमध्ये पदवी शिक्षणासाठी प्रवेश हवा असेल तर सायन्स शाखेच्याच विद्यार्थ्यांना तेही जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेत उत्तम यश मिळवले तरच शक्य असते या पारंपरिक समजाला छेद देणारी एक संधी म्हणजे कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये डिझाइन क्षेत्रात पदवी मिळवता येते. मुंबई , दिल्ली , गुवाहाटी, हैदराबाद, रुरकी या आयआयटीमध्ये कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एका वेगळ्या सीईटी मधून डिझाईन क्षेत्रात पदवी मिळवता येते. या तीन तासांच्या तीनशे मार्कांच्या परीक्षेत दोन भाग असतात. पहिला भाग कॉम्प्युटर बेस्ड परीक्षेचा असेल ज्यासाठी दोनशे मार्क आणि दोन तास असतील.

यामध्ये तीन सेक्शन असतील ज्यातील पहिल्या सेक्शन मध्ये १४ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील , दुसरा सेक्शन १५ प्रश्नांचा असून तो बहुपर्यायी स्वरूपाचा असेल तर तिसरा सेक्शन २८ मार्कांचा असून योग्य पर्याय निवडा असा असेल. या तिन्ही सेक्शन मध्ये इंग्रजी, लॉजिकल रिझनिंग, क्रिएटिव्हिटी , डिझाइन सेन्सिटिव्हिटी , व्हिज्युअलायझेशन या विषयांवर प्रश्न असतील. दुसरा भाग शंभर मार्कांचा असेल आणि त्यात स्केचिंग व डिझाइन अॅप्टिट्यूड यावर प्रश्न असतील, हा भाग प्रत्यक्ष कागदावर सोडवायचा असेल. पहिल्या भागात कट ऑफच्या वर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचाच दुसऱ्या भागाचा पेपर तपासला जातो. दोन्ही भागांच्या एकत्रित मार्कांवर गुणानुक्रम जाहीर होतो. या डिझाइन अॅप्टिट्यूड टेस्टच्या मार्कांवर वरील सर्व आयआयटी मध्ये तर प्रवेश मिळतोच, पण याशिवाय बिट्स पिलानी सह जवळपास ३६ संस्थांमध्ये या मार्कांच्या आधारे प्रवेश मिळतो. यंदा ही परीक्षा १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत पुणे , मुंबई, नागपूर सह २७ शहरांमध्ये घेतली जाईल. यासाठीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.uceed.iitb.ac.in या संकेतस्थळावर ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत करता येतील.

हेही वाचा >>> Success Story : गरीब परिस्थिती, इंटरव्ह्यूला जाण्यासाठी नव्हते कपडे… परिस्थितीवर मात करून मिळवला ६७ वा क्रमांक

परीक्षेच्या निकालानंतर प्रवेशासाठी ५ फेऱ्या होतील. ज्या विद्यार्थ्यांकडे सर्जनशीलता आहे त्यांच्यासाठी डिझायनिंग हे उत्तम क्षेत्र आहे. यामध्येही फॅशन डिझायनिंग, प्रॉडक्ट डिझायनिंग, इंटिरिअर डिझायनिंग, ग्राफिक व कम्युनिकेशन डिझायनिंग असे विविध पर्याय उपलब्ध आहेत.

डिझायनिंग क्षेत्रात करिअर करायचे असल्यास विद्यार्थ्यांकडे खालील चार प्रकारची कौशल्यै व क्षमता असणे आवश्यक आहे –

१) हस्तकौशल्य व स्वानुभवातून कृती

२) चिंतन , विश्लेषण व हटके विचार करण्याची क्षमता , त्रिमितीय विचार क्षमता , चिकित्सक विचार क्षमता , भावना व विचार व्यक्त करण्याची क्षमता

३) नवनिर्मितीची दुर्दम्य इच्छा व अंत:प्रेरणा ४) प्रयोगशीलता व परिश्रम करण्याची तयारी.