डॉ. श्रीराम गीत

हे सदर नियमितपणे वाचणाऱ्या एका वाचकाने मला विचारले, ‘शालेय जीवनातील स्पर्धा अतितीव्र झालेली आहे. त्याबद्दल आपण कधीच काही उल्लेख का करत नाही? सगळी चर्चा चालते ती अकरावी, बारावी व पदवी दरम्यानची. करिअरमंत्र मधील प्रश्नोत्तरे सुद्धा मुख्यत: याच गटातील विद्यार्थ्यांसाठी असतात. सातवी, आठवीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न व त्यांच्या पालकांचे प्रश्न खूपच गंभीर आहेत. नववी, दहावीचे पालक तर या प्रश्नांमुळे त्रस्त आहेत.’

प्रश्न खरे का आभासी?    

त्यांच्या विधानासाठी त्यांनी विविध पालक गटातील व्हॉट्सअप ग्रुप वर चालणाऱ्या चर्चापण वाचून दाखवल्या. मग नेहमीचा ठेवणीतला प्रश्न मला विचारला, या ‘स्पर्धेत धावण्यापूर्वी’, पालकांनी काय करावे?

मला वैयक्तिकरित्या या प्रश्नांचे गांभीर्य कळते. अस्वस्थपणा जाणवतो. मात्र त्यावरची उत्तरे विविध उत्पन्न गटातील पालकांप्रमाणे व शाळेच्या स्तराप्रमाणे खूपच वेगवेगळी आहेत. त्यामुळे त्या साऱ्यांना एकच उत्तर देणे अशक्य. या उलट दहावीनंतर ही सारी मंडळी एका समान स्पर्धेला सुरुवात करतात. तिथे त्यांचा कस लागायला सुरुवात होते. मग ही स्पर्धा जिंकण्यासाठी किंवा त्या स्पर्धेला किमान पूर्ण करण्यासाठी काय काय करावे लागेल याबद्दल मी लिहीत आहे. हे विचारणाऱ्या पालकांचे समाधान झाले असेल असे मला वाटत नाही. म्हणून शालेय जीवनातील केजी ते दहावीच्या दरम्यानच्या वाटचालीला मी स्पर्धा का म्हणत नाही ते आज स्पष्ट करतो. कोणाला पटेल वा न पटेल पण कारणा सहित ते स्पष्ट करत आहे.

माध्यम : मूळ अडचण

मुले इंग्रजी माध्यमात शिकतात व त्यातूनच प्रगती होते असे म्हणून इंग्रजी माध्यमाची शाळा निवडली, तर ज्या घरात इंग्रजी बोलले जात नाही किंवा आई वडील संभाषण मातृभाषेतून करतात त्या मुलांना भाषा व सामाजिक शास्त्रे हे विषय आवडेनासे होतात. कारण वर्णन करण्यासाठी त्यांचेकडे पुरेशी शब्द संपत्ती नसते. अशीच अडचण शास्त्रीय संकल्पना सहजपणे कळण्यामध्ये येते. गणितात काय विचारले आहे हे जितके मातृभाषेतून सहज समजते तितके अन्य भाषेतून कळायला अवघड जाते. स्वाभाविकपणे विनाकारणच मार्कावर परिणाम दिसू लागतो. अभ्यासाची नावड निर्माण होते. शहरी मध्यवर्ती असलेल्या शाळांमध्ये प्रवेशाची झुंबड असते. या उलट शहरापासून दूर असलेल्या ‘इंटरनॅशनल’ या नावाच्या शाळांमध्ये जायचे, फी भरायची व प्रवेश घ्यायचा इतके सोपे असते, कारण दर वर्षांची फी लाखभर रुपयापासून सुरू होते.

अशा शाळांमध्ये अन्य सुविधा भरपूर असल्या तरी अभ्यासाच्या संदर्भात शिकवणारे शिक्षक तरुण, अनुनभवी असतात. मात्र, इंग्रजी माध्यमातून त्यांचे शिक्षण झाले असल्याने बोलण्यात ते प्रवीण असतात. शिकवण्यात असतात असे नाही. याला काही अपवाद असतातच. अशा साऱ्या शाळातील विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास विषयांसंदर्भात तीव्र स्पर्धा हा प्रकार कमी असतो. विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांना सुद्धा एक पक्का विश्वास असतो की पाहिजे तिथे, पाहिजे तशी, पदवीसाठी किंवा त्यानंतर सुद्धा अ‍ॅडमिशन आपण मिळवणार आहोत. याचा एकत्रित परिणाम म्हणजे जिद्द, प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, चिकाटीने अभ्यास करणे या ऐवजी शिकवणी वर्ग किंवा महागडी वैयक्तिक शिकवणी यातून जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांचा दहावीपर्यंतचा प्रवास पूर्ण होतो.

सारांशाने पुन्हा सांगायचे झाले तर स्पर्धा टाळण्याकडेच या विद्यार्थ्यांचा व पालकांचाही कल असतो. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड हा भाषाधारित असतो. त्याला आर्थिक छटा पण जरूर असते. छोटय़ा जिल्हा किंवा तालुकास्तरावरील इंग्रजी माध्यमाची शाळा व त्यातील टाय, बूट, इस्त्रीचे कपडे घातलेली मुलेमुली व सामान्य सरकारी शाळा यातील तफावत फारच प्रकर्षांने डोळय़ावर येते. मात्र जिद्द, कष्ट घेण्याची तयारी यात हे विद्यार्थी इयत्ता दहावी नंतरच्या साऱ्या स्पर्धामध्ये स्वत:चे स्थान पक्के करतात. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील नवोदय विद्यालये याला गेली तीस वर्षे साक्षी आहेत. अशा या विपरीत, असमतोल असणाऱ्या एसएससी बोर्ड, सीबीएससी बोर्ड, आयसीएससीई बोर्ड यांचे मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणूनच स्पर्धा नसते. ती असूही नये. खेळ, कला, छंद यांचा विकास करत सर्वानी शालेय शिक्षण पूर्ण करावे.