आयएएस, आयपीएस मुळात का व्हायचं आहे याचा विचार मुलांनी करायला हवा. गाडी, बंगला, या पदासोबतचं वलय पाहून हे क्षेत्र तुम्हाला खुणावत असेल तर या भौतिक गोष्टींकडे पाहून येऊ नका. जर तुम्हाला खरोखर काम करण्याची आवड आहे, जबाबदारी घेण्याची, निर्णय घेण्याची क्षमता अंगी बाणवायची आहे आणि तुमच्याकडे प्रचंड संयम आहे तरच या…असा सल्ला देत आहेत इगतपुरी, नाशिकमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी म्हणून कार्यरत असलेले आयएएस अधिकारी ओमकार पवार…
साताराजिल्ह्यातीलजावळी तालुक्यातलं सनपाणे हे माझं गाव. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो. पुढे दहावीपर्यंतचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत गावीच झाले. आई-वडील शेती करतात. तिथून मी साताराजवळ कराडला डिप्लोमा केला. इंजिनीअरिंग मी पुण्यात डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून केलं. इंजिनीअरिंग पूर्ण झाल्यानंतर मला दोन कंपन्यांमध्ये नोकरीची ऑफरही मिळाली होती. टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेसमध्ये आणि नौदलातही काम करण्याची संधी मिळाली होती.
माझी आजी सरपंच होती. त्यामुळे शासकीय यंत्रणा, नोकरशाहीशी संबंध यायचा. तसंच श्रीकर परदेश सर तेव्हा पिंपरी-चिंचवड पालिकेत आयुक्त होते. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना त्यांचं एक लेक्चर मी अटेंड केलं होतं. त्यांच्या भाषणाने मी प्रभावित झालो. त्यावेळी स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा निर्माण झाली. घरातूनही पाठिंबा मिळाला. तेव्हापासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.
आत्मपरीक्षणा नंतर मार्ग सापडला
आयएएस व्हायचं स्वप्नं पाहणं आणि ते प्रत्यक्षात उतरणं यात फार अंतर असतं. पहिल्या प्रयत्नात तर पूर्व परीक्षाही उत्तीर्ण झालो नव्हतो. त्यांनतर मुख्य परीक्षेत तीन प्रयत्नांत काहीच घडले नाही. मग असिस्टंट कमांडंट आणि पुढे पाचव्या प्रयत्नात आयपीएस आणि सहाव्या प्रयत्नात आयएएस झालो. स्पर्धा परीक्षांची तयारी मी पुण्यातूनच ज्ञानप्रबोधिनीतून सुरू केली. पण अभ्यास करताना वेगळं करण्याच्या नादात आपण स्पेशलायझेशनकडे वळतो. पण अभ्यासाच्या बेसिक गोष्टी त्यामुळे मागे पडतात. असा माझा अनुभव आहे. मी तीन वेळा मुख्य परीक्षा दिल्या. पण काहीच प्रगती नव्हती. प्रत्येक वेळी त्याच त्या अभ्यासाची उजळणी करत गेलो. त्याच चुकांची पुनरावृत्ती करत गेलो. दरम्यान कोविडची साथ आली आणि मला गावी जावं लागलं. गावी मी एकटात अभ्यास करू लागलो आणि तिथे एकटा राहिल्यामुळे आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळाली. काय चुका झाल्या याचा खोलात जाऊन विचार करू लागलो. मग कोविड सरला तरी मी पुण्यात परतलो नाही. उर्वरित सर्व परीक्षांचे अटेम्प्ट मी गावी राहूनच दिले. बेसिकची तयारी आपण करत नाही, हे ध्यानात आलं.
स्वत:ची पद्धत शोधा
कोणत्याही टॉपरला फॉलो करू नका. तीन-चार टॉपर्सची अभ्यासाची पद्धत, स्ट्रॅटेजी पाहून तुम्ही तुमची स्वत:ची अभ्यासाची पद्धत शोधा. पण कोणाचंही अंधानुकरण करू नका, असा माझा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांना सल्ला आहे.
क्वालिटी टाइम
अभ्यास मी जास्त वेळ करायचो नाही. सात-आठ तास अभ्यास व्हायचा. मी अभ्यास आणि अन्य आयुष्याचा समतोल साधायचा असं ठरवलं होतं. त्यामुळे अभ्यासासोबत मी घरची कामं, शेतीची कामं देखील करायचो. स्वत:ला मोकळा वेळही द्यायचो. ५० मिनिटे अभ्यास आणि दहा मिनिटे ब्रेक हे तत्त्व मी पाळायचो. व्यायामालाही वेळ द्यायचो. १५ दिवसांतून एक पूर्ण दिवस ब्रेकही घेत होतो. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीच महत्त्वाची असते.
अभ्यासात नेमकेपणा हवा
यूपीएससी हा एक समुद्र आहे. त्यात किती खोल खोल जाणार? त्याला काहीच अर्थ नाही. जितका करू तितका वेळ अपुरा आहे. म्हणूनच परीक्षेची नेमकी गरज काय आहे ते नेमकं ओळखून तेवढंच हीट करणं महत्त्वाचं आहे. पहिल्या प्रयत्नात तर मी पूर्व परीक्षेलाच अनुत्तीर्ण झालो होतो. नंतर तीन वर्षे मुख्य पर्यंत पोहोचलो. यश चौथ्या वर्षीच मिळाले. मग आयएएस होईपर्यंत एकूण सहा वर्षे लागली.
प्लान बी
मी जिरेनियमवरील प्रक्रिया करणारा प्रोजेक्ट करणार होतो. फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन स्थापन करण्याचा माझा विचार होता. म्हणजे यूपीएससी झालं नसतं तर अग्रो प्रोसेसिंगमध्ये काम करण्याचा माझा विचार होता. आणि सोबत एमपीएससी देण्याचाही विचार होता.
आयएएस, आयपीएस मुळात का व्हायचं आहे याचा विचार मुलांनी करायला हवा. गाडी, बंगला, या पदासोबतचं वलय बघून तुम्ही या क्षेत्रात येऊ पाहात असाल तर येऊ नका. भौतिक गोष्टींकडे पाहून येऊ नका. जर तुम्हाला खरोखर काम करण्याची आवड आहे, जबाबदारी घेण्याची, निर्णय घेण्याची क्षमता अंगी बाणवायची आहे आणि तुमच्याकडे प्रचंड संयम आहे तरच या. जसजसा समाज प्रगल्भ होत जातो, त्याची प्रगती होत जाते तसतशी नोकरशाहीची भूमिका बदलत जाते.
मी यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला या क्षेत्राविषयी सखोल माहिती नव्हती. अभ्यास करताना मला हे कळलं मी ते करू शकतो, मला याची आवड आहे हे कळत आहे. ही २४ तास ७ दिवस करावयाची नोकरी आहे. जबाबदारी खूप आहे. तुम्ही समाजात बदल घडवू शकता. तुम्ही उभारलेलं काम पूर्णत्वाला जाण्याचा आनंद मिळतो. पण एखादी छोटीशी चूकही भोवू शकते. पराभव सहन करण्याची क्षमता हवी. ग्रामीण भागातली मूलं खूप येतात. पण शाळा कोणतीही असो काही फरक पडत नाही. पण मराठी मुलांचा आत्मविश्वास कमी पडतो. पराभव पचवण्याची क्षमता हवी. रोज नवववी आव्हानं समोर येतात. जबाबदाऱ्या असतात.
गडचिरोलीत माझी पहिली पोस्टिंग होती. तहसीलदार कार्यालयातील एक महिन्याच्या कार्यकाळात काय करता येईल याचा विचार केला. संजय गांधी निराधार योजनेची तेथील कुरखेडा, आरमोरी या दुर्गम तालुक्यांतील लोकांना माहिती नव्हती. जेमतेम ३०-४० अर्ज महिन्याला येत ते मी जनजागृती आणि अन्य समस्यांवर काम करत प्रयत्नपूर्वक वाढवले. ३० ते ४० लाभार्थींवरून ही संख्या प्रति महिना १२१५ (कुरखेडा) आणि २०३१ (आरमोरी) पर्यंत पोहोचली. त्र्यंबकेश्वर-इगतपुरीतही नियमांतील जातीचा दाखले, नॉन क्रिमिलेटर दाखले २४ तासांच्या आत देण्याच काम केले.
माझ्या आयएएस होण्याच्या प्रवासात मला सारथी संस्थेची पण खूप मदत झाली. आता स्पर्धा परीक्षांचं चित्र बदलत आहे. सारथी, बार्टी, महाज्योती या स्कॉलरशिप देणाऱ्या संस्थांमुळे स्पर्धा परीक्षांमधील टक्का वाढला आहे. देशाचा विचार करता मुलीचं प्रमाणही वाढत आहे.माझ्या बॅचला २८ टक्के मुली होत्या, माझ्या नंतरच्या बॅचला ४० टक्के मुली होत्या. पण महाराष्ट्रातून जाणाऱ्या मुलीचं प्रमाण अजूनही कमी आहे. सामाजिक परिस्थिती, लग्नाचा दबाव अशी कारणं यामागे असू शकतात. पण हा टक्का वाढायला हवा कारण मुलींमध्ये नेतृत्व गुण, जबाबदारीची जाणीव उपजत फार चांगली असते.
– शब्दांकन : मनीषा देवणे
careerloksatta@gmail. Com