स्पर्धा परीक्षा असो की त्यानंतरचे प्रशासकीय सेवेतील काम, इथे कठोर परिश्रम, सातत्य आणि स्थिरता हे गुण अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रशासकीय सेवेत काम करताना तुम्हाला जितके वैविध्यपूर्ण काम करायला मिळते ते इतर कुठेच नाही. तुमचा सर्वागीण विकास करणारे आणि तुमच्या निर्णयक्षमतेचा कस लावणारे असे हे करिअर आहे, सांगताहेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड.
दिल्लीच्या मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयातून माझे एमबीबीएस पूर्ण केले. त्या दरम्यानच पदव्युत्तर अभ्यासक्रमाची तयारी करत होते. एमबीबीएसची परीक्षा दिल्यानंतर माझ्या भावाबरोबर एका सेमिनारला गेले होते. तेथे स्पर्धा परीक्षांबद्दलची अधिक माहिती मला मिळाली आणि मी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
पण त्यापूर्वी मी जेव्हा ग्रामीण भागात इंटर्नशीप करत होते, तेव्हा तेथे केवळ वैद्यकीय सेवा पुरवणे हाच उपाय नाही, तर इतर नागरी सुधारणाही गरजेच्या आहेत, हे माझ्या लक्षात आले होते. त्यासाठीचे पर्याय मी माझ्या परीने शोधत होतेच. त्यामुळे यूपीएससी देणे निश्चित केले. मी माझा निर्णय माझ्या घरी सांगितला तेव्हा माझ्या आई-वडिलांनी अतिशय आनंदाने त्यासाठी मला पाठिंबा दिला. त्यावर्षी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची परीक्षा द्यायची नाही असे मी ठरवले त्यालाही सहजपणे मान्य केले.
वैद्यकीय अभ्यासक्रमाचा फायदा
मी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यादृष्टीने अभ्यासाला सुरुवात केली. एनसीईआरटीच्या पुस्तकांचे वाचन, वृत्तपत्रांचे वाचन, लोकसभा, राज्यसभा टीव्ही पाहणे आणि जवळच्याच एका मार्गदर्शन केंद्रात जाऊन मार्गदर्शन घेणे, अशा पद्धतीने अभ्यास केला. मेडिकल कॉलेजची विद्यार्थी असल्याने दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून, पद्धतशीर आणि नियमित अभ्यास करायची सवय होतीच. त्याचा मोठा फायदा स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी झाला. टाइम टेबल तयार करून कोणतीही सबब न देता त्याचे काटेकोरपणे पालन करणे मला मेडिकल कॉलेजच्या अभ्यासामुळेच शक्य झाले. पूर्ण तयारी करून परीक्षा दिली आणि पहिल्या प्रयत्नात माझी ‘रँक’ ६०० च्या पुढे होती. कायम पहिल्याच प्रयत्नात यशाची चव चाखणारी मी मला पहिल्याच प्रयत्नात सफलता मिळूनही हवे ते यश न मिळाल्यामुळे मी नाराज झाले होते. इतकी नाराज की माझ्या त्यावेळच्या वागणुकीमुळे माझ्या घरच्यांनाही बराच वेळ मला रँक मिळाली आहे, हेच समजले नव्हते.
अपयश पचवायला शिकले पाहिजे
यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नाने किंवा सफलतेने मला काय शिकवले असेल तर अपयश पचवणे. मला रँक मिळाली होती. त्या रँकनुसार मला सरकारी नोकरीही मिळणार होती. मात्र, तुम्ही जे मनात योजता ते इथे होईलच याची खात्री अजिबात देता येत नाही. इतके दिवस दहावी असो, वैद्यकीय महाविद्यालयासाठीची, अभियांत्रिकीसाठीची प्रवेश परीक्षा किंवा त्यानंतर एमबीबीएसची परीक्षा.. मी जसे ठरवले तसेच आणि तेवढे यश मला मिळाले होते. ही पहिलीच परीक्षा अशी होती की मी ज्या प्रमाणात यश अपेक्षित केले होते, तेवढय़ा प्रमाणात मिळाले नव्हते.
कुटुंबाचा आधार महत्त्वाचा
मला माझ्या पालकांनी समजावले की पहिल्याच प्रयत्नात एवढे यशही सर्वानाच मिळते असे नाही, पुन्हा प्रयत्न कर. माझ्या सगळय़ा निर्णयात ते कायम माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिले. मला परीक्षेच्या अभ्यासाचा तणाव मोठय़ा प्रमाणात जाणवला नाही. मात्र, माझे सहाध्यायी, मित्र-मैत्रिणींकडे पाहिले की, कधी तरी आपण सगळय़ात मागे पडतोय अशी भीती वाटायची. त्यावेळीही केवळ कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे मला नकारात्मक विचार दूर सारता आले. मी कायम घरात राहूनच अभ्यास केला. जेव्हा तणाव जाणवायचा तेव्हा समाजमाध्यम, मोबाइल पासून दूर राहिले. माझे कुटुंबच माझ्यासाठी ‘स्ट्रेस बस्टर’ होते.
कमतरता शोधा
दुसऱ्यांदा परीक्षा देण्यापूर्वी मी मला कशात कमी गुण मिळाले हे तपासले. त्यासाठी माझ्यात काय बदल घडवून आणता येईल ते पाहिले. मी म्हणाले त्याप्रमाणे मी जी नोकरी करत होते, त्याने माझ्यात अनेक बदल घडवून आणले. माझ्या विचारांत परिपक्वता आली. त्या विचारांमुळे मुख्य परीक्षा आणि मुलाखतीत उत्तम यश मिळवता आले आणि मला अपेक्षित रँकही.
प्लॅन बी हवाच
ज्याप्रमाणे आर्थिक स्वावलंबन महत्त्वाचे आहे, त्याप्रमाणे किती वेळा परीक्षा द्यायची, कुठे थांबायचे हे योग्य वेळी लक्षात घ्या. त्यानुसार तुमचा प्लॅन बी तयार ठेवा. दुसऱ्या प्रयत्नात अपेक्षित यश मिळाले नसते तर मी तिसऱ्यांदा प्रयत्न करायचा ठरवला होता. त्यानंतर मात्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाकडे वळणार होतेच. शिवाय दरम्यानच्या काळात मी कंबाईन मेडिकल सर्विसेसची परीक्षाही उत्तीर्ण झाले होते. त्याद्वारे मिळणाऱ्या नोकरीचाही पर्याय माझ्याकडे उपलब्ध होता.
अर्थार्जनाचा फायदा
आर्थिक, मानसिक सर्वच दृष्टय़ा मला माझ्या पालकांचा पाठिंबा असला तरी मला स्वत:ला माझ्या पालकांवर स्पर्धा परीक्षांसाठी आर्थिकदृष्टय़ा अवलंबून राहायचे नव्हते. पहिल्यांदा परीक्षा दिली तेव्हा माझ्या इंटर्नशीपचे पैसे माझ्याकडे होते. दुसऱ्या प्रयत्नाच्या वेळी मी दिल्लीतील आरएमएल हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काही महिने काम केले. व्यक्तिपरत्वे आर्थिक स्थिती वेगवेगळी असू शकते. मात्र, स्पर्धा परीक्षांची तयारी करताना तुम्ही काही प्रमाणात का असेना आर्थिकदृष्टय़ा आत्मनिर्भर असाल, तर परीक्षा देताना कुटुंबावर आर्थिक भार देत असल्याचा तणाव राहणार नाही. अर्थार्जनासाठी जे काम करू त्याचा फायदा परीक्षेसाठी होतोच. मलाही आरएमएल हॉस्पिटलमध्ये केलेल्या कामाचा फायदा पुढे प्रशासकीय सेवेत काम करताना झाला. व्यवस्थापन, सहनशीलता, चांगल्या कामाला होणारा विरोध हाताळणे अशा अनेक गोष्टी मला तिथे शिकायला मिळाल्या. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला मी हेच सांगेन की लहान-मोठी का होईना नोकरी करा आणि त्याच्या जोडीला अभ्यास करा.
कामाचे स्वरूप लक्षात घ्या
स्पर्धा परीक्षांकडे वळणारे अनेक जण ती देण्यापूर्वी परीक्षांतील यशस्वीतेनंतरची आव्हाने लक्षात घेत नाहीत. कामाचे स्वरूप काय असते, पगार किती असतो हे लक्षात घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या ‘होम स्टेट’मध्येच काम करायला मिळेल असे नाही. मग जिथे तुम्हाला केडर मिळेल त्या राज्याची भाषा, संस्कृती जाणून घेऊन, त्याच्याशी जुळवून घेता आले पाहिजे. इथे स्त्री असो वा पुरुष या गोष्टींना सामोरे जाताना तेवढय़ाच अडचणी येऊ शकतात. त्यासाठी तुम्ही तयार असले पाहिजे. आरामदायी आयुष्याची कल्पना करणाऱ्यांनी इकडे वळताना नीट विचार करूनच वळावे असा सल्ला मी नक्की देईन.
शब्दांकन – प्रज्ञा तळेगावकर