या लेखात आपण भारतीय राज्यघटनेतील यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ‘संसद’ याबद्दल जाणून घेणार आहोत. २१ जानेवारी २०२५ च्या ‘इंडियन पॉलिटी’ या लेखात आपण हे बघितले आहे की ‘संसद’ या घटकांवर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. संसदेचा अभ्यास करताना आपण कोणत्या घटकांचा विचार करायला हवा ते आपण समजून घेवूयात झ्र
भारतीय संविधानाच्या भाग ५ मधील कलम ७९ ते १२२ हे भारतीय संसदेच्या तरतुदींशी संबंधित आहेत, ज्यात तिची संघटना, रचना, कालावधी, अधिकारी, कार्यपद्धती, विशेषाधिकार, अधिकार आणि इतर संबंधित पैलूंचा समावेश आहे. आपल्याला संसद समजून घेताना या सर्व बाबींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. संसदेच्या कार्य प्रक्रियेतील संकल्पना जसे की गणपूर्ती, अविश्वास प्रस्ताव, संसद तहकूब करणे, धन विधेयक इ. समजून घेणे आवश्यक आहे. यातील काही बाबी या संविधानाचा भाग नाहीत जसे की ‘अविश्वास प्रस्ताव’. आयोगाने संसदेतील कार्य प्रक्रियेतील कोणत्या बाबी संविधानाचा भाग आहेत वा नाहीत या अनुषंगाने प्रश्न विचारले आहेत.
२०२४ च्या पूर्वपरीक्षेतील प्रश्न बघा
प्र. लोकसभेच्या अध्यक्षांच्या संदर्भात, खालील विधाने विचारात घ्या:
लोकसभेच्या अध्यक्षांना काढून टाकण्याचा कोणताही ठराव विचाराधीन असताना
१. तो/ती अध्यक्षस्थानी राहणार नाही.
२. त्याला/तीला बोलण्याचा अधिकार राहणार नाही.
३. त्याला/तीला पहिल्या टप्प्यात ठरावावर मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
(अ) फक्त १ (ब) फक्त १ आणि २ (क) फक्त २ आणि ३ (ड) १, २ आणि ३
हा प्रश्न संसदेतील अधिकारी म्हणजेच लोकसभा अध्यक्ष (स्पीकर) यांच्याबद्दल विचारलेला असून यात भारतीय संविधानातील कलम ९६ नुसार ते असा ठराव विचाराधीन असताना अध्यक्षस्थानी नसतील व कलम ९६(२) नुसार लोकसभा अध्यक्ष या ठरवासाठी मतदान करू शकतात व स्वत:चे मत मांडू शकतात. संसदेतील महत्त्वाच्या पदांबद्दल आपल्याला इत्यंभूत माहिती घेणे अपेक्षित आहे.
संसदेतील कार्य प्रक्रियेबाबत विचारलेला २०२४ च्या पूर्वपरीक्षेतील खालील प्रश्न ‘सभागृहाचे अधिवेशन स्थगित करणे’ व ‘लोकसभा विसर्जित करणे’ याबाबत आहे
प्र. भारतीय संसदेच्या संदर्भात, खालील विधाने विचारात घ्या:
१. भारताच्या राष्ट्रपतींनी सभागृहाचे अधिवेशन स्थगित करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची आवश्यकता नाही.
२. सभागृहाचे अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर सामान्यत: सभागृहाचे अधिवेशन स्थगित केले जाते परंतु भारताच्या राष्ट्रपतींना अधिवेशन सुरू असलेल्या सभागृहाचे अधिवेशन स्थगित करण्यास कोणताही प्रतिबंध नाही.
३. लोकसभा विसर्जित करण्याचे काम भारताचे राष्ट्रपती करतात, जे अपवादात्मक परिस्थिती वगळता, मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार करतात.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
(अ) फक्त १ (ब) १ आणि २ (क) २ आणि ३ (ड) फक्त ३
भारतीय संविधानातील कलम ८५ (२) चा विचार करता पहिले विधान चुकीचे आहे. विधान २ व ३ योग्य असून विधान ३ भारतीय संविधानाच्या कलम ८३ (२) नुसार योग्य आहे.
संसदेतील कार्य प्रक्रिया समजून घेताना अशा संकल्पना नीट अभ्यासा
लोकसभा विसर्जित झाल्यानंतर लोकसभा व राज्यसभा यांच्यासमोरील विधेयकांवर जो परिणाम होतो त्यावर २०२४ च्या पूर्वपरीक्षेत खालीलप्रश्न विचारलेला आहे –
प्र. भारतीय संसदेच्या संदर्भात, खालील विधाने विचारात घ्या:
१. लोकसभेत प्रलंबित असलेले विधेयक त्याच्या विसर्जनानंतर रद्द होते.
२. लोकसभेने मंजूर केलेले आणि राज्यसभेत प्रलंबित असलेले विधेयक लोकसभेच्या विसर्जनानंतर रद्द होते.
३. भारताच्या राष्ट्रपतींनी सभागृहांना संयुक्त बैठक बोलावण्याचा त्यांचा हेतू सूचित केलेला विधेयक लोकसभेच्या विसर्जनानंतर रद्द होतो.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?
(अ) फक्त १ (ब) १ आणि २ (क) २ आणि ३ (ड) फक्त ३
यावरून आपण हे समजून घ्यायला हवे की संसदीय कार्य प्रणालीतील प्रक्रियेचे नेमके परिणाम आपल्याला माहीत असायला हवेत.
आयोगाने अलिकडच्या काळात संसदीय समित्यांवर प्रश्न विचारताना परंपरागत ‘अंदाज समिती’, ‘लोकलेखा समिती’ व ‘सार्वजनिक उपक्रम समिती’ यावर प्रश्न न विचारता इतर संसदीय समित्यांवर प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. जसे की २०२४ मध्ये नीतिशास्त्र समितीवर प्रश्न विचारला गेला होता. तशी नीतिशास्त्र समिती चर्चेतही होती. समित्यांचा अभ्यास करताना समितीची स्थापना, सदस्य संख्या, लोकसभा व राज्यसभा यांचा सहभाग इ. बाबींचा अभ्यास करायला हवा. ‘इंडियन पॉलिटी’ मधील सर्वाधिक प्रश्न हे संसदेवर विचारले जातात तेव्हा चालू घडामोडींना समोर ठेवून गतवर्षीच्या प्रश्नांचे विश्लेषण करून आपण अपेक्षित प्रश्नांवर काम करायला हवे.
sushilbari10 @gmail. com