माणसाचे विचार वाचनानेच समृद्ध होतात. प्रत्येक पुस्तकात एक नवा अनुभव असतो. हा अनुभव वाचकांना देण्यासाठी त्यांच्या दारात ट्रकभर पुस्तके आणण्याचा उद्याोग ऋतिका आणि आशय वाळंबे या जोडप्याने पुण्यात लॉकडाऊनमध्ये सुरू केला आणि बघता बघता हे दोघे ‘पुस्तकवाले’ म्हणूनच ओळखले जाऊ लागले. हा अनुभव जाणून घेऊ आशय वाळंबे यांच्या शब्दांत…

२०२० मध्ये पहिल्या लॉकडाऊनमध्ये लोकांपर्यंत सर्व वस्तू पोहोचत होत्या, पण पुस्तके पोहोचत नव्हती, कारण पुस्तके अत्यावश्यक वस्तूंमध्ये येत नाहीत. ल़ॉकडाऊन थोडा शिथिल झाला तेव्हा रहिवासी संकुलांमध्ये भाजीवाले, बेकरी प्रोड्कट वगैरेच्या गाड्या लागत. लोक इमारतीच्या आवारात एकत्र जमून त्या वस्तू घेत. त्यातून आम्हाला कल्पना सुचली जर सर्व वस्तू अशा विकल्या जात असतील तर पुस्तकेही विकता येतील. पुस्तके अशी विक्रीसाठी उपलब्ध असणे नवे नव्हते. पण पुस्तके दारापर्यंत येणे नवे होते. लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. या सेवेला किंवा उत्पादनाला मूल्य नसते तर ते कदाचित सहा महिन्यांनी बंद झाले असते. पण ते पाच वर्षे होऊनही अजूनही व्यवस्थित सुरू आहे.

मी इंजिनीअरिंग आणि एमबीए केलं आहे आणि माझी पत्नी ऋतिका ही कमर्शिअल आर्टिस्ट आहे. आधी आम्ही नोकरी करत होतो. त्यामुळे क्रिएटिव्ह आणि मॅनेजमेंटचा आम्ही उत्तम मेळ साधला. आधी आम्ही आमच्या रजेच्या दिवशी शनिवार, रविवार आमच्या कारमधून पुण्यात सोसायट्यांमध्ये पुस्तकं आणायचो. पिझ्झा खायला जर लोक एकावेळी ५०० रुपये खर्च करत असतील तर पुस्तकांसाठी महिन्याचे २०० रुपये का खर्च करणार नाहीत, हा त्यामागचा विचार होता. याशिवाय पायरसी रोखून थेट प्रकाशनांकडून पुस्तक लोकांपर्यंत घेऊन जाणे हाही उद्देश होता.

पुण्यात साधारण १० हजार सोसायट्या आहेत. त्यामुळे आपला उद्याोग वाढू शकतो हे आमच्या लक्षात आलं. ट्रक बनवणाऱ्या इसोजू कंपनीनी देशभरात एक स्पर्धा ठेवली होती. समाजोपयोगी काम करणाऱ्या पहिल्या विजेत्याला ट्रक मिळेल. तो ‘पुस्तकवाले’ला मिळाला. त्यामुळे आमचा स्वत:चा ट्रक झाला. मग आणखी एक ट्रक घेतला जेणेकरून जास्त इमारतींमध्ये जाता येईल. त्यानंतर सोमवार ते शुक्रवार कंपन्या आणि शाळांमध्येही प्रदर्शने भरवू लागलो. शाळा आणि हाउसिंग सोसायटींना स्वत:चे ग्रंथालयही उभारून देऊ लागलो.

आम्ही दोघांनी नोकरी सोडून हाच पूर्णवेळ व्यवसाय म्हणून निवडला. नंतर व्याप इतका वाढला की आम्ही दोघेसुद्धा कमी पडू लागलो. मग आम्ही कॉलेजमधील तरुणांची १०० जणांची टीम बनवली. या मुलांना अनुभवही मिळतो आणि अर्थार्जनही होते. प्रदर्शने लावण्यापासून हिशेब ठेवण्यापर्यंतची कामं ही मुलं करतात. आम्हाला पुस्तके विकून थोडेफार उत्पन्न मिळत होते. पण हा व्याप वाढवल्यावर थोडा तोटा होऊ लागला. मग आम्हाला यासाठी अनेकांनी सहाय्यही केलं. मित्रमंडळींनी कर्ज उभारायला मदत केली. भांडवल उभं केलं आणि त्यातून सावरलो. आता आमचा उद्याोग प्रॉफिटेबल आहे.

वाचनसंस्कृती कमी झालीय, लोक किंडलवर वाचतात असे सर्व मुद्दे आम्ही हा उद्याोग सुरू करण्यापूर्वी विचारात घेतले होते. पण पुस्तक हातात येतं तेव्हा त्याचा स्पर्श, त्याचा कोरा करकरती गंध लोकांना भावतो. वाचकांना पुस्तके प्रत्यक्षच वाचायला आवडतात. समस्या पुस्तक वाचण्याविषयीची नव्हती. लोकांचा अटेन्शन स्पॅन कमी होत चालला आहे, ही मुख्य समस्या होती. मुलांच्या हातात पुस्तकाऐवजी मोबाइल असतो कारण आईवडिलांच्या हातात तो असतो. सोसायटीतच पुस्तकांची गाडी आली तर किमान एक पुस्तक घेऊन तर सुरुवात होईल. वाचायची सवय तर लागेल. पुस्तकामुळे तीन तासांचा रिल टाइम पाऊण तासावर आला तर तेही खूप आहे. एकाने पुस्तक घेतलं की त्याचा सकारात्मक संसर्ग होता. आईवडिलांनी पुस्तक विकत घेतलं की मुलं घेतात, त्यांचे मित्र घेतात, शेजारी घेतात, असा आमचा अनुभव आहे. आम्ही ज्या सोसायटीत किंवा कंपनीत जातो, तिथल्या वॉचमनला, गार्डना आवर्जून एक पुस्तक भेट देतो. हे पाहिल्यावर सोसायटीतील महिला त्यांच्या घरकामगारांनी पुस्तके देतात. हे झिरपत जातं. आम्हाला ही ऑर्गेनिक ग्रोथ हवी आहे. आणि ही हळूहळू होत आहे.

पुण्यात १२०० निवासी सोसायटींमध्ये आमचा आता कनेक्ट झाला आहे. आमची आतापर्यंत १४३५ प्रदर्शने झाली. आमची चार वर्षांची उलाढाल दीड कोटी आहे. ७५ हजार पुस्तके आम्ही विकली आहेत. यापैकी ७० टक्के पुस्तके ६ ते १३ या वयोगटासाठी होती. मुलांना चित्र आवडतात, जादू, खजिना, रहस्य हे शब्द असले की पुस्तके घेतात. मुलांमध्ये शिवाजी महाराज आणि कॉमिक्स यांना प्रचंड मागणी आहे. मोठ्यांमध्ये ऐतिहासिक पुस्तकांना मागणी आहे. कंपन्यांमध्ये आर्थिक आणि सेल्फ हेल्प पुस्तकांना मागणी असते. काही प्रमाणात कथाकादंबऱ्यांनाही मागणी असते. ६० टक्के इंग्रजी आणि ४० टक्के मराठी पुस्तके विकली जातात. पुणे आहे म्हणून वाचणारे लोक आहेत असेही नाही. आम्ही मुंबईतही प्रयोग करून पाहिले तर तसाच अनुभव आहे. ठाण्यात, नवी मुंबईत पुस्तकवालेचे मॉडेल १०० टक्के वर्कआऊट होऊ शकते.

बिझनेस वेडेपणाने सुरू करा पण तो चालवा शहाणपणाने. तोटा होत असला तरी अनेकजण उद्याोग रेटत राहतात. कुठे थांबावं, कुठे बदलावं हे कळायला हवं. आम्ही व्हॉट्स अॅपवर चॅटबॉट विकसित केला आहे. त्यात प्रश्न विचारले जातात. कोणती भाषा, वयोगट, आवड असे प्रश्न विचारून वाचकाला पुस्तक निवडीसाठी मदत करतो. आता आम्ही क्विक कॉमर्ससारखी पुस्तके पुरवणार आहोत. म्हणजे काही दिवसांनी झेप्टोद्वारे आमची पुस्तके येऊ शकतात. पुस्तकांचं महत्त्व लोकांना पटत चाललं आहे, सर्व स्तरातून वाचनाविषयी बोलले जात आहे. वाचन प्रेरणा दिन साजरे होत आहेत. त्यामुळे ही वाचन चळवळ अशीच अव्याहत सुरू राहणार आहे.

(शब्दांकन : मनीषा देवणे)