सुप्रिया देवस्थळे

डीएएफमध्ये उमेदवाराच्या शिक्षणाचे तपशील असतात. उमेदवार ज्या वर्षी परीक्षा उत्तीर्ण झाले ते वर्ष, ज्या संस्थेतून शिक्षण घेतले तिचे नाव, मिळालेले गुण किंवा क्लास आणि शिकलेले विषय या माहितीचे टेबल असते. याबद्दल काय आणि कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची काही उदाहरणे पाहूया.

संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचा शेवटचा टप्पा म्हणजे व्यक्तिमत्त्व चाचणी. या व्यक्तिमत्त्व चाचणी बद्दल सविस्तर माहिती आपण या सदरामध्ये घेत आहोत. २०२४ ला जी परीक्षा सुरू झाली, त्याचा शेवटचा व्यक्तिमत्त्व चाचणीचा टप्पा सध्या सुरू आहे. या व्यक्तिमत्त्व चाचण्या जानेवारी महिन्यात सुरू झाल्या. आतापर्यंत अनेक उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्व चाचण्या झाल्या आहेत. यातल्या काही उमेदवारांशी चर्चा केल्यावर एक महत्वाची गोष्ट लक्षात येते ती म्हणजे ही व्यक्तिमत्त्व चाचणी आहे, यात फक्त प्रश्नोत्तरं होत नाहीत. उमेदवारांशी वेगवेगळ्या विषयांवर संभाषण करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्यामुळे यात उत्तर चूक किंवा बरोबर असा मुद्दा नाही. वेगवेगळ्या विषयांवरची चर्चा आहे. या चर्चेतून उमेदवाराला त्या विषयाची कितपत जाण आहे, त्याच्या मतांमध्ये संतुलन आहे का या गोष्टी पाहिल्या जातात.

काही वेळा सदस्य उमेदवाराच्या विरोधात मत व्यक्त करतात, आपल्या मतापेक्षा वेगळं मत स्वीकारून आपलं मत ठामपणे मांडता येत आहे का, किंवा सदस्यांनी वेगळं मत मांडलं तर ते लगेच मान्य करून स्वत:च मत उमेदवाराने बदललं का या गोष्टी पाहिल्या जातात. किंवा सदस्य वेगळं मत व्यक्त करतात तेव्हा उमेदवाराच्या चेहेऱ्यावर किंवा बोलण्याच्या पद्धतीत चिडचिड दिसते का हेही बघितले जाते. आपली देहबोली हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे उगाचच खूप हातवारे करून बोलणं किंवा खुर्चीला पाठ ना टेकता एकदम ताठ बसणं या गोष्टी योग्य नाहीत. उमेदवाराला जी खुर्ची दिलेली असते त्याला हात असतात त्यावर हात ठेवून, पाठ टेकवून व्यवस्थित बसावं. खुर्चीला पाठ टेकवली नाही तर पाय अधांतरी राहतात मग ते पाय विनाकारण हलवले जाऊ शकतात. हे टाळण्यासाठी व्यवस्थित टेकून बसावं.

DAF मध्ये उमेदवाराच्या शिक्षणाचे तपशील असतात. दहावी, बारावी, ग्रॅज्युएशन,पोस्ट ग्रॅज्युएशन या क्रमाने माहिती असते. ज्या वर्षी परीक्षा पास झाले ते वर्ष, ज्या संस्थेतून विद्यापीठातून शिक्षण घेतलं त्याचं नाव, मिळालेले गुण किंवा क्लास आणि शिकलेले विषय या माहितीचं टेबल असत. या बद्दल काय आणि कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची काही उदाहरणं पाहूया. एखाद्या विद्यार्थ्याने २००८ साली मुंबई मधून ग्रॅज्युएशन केलं असेल तर त्या वर्षी मुंबईत कुठची महत्वाची घटना घडली असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. (२१-११-२००८ ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलं असेल तर या विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव का दिले असा प्रश्न विचारला जाऊ शकतो.

आयआयटी सारख्या संस्थेतून ग्रॅज्युएशन केलं असेल तर देशात आयआयटी स्थापन करण्यात कोणाची भूमिका महत्त्वाची होती? आयआयटी स्थापन करण्यासंदर्भात कुठचा कायदा आहे कि सरकारच्या निर्णयानुसार त्यांची स्थापना झाली? आयआयटी ना अभ्यासक्रम ठरवण्याचं स्वातंत्र्य आहे का? आयआयटी ना सरकारकडून अर्थ सहाय्य मिळतं का? आयआयटी कडे स्वत:चे उत्पन्नाचे काही स्त्रोत आहेत का? आयआयटी ना Institutes of National Importance हा दर्जा आहे, याचा अर्थ काय? हा दर्जा देशातल्या इतर कोणत्या शैक्षणिक संस्थांना आहे? आयआयटी आणि एनआयटी यांच्यामध्ये काय फरक आहे? आयआयटी च्या विद्यार्थ्यांना हमखास विचारला जाणारा आणखी एक प्रश्न म्हणजे, ह्यह्ण तुम्हाला आयआयटी मध्ये बराच खर्च करून तांत्रिक शिक्षण दिल आहे, ते सोडून तुम्ही प्रशासनात का येऊ इच्छिता ? आय आय टी मध्ये विद्यार्थी आत्महत्या का आणि कशी थांबवता येईल? ब्रेन ड्रेन आणि आय आय टी हे समीकरण सध्या बदलत आहे का? बॉम्बेचे मुंबई नामकरण १९९६ साली झाले मग आयआयटी बॉम्बे का आणि मुंबई का नाही? महत्त्वाचे माजी विद्यार्थी आणि त्यांचे विविध क्षेत्रातील योगदान या वरही प्रश्न विचारतात. वेगवेगळ्या परीक्षांचे गुण वेगवेगळ्या पद्धतीने दिले जातात. दहावीच्या परीक्षेला साधारणपणे पर्संटेज असतात. इंजिनियरिंग च्या ग्रॅज्युएशन मध्ये सीजीपीए असतात. काही वेळा पर्सेन्टाइलही असतात. या सगळ्यामध्ये काय फरक आहे. प्रत्येक गुण पद्धतीचे फायदे तोटे माहिती असले पाहिजेत. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना बीई आणि बीटेक मध्ये काय फरक आहे आणि अभियांत्रिकी शिक्षणाचा वापर प्रशासनात कसा कराल? भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियांत्रिकी दिवस म्हणून का साजरा करतात आणि आजकाल अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षणाचा दर्जा कसा उत्तम करायला हवा या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात.

एखादा उमेदवार डॉक्टर असेल तर त्यालाही, मेडिकल शिक्षण घेतल्यावर तुम्ही प्रशासनात का येऊ इच्छिता हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सरकार डॉक्टरांच्या शिक्षणावर खूप खर्च करतं, तुम्ही हे महागडं शिक्षण फुकटच घालवता आहात, तुमच्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याचा प्रवेश हुकला त्याचे काय? अशा प्रकारचे थोडे ट्रिकी प्रश्न पण विचारले जाऊ शकतात. एमबीबीएस डॉक्टर विद्यार्थ्यांना नेहमीचा प्रश्न – आयुष पदवीधर मंडळींना अॅलोपथी प्रॅक्टिस करायला परवानगी द्यावी की नाही? हा प्रश्न हमखास विचारतात. मेडिकल पदवीधर विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात सक्तीची इंटर्नशिप करावी का? भारतात वैद्याकीय शिक्षण का खर्चिक आहे आणि भारतीय विद्यार्थी युक्रेन, चीन , फिलिपीन्स सारख्या देशात वैद्याकीय शिक्षण घेण्यासाठी का जातात?

एकूणच आपल्या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण विषयावर आणि प्रशासनात त्या ज्ञानाचा वापर यावर आपण बारकाईने तयारी करायला हवी.

mmbips@gmail. com

supsdk@gmail. com