– डॉ. भूषण केळकर, डॉ. मधुरा केळकर
हे शीर्षक देण्याचं कारण असं की BC म्हणजे ‘Before ChatGPT’ आणि AD म्हणजे ‘After DeepSeek’! आपलं शिक्षण हे BC मध्ये होणार आहे आणि नोकरी मात्र आपण AD मध्ये करणार आहोत! म्हणून, पदवी करत असतानाच काही महत्त्वाची कौशल्य आत्मसात केल्यास व्यवसाय, नोकरीमध्ये ‘पहिलं पाऊल’ टाकताना आपल्याला त्रास होणार नाही.
व्यक्तिगत विकासाबद्दलची कौशल्यं आपण आधी दोन लेखांमध्ये बघितली. आजच्या लेखामध्ये आपण काही महत्त्वाची व्यावसायिक कौशल्यं कोणती आणि ती कशी मिळवायची हे बघू.
व्यावसायिक कौशल्यामध्ये सर्वप्रथम असेल ते तांत्रिक आणि डिजिटल कौशल्य. ही मिळवण्यासाठी कोर्सेरा, युडेमी किंवा लिंक्डइन लर्निंग यासारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता. इंडस्ट्रीशी संबंधित सॉफ्टवेअर आणि साधने याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे चांगले. कोडींग, डेटा विश्लेषण किंवा इतर संबंधित क्षेत्रांमध्ये प्रमाणपत्रे मिळवा. डेटा सायन्स यासाठी आता अनेक विद्यापीठांनी स्वत:ची पदवी देणे सुरू केले आहे. आयआयटी चेन्नईचा डेटा सायन्स कोर्स प्रसिद्ध आहे. त्यात तुम्ही प्रमाणपत्र, डिप्लोमा किंवा पदवी मिळवू शकता (जेईई न देता !)
दुसरं म्हणजे नेटवर्किंग. वेगवेगळ्या करिअर फेयर्स, कॉन्फरन्स, माजी विद्यार्थ्यांचे मेळावे या कार्यक्रमांमध्ये उपस्थिती ठेवा. लिंक्डइनवर एक व्यावसायिक प्रोफाईल तयार करा आणि उद्याोग तज्ज्ञांशी, मानव संसाधन तज्ञांशी संपर्क साधा. आपापल्या करिअरमध्ये उंचीवर पोहोचलेल्या व्यावसायिकांच्या करिअरच्या मार्गाबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्या संपर्कात रहा. जे ज्ञान तुम्हाला त्यांच्याकडून मिळेल ते पुस्तकात (आणि डीपसीक वर सुद्धा!) मिळणार नाही !!
तिसरं म्हणजे संशोधन आणि विश्लेषणात्मक कौशल्ये. त्यासाठी शैक्षणिक संशोधन प्रकल्पांमध्ये सहभाग घ्या. डेटा विश्लेषण प्रकल्पांवर काम करण्यासाठी एक्सेल, पायथन किंवा फ यासारखी साधने शिकून घ्या आणि वापरा. जर्नल्स वाचा शैक्षणिक आणि औद्याोगिक प्रकाशने जे साहित्य प्रकाशित करतात, जसे मासिके, पुस्तके त्याचे सभासदत्व घ्या, नियमित पणे वाचा. हे अध्यारुत आहे की तुमच्याकडून वर्तमानपत्र नियमित वाचले जात असेल, फोन वर येणाऱ्या अनेक विनामूल्य अॅप्सवर (CXQF JagaranJosh) सामाजिक, सांस्कृतिक व राजनीतिक आणि शास्त्रीय बातम्या, त्यांचे विश्लेषण हे वाचतच असाल. पुढचा मुद्दा आहे कार्य नैतिकता आणि व्यावसायिकता. त्यात पहिले येते ते म्हणजे जबाबदारी घेणे. स्वत:च्या निर्णयांची जबाबदारी घेण्याची सवय करण्यासाठी आपल्या शाळा कॉलेजमध्ये जबाबदारीची मागणी करणाऱ्या भूमिका स्वत:हून स्वीकारा. स्वयंसेवक व्हा. दुसरे वक्तशीरपणा – रोजचे वर्ग, क्लास, मीटिंग यात वेळेवर येण्याचा सराव करा, दिलेल्या किंवा स्वत: मानलेल्या डेडलाईन्स पाळण्याचे स्वत:वर बंधन घालून घ्या. प्रोफेशनल एक्सपोजर घेताना जसे इंटर्नशिप किंवा अर्धवेळ नोकऱ्यांमध्येही जास्तीत जास्त व्यावसायिकपणे काम करण्याचा प्रयत्न करा.
त्यानंतरचा मुद्दा, उद्याोजकता, कल्पकता आणि नवोपक्रम. ब्लॉग लिहिणे, सोशल क्लब, स्वत:चा यूट्यूब चॅनेल सुरु करणे, किंवा छोटया स्तरावर व्यवसाय, यासारखे उपक्रम सुरू करा, छोटे प्रकल्प सुरू करा. आमच्या ओळखीच्या एका विद्यार्थिनीने पुस्तकांमध्ये ठेवण्याचे बुकमार्क बनवण्याचा एक छोटा उद्याोग सुरू केला आणि त्याला सोशल मीडिया मार्केटिंग वापरून तिने चांगला व्यवसायही केला. उद्याोजकतेसाठीचे बूट कॅम्पस, सेमिनार्स यामध्ये सहभाग घ्या, तज्ञांकडून शिका हॅकॅथॉन किंवा आयडिया पिचिंग सारख्या स्पर्धांमध्ये भाग घ्या, ‘शार्कटँक’ सारखे कार्यक्रम बघा.
स्वत:मध्ये व्यावसायिकता निर्माण करण्यासाठी वास्तविक वातावरणात जास्तीत जास्त अनुभव घ्या, विशिष्ट कौशल्य आणि ज्ञान हे कार्यशाळांमधून वाढवा. सुधारणा कुठे करायच्या हे ओळखण्यासाठी मार्गदर्शक, समवयस्क आणि प्रशिक्षकांच्या मदतीने नियमितपणे प्रगतीचे मूल्यमापन करा.
पुढील काळात येणाऱ्या अपरिहार्य वेगवान बदलांना समर्थपणे तोंड देण्यासाठी शिवाजी महाराजांचा विद्याुतवेगाने केलेला गनिमी कावा हाच उपयोगी ठरेल हे आपण शिवजयंतीच्या मुहूर्तावर लक्षात घेतलं पाहिजे! शिवजयंतीच्या सर्व वाचकांना शुभेच्छा!
● bhooshankelkar@hotmail.com
● mkelkar_2008 @yahoo. com