भारतात दरवर्षी भूकंप, दुष्काळ, अतिवृष्टी, भूस्खलन, हिमस्खलन, चक्रीवादळ, गारपीट अशा अनेक नैसर्गिक आपत्ती घडत असतात. अनेक राज्यांना या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. यात महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी पावसाळ्यात माळीन, तळीयेसारख्या भूस्खलनाच्या घटना घडल्या; ज्यात शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यावेळी एनडीआरएफ टीमच्या मदतीने नागरिकांना मदत आणि बचाव कार्य करून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. यानंतर आता रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरळ कोसळल्याची घटना समोर आली. यावेळीही एनडीआरएफ टीमच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. आपत्तीच्या वेळी यंत्रणा असहाय्य होतात, त्यावेळी हे एनडीआरएफचे जवान आपला जीव धोक्यात टाकून पीडितांचे जीव वाचवण्याचे काम करतात. तुम्हालाही अशाप्रकारे लोकांच्या मदतीसाठी काम करायचे असेल तर एनडीआरएफ क्षेत्रात करियरच्या अनेक संधी आहेत. पण, या क्षेत्रात येण्यासाठी शिक्षणाची अट किती? ते कसे काम करतात ? त्यांचे प्रशिक्षण अन् पगार किती असतो जाणून घेऊ…
एनडीआरएफमध्ये भरती होण्यासाठी शिक्षणाची अट
सर्टिफिकेट कोर्सेसपासून ते बॅचलर डिग्री, पीजी डिप्लोमा, मास्टर डिग्री आणि पीएचडी स्तरावरील कोर्सेस आपत्ती व्यवस्थापनामध्ये चालवले जातात. पण, यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून कोणत्याही विषयात इयत्ता १२ वीत किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पीजी डिप्लोमा किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, पदवी (बीए/बीएससी/बी.कॉम) आवश्यक आहे. उमेदवार या क्षेत्रात बीए, एमए, एमबीए, एमएससी, एमफिल, पीएचडी, रिसर्च, ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये सहभागी होऊ शकतात.
एनडीआरएफमधील प्रवेश अन् प्रशिक्षण
एनडीआरएफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तुम्ही बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी आणि एसएसबी यांसारखे पॅरामिलिटरीचे जवान असणे आवश्यक आहे. यातून प्रतिनियुक्तीच्या माध्यमातून एनडीआरएफ जवानांची नियुक्ती केली जाते. या प्रतिनियुक्तीचा काळ ७ ते ९ वर्ष इतका असतो.
एनडीआरएफच्या जवानांना १९ आठवड्यांचे आंतरराष्ट्रीय स्तराचे प्रशिक्षण दिले जाते. ज्यात गिर्यारोहणासह अनेक साहसी प्रकाराचे प्रशिक्षण दिले जाते. यासह आपत्तीग्रस्तांचे प्राण वाचवणे, त्यांना सुरक्षित स्थळी नेणे, शक्य ती सर्व मदत देणे आणि त्यांच्या वैद्यकीय किंवा इतर गरजा पूर्ण करणे यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जाते.
एनडीआरएफ जवान कसे काम करतात?
एनडीआरएफ जवानांचे कार्य आपत्तीनंतरची परिस्थिती नियंत्रित करणे किंवा पीडितांना मदत करणे इतकेच मर्यादित नाही. ते आपत्तीपूर्वीचा धोक्याचा इशारा देण्यासाठी डिझास्टर अलर्ट सिस्टम विकसित करतात. हे जवान आपत्तीच्या काळात सरकारी यंत्रणेला मदत करतात. पोलीस, लष्कराचे कर्मचारी आणि सामाजिक संस्थांसोबत बचाव कार्यात सक्रिय सहभाग घेतात. संकटात अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यास मदत करतात. हे जवान राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य पातळीवरील राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) चे कर्मचारी आहेत, जे नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी प्रशंसनीय भूमिका बजावत आहेत. विविध नैसर्गिक आपत्तींची भीती निर्माण होताच, एनडीआरएफ संपूर्ण भारतभर मदत आणि बचाव कार्यासाठी आपली टीम तैनात करते, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांचे जीवन आणि मालमत्तेचे संरक्षण केले जाऊ शकते.
आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील नोकऱ्यांची संधी
आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रमानंतर सरकारी नोकरीत अनेक संधी उपलब्ध आहेत. केंद्र आणि राज्य सरकार अग्निशमन विभाग, पूर नियंत्रण, ड्रॉट मॅनेजमेंट, रेस्क्यू मॅनेजमेंट इत्यादींसाठी त्यांची नियुक्ती करते. याशिवाय आपत्कालीन सेवा, कायदा अंमलबजावणी, स्थानिक प्राधिकरण, मदत एजन्सी आणि युनायटेड नेशन्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत. खाजगी क्षेत्रातील खाणकाम, रसायन आणि पेट्रोलियम यांसारख्या उच्च जोखमीच्या उद्योगांमध्येही त्यांच्यासाठी संधी उपलब्ध होऊ शकतात. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन व्यावसायिक एखाद्या स्वयंसेवी संस्थेत सामील होऊन किंवा स्वतंत्रपणे सामाजिक कार्यकर्ता, पर्यावरण तज्ज्ञ किंवा स्वयंसेवक म्हणून करिअर सुरू करू शकतात.
आपत्ती व्यवस्थापनातील वेतन पॅकेज
डिझास्टर मॅनेजमेंटचा सर्टिफिकेट कोर्स केल्यानंतर सुरुवातीला महिन्याला २५ ते ३० हजार रुपये पगार सहज मिळू शकतो. पुढील अनुभवानुसार, पगार ५० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत वाढू शकतो. पदव्युत्तर अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला तीन ते चार लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले जाते. टॉप इन्स्टिट्यूटमधून कोर्स करणाऱ्यांना पाच ते सात लाख रुपयांचे पॅकेज मिळते. या क्षेत्रात खाजगी आणि आंतरराष्ट्रीय एजन्सी इंजिनियरिंग पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना वर्षाला १० ते १२ लाख रुपयांचे पॅकेज देतात.