नवोदय विद्यालय समिती ( NVS) (भारत सरकार, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अंतर्गत एक स्वायत्त संस्था) मार्फत जवाहर नवोदय विद्यालयांतील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता इयत्ता ६ वीमधील प्रवेशासाठी ‘जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट’ ( JNVST-२०२५) शनिवार दि. १८ जानेवारी २०२५ रोजी घेतली जाईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ नुसार ग्रामीण भागातील होतकरू मुला/ मुलींना गुणवत्तापूवर्ण दर्जेदार शिक्षण देण्याच्या हेतूने भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत नवोदय विद्यालय समिती मार्फत ‘जवाहर नवोदय विद्यालये (जेएन्व्ही)’ सुरू करण्यात आली. सध्या देशातील २७ राज्यांत आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ६५३ जवाहर नवोदय विद्यालये सुरू आहेत. (यात अजा/ अजची लोकसंख्या जास्त असलेल्या जिह्यांसाठी अधिकचे २० जेएनव्ही आणि ३ स्पेशल जेएनव्ही यांचा समावेश आहे.)
नवोदय विद्यालय समितीद्वारे जवाहर नवोदय विद्यालयांत ६ वी ते १२ वीपर्यंत सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) बोर्डाचा अभ्यासक्रम शिकविला जातो. आज देशभरातील जवाहर नवोदय विद्यालयांत एकूण १४ लाखांच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. देशभरातील ८ विभागांपैकी पुणे विभागांतर्गत महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांत, गुजरातमधील ३४ जिल्ह्यांत, गोव्यातील २ जिह्यांत, दादरा नगर हवेली व दमण आणि दिवमधील ३ जिल्ह्यांत जवाहर नवोदय विद्यालये आहेत. महाराष्ट्र (नंदूरबार) व गुजरात (दाहोद) मधील एका आदिवासी बहुल जिल्ह्यात प्रत्येकी १ स्पेशल जवाहर नवोदय विद्यालय स्थापन केले आहे.
हेही वाचा : गेमिंग फक्त टाईमपास नव्हे! इंजिनिअर्स, आयआयटी पदवीधरांपेक्षा जास्त कमवतायत गेमर्स
विशेषत्वाने दर्जेदार शिक्षणाकडे लक्ष दिल्याने २०२३-२४ साली जेएनव्हीमधील विद्यार्थ्यांनी केलेली देदीप्यमान कामगिरी –
(१) १२,०७१ विद्यार्थ्यांमधून जेईई (मेन्स) परीक्षेत ४,३५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
(२) ३,७९६ विद्यार्थ्यांमधून जेईई (अॅडव्हान्सड) परीक्षेत १,२२८ विद्यार्थी उत्तीर्ण.
(३) २४,५२९ विद्यार्थ्यांमधून एनईईटी-२०२४ परीक्षेत १९,१८३ उमेदवार यशस्वी झाले.
(४) CBSE बोर्ड परीक्षेचा २०२३-२४ चा निकाल – १० वी ९९.०९ टक्के; १२ वी ९८.९० टक्के
जवाहर नवोदय विद्यालयातील सन २०२५-२६ मधील इ. ६ वीतील प्रवेशासाठी पात्रतेच्या अटी – (१) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विद्यार्थी ५ वी इयत्तेत ज्या जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे त्या जिल्ह्याचा रहिवासी असावा आणि त्या जिह्यातील शासनमान्य शाळेत शिकत असावा. (२) ग्रामीण कोट्यातून प्रवेशासाठी विद्यार्थी इ. ३ री, ४ थी व ५ वीची परीक्षा शासन मान्यताप्राप्त ग्रामीण भागातील शाळेतून उत्तीर्ण झालेला असावा. (३) विद्यार्थ्याचा जन्म दि. १ मे २०१३ ते ३१ जुलै २०१५ दरम्यानचा असावा. (४) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पूर्वी ५ वी उत्तीर्ण झालेले उमेदवार आणि रिपीटर (पुन्हा बसलेले) प्रवेशास पात्र नाहीत.
प्रवेश क्षमता : प्रत्येक जवाहर नवोदय विद्यालयातील प्रत्येक वर्गाची प्रवेश क्षमता आहे ८०. यातील ७५ टक्के जागा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. उरलेल्या जागा त्या जिह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरल्या जातील. १/३ जागा मुलींसाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ इतर मागासवर्ग (केंद्रीय यादीमधील)/ दिव्यांग उमेदवारांना भारत सरकारच्या धोरणानुसार जागा राखीव आहेत.
जवाहर नवोदय विद्यालयामधील इ. ६ वीतील प्रवेशासाठी – सिलेक्शन टेस्ट (JNVST-२०२४) (लेखी परीक्षा) (शनिवार दि. १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११.३० ते १३.३० पर्यंत घेतली जाईल. विद्यार्थ्यांनी परीक्षेस ११.०० वाजेच्या आत हजर राहणे बंधनकारक आहे.) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे ८० प्रश्न, १०० गुण, कालावधी २ तास. दिव्यांग उमेदवारांना अतिरिक्त ४० मिनिटांचा कालावधी दिला जाईल. (१) मेंटल अॅबिलिटी टेस्ट (बुद्धिमत्ता चाचणी) – ४० प्रश्न, ५० गुण, वेळ ६० मिनिटे. (२) अॅरिथमॅटिक टेस्ट (अंकगणित) – २० प्रश्न, २५ गुण, वेळ ३० मिनिटे. (३) लँग्वेज टेस्ट – २० प्रश्न, २५ गुण, वेळ ३० मिनिटे. विद्यार्थ्यांना तीनही सेक्शनसाठी एकच प्रश्नपत्रिका दिली जाईल. प्रत्येक ३० मिनिटांनी बेल वाजविली जाईल. ओएमआर उत्तरपत्रिकेवर उत्तरे फक्त निळ्या किंवा काळ्या रंगाच्या बॉलपॉईंट पेनाने मार्क करावयाची आहेत. प्रत्येक बरोबर उत्तराला १.२५ गुण दिले जातील. चुकीच्या उत्तराला गुण वजा केले जाणार नाहीत. (लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अॅडमिट कार्ड पाहूनच प्रवेश दिला जाईल, जे त्यांना www. navodaya. gov. in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील.) कोणाही विद्यार्थ्याला दुसऱ्या वेळेला या सिलेक्शन टेस्टसाठी बसता येणार नाही.
हेही वाचा : मुलाखतीदरम्यान ‘या’ चार चुका कधीही करू नका; जाणून घ्या, त्या गोष्टी कोणत्या?
जेएनव्हीएसटी लेखी परीक्षेसाठी, NVS पुणे विभागातील विद्यार्थ्यांना परीक्षेचे माध्यम (भाषा) असेल.
(i) महाराष्ट्र राज्य – मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, उर्दू, गुजराती, बंगाली व तेलुगू.
(ii) गुजरात राज्य – गुजराती, मराठी, हिंदी व इंग्रजी.
(iii) गोवा राज्य – मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड.
(iv) दादरा नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेश – मराठी, गुजराती, हिंदी व इंग्रजी.
विद्यार्थ्यांनी यापैकी १ भाषा निवडायची आहे. त्यांना अर्जात नमूद केलेल्या भाषेमधील प्रश्नपत्रिका संच दिला जाईल.
तात्पुरत्या यादीत विद्यार्थ्याचे नाव आल्यास त्यांना प्रवेशाचे वेळी पुढील कागदपत्रे तपासणीसाठी सादर करावी लागतील. (१) जन्मतारखेचा पुरावा, (२) पात्रतेसाठीची प्रमाणपत्र, (३) विद्यार्थ्याला जर ग्रामीण कोट्यामधून प्रवेश हवा असल्यास पालकांना कॉम्पिटंट अॅथॉरिटीकडील विद्यार्थी ग्रामीण भागातील शाळेत ३ री, ४ थी व ५ वी शिकला आहे असे सर्टिफिकेट, (४) केंद्र सरकारने जारी केलेल्या नमुन्यातील रहिवास दाखला (Residence Certificate) (ज्या जिल्ह्यातील JNV मध्ये प्रवेश घेऊ इच्छितात.) (५) आधार कार्ड, (६) शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाने Study details असलेले सर्टिफिकेट, (७) मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, (८) Undertaking for Migration, (९) दिव्यांग दाखला (लागू असल्यास), (१०) अजा/ अज/ इमावसाठी दिलेल्या नमुन्यातील दाखला इ.
जेएनव्हीएसटी – २०२५ चा निकाल मार्च २०२५ पर्यंत जाहीर केला जाईल. जेएनव्हीएसटी २०२१-२२ इयत्ता ६ वीच्या प्रवेशासाठी २४,१७,००९ उमेदवारांनी अर्ज केले होते. परीक्षेसाठी बसलेले उमेदवार १३,९०,३२९. एकूण निवडलेले उमेदवार ४६,४३०.
जवाहर नवोदय विद्यालयांची वैशिष्ट्ये – (१) प्रत्येक जिल्ह्यात मुला/ मुलींना एकत्रित शिक्षण देणाऱ्या निवासी शाळा, (२) मुला/ मुलींसाठी वेगवेगळी हॉस्टेल सुविधा, (३) विनामूल्य शिक्षणाची/ राहण्याची/जेवणाची व्यवस्था, (४) क्रमिक पुस्तके, स्टेशनरी, युनिफॉर्म्स शासनामार्फत मोफत पुरविले जातात, (५) स्थलांतर योजने अंतर्गत सांस्कृतिक देवाणघेवाण (हिंदी भाषिक आणि अहिंदी भाषिक राज्यांतील विद्यार्थ्यांची), (६) स्पोर्ट्स आणि गेम्सना वाव दिला जातो, (७) एनसीसी/ स्काऊट्स अँड गाईड्स/एनएसएस, (८) प्रवेशासाठी कोणताही सामाजिक, आर्थिक निकष लावला जात नाही, (९) ८ वीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेत दिले जाते, त्यानंतर गणित व विज्ञान विषयांचे शिक्षण इंग्रजी भाषेतून दिले जाते व सोशल सायन्स विषय हिंदीतून शिकविला जातो, (१०) ६ वी ते १२ वीच्या वर्गात प्रत्येकी ८० जागा असतात, (११) इ. ६ वीतील प्रवेश सिलेक्शन टेस्टमधून केले जातात, (१२) इ. ९ वी आणि ११ वीच्या वर्गात जागा रिक्त असल्यास लॅटरल एन्ट्रीनुसार प्रवेश दिला जातो, (१३) ११ वीला विज्ञान (गणितासह), विज्ञान (गणिताशिवाय), कॉमर्स (गणितासह), कॉमर्स (गणिताशिवाय), आर्ट्स (ह्यूमॅनिटीज) आणि व्होकेशनल शाखांमधील अभ्यासक्रम शिकविले जातात.
नवोदय विद्यालय समिती, पुणे रिजन – १ला व २ रा मजला, BSNL टेलिफोन एक्स्चेंज बिल्डींग, पुना कॉलेजजवळ, भवानी पेठ, पुणे – ४११ ०४२. फोन नं. ०२०-२६४४३६८३, ई-मेल – nvsropunesqst @gmail. com
ऑनलाइन अर्ज https:// navodaya. gov. in या संकेतस्थळावरील दिलेल्या लिंकमधून करावेत. विद्यार्थी आणि पालक या दोघांची सही आणि आवश्यक प्रमाणपत्रे अर्ज करताना अपलोड करावी. अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे १६ सप्टेंबर २०२४.
महाराष्ट्र राज्यातील जवाहर नवोदय विद्यालये
(१) अहमदनगर – टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर, जि. अहमदनगर
(२) अक्कलकुवा – जि. नंदूरबार
(३) अमरावती – नवसारी, व्हीएम्व्ही रोड, जि. अमरावती
(४) औरंगाबाद, कन्नाड, जि. औरंगाबाद
(५) बीड – गढी, ता. जेवराई, जि. बीड
(६) बुलढाणा – शेगाव, पो. चिंचोली, जि. बुलढाणा
(७) चंद्रपूर – ता. लोढी बालापूर, जि. चंद्रपूर
(८) दिंडोरी – खेडगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक
(९) गडचिरोली – घोट, जि. गडचिरोली
(१०) गोंदिया – पो. नवेगाव, बांध, ता. अर्जुनी मोरेगाव, जि. गोंदिया
(११) हिंगोली – नॅशनल हायवे २२२, शासकीय आयटीआय, बसमत, जि. हिंगोली
(१२) जळगाव – पो. सेकगाव, भुसावळ, जि. जळगाव
(१३) कागल – कागल सानगाव रोड, कागल, जि. कोल्हापूर
(१४) लातूर – मांजरा साखर कारखाना, चिंचोली, जि. लातूर
(१५) माहुली – खवली, पो. क्षेत्र, माहुली, जि. सातारा
(१६) नांदेड – शंकरनगर, ता. बिलोली, जि. नांदेड
(१७) नवेगाव, खैरी – नवेगाव खैरी, ता. पारसौनी, जि. नागपूर
(१८) निझामपूर – निझामपूर, ता. माणगाव, जि. रायगड
(१९) उस्मानाबाद – तुळजापूर, जि. उस्मानाबाद
(२०) पिंपळ जगताप – पिंपळ जगताप, करांडी, ता. शिरूर, चाकण शिक्रापूर रोड, जि. पुणे
(२१) रत्नागिरी – पो. पाडावे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी
(२२) सांगली – पालूस, ता. पालूस, जि. सांगली
(२३) सोलापूर – पो. पोखरापूर, ता. मोहोल, जि. सोलापूर
(२४) पालघर, ठाणे – माहिम, ता. पालघर
(२५) वर्धा – सेलूकाटे, जि. वर्धा (२६) वाशिम – काटा रोड, जि. वाशिम
(२७) यवतमाळ, बेलोरा, ता. घटांजी, जि. यवतमाळ
(२८) जालना – अंबा परतूर, जि. जालना
(२९) सावरवाड, जि. सिंधुदुर्ग
(३०) बाभुळगाव, जि. अकोला,
(३१) माधवनगर, जि. भंडारा
(३२) माहेगाव, नाकाने, जि. धुळे
(३३) बालसा, जि. परभणी
(३४) देवमोगरा, जि. नंदूरबार.
शंकासमाधानासाठी हेल्प डेस्क नंबर ०१२०-२९७५७५४.
suhassitaram@yahoo.com