डॉ. श्रीराम गीत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मी सध्या बी.ए.ला आहे. नुकताच मागील महिन्यात बारावीचा निकाल लागला. त्यात मला कला शाखेमध्ये ९३.३ टक्के मिळाले. माझे दहावीपर्यंत सेमी माध्यम होते. दहावीमध्ये मला ९८.२० टक्के होते. माझे बी.ए. चे विषय राज्यशास्त्र, इतिहास व अर्थशास्त्र हे आहेत. मला आता बी.ए. बरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे. परंतु कोणत्या परीक्षेची तयारी करावी यात संभ्रम आहे. दोन्ही परीक्षेची एकत्रित तयारी करता येते का? तसेच यूपीएससी मराठीमध्ये देता येते का? योग्य मार्गदर्शन करून मार्ग सुचवावा. अंकिता बांगर.

तुझे मार्क उत्तम आहेत. बीए ला ते टिकवून जो विषय निवडशील त्यात विद्यापीठात पहिल्या तीनात येण्याचा प्रयत्न कर. पाचवी ते बारावीची सर्व विषयांची पुस्तके वाचण्यामध्ये एक वर्ष जाईल. त्यातून जनरल स्टडीज हा विषय पक्का होईल. रोज एक मराठी व एक इंग्रजी वृत्तपत्राचे वाचन व अग्रलेख वाचणे हीच सुरुवात राहील. ऑनलाइन क्लासेसचे खूळ डोक्यातून काढून टाकावे. येथे वर लिहिलेल्या सर्व गोष्टी हीच तुझी तयारी राहील. करियर वृत्तांतच्या वाचनातून यूपीएससीची काठीण्य पातळी हळूहळू तुला उलगडू शकेल. ती परीक्षा मराठीतून पण देता येते. सध्या एमपीएससीचे ध्येय समोर ठेवावे. वाटल्यास एम. ए. करत असताना यूपीएससी बद्दल विचार करावा. या सर्वा बद्दल घरच्यांना विश्वासात घेणे, त्यांचेही चर्चा करणे व त्यांचा आर्थिक पाठिंबा मिळवणे हे तू करशीलच.

माझं नाव कार्तिक आहे. माझे १९ वर्ष वय पूर्ण झालेला आहे. मला १० वी मध्ये ९४ टक्के, १२ मध्ये ९१ टक्के आहेत. मी १२ वी सायन्समधून झालोय. नीटची तयारी करण्याचे ठरवले. ११-१२ वी ला मनातून डॉक्टर होण्याची इच्छा नसल्याने फार जिद्दीने अभ्यास नाही केला. पुन्हा एमबीबीएससाठी मन लावून नीट दिली. पण या वेळेस पुन्हा काठावर मार्क पडले. या वेळेस पण नंबर नाही लागणार. बीएएमएस आणि व्हेटर्निटी हे दोनच पर्याय उरलेत. पण मला काय ठरवावे हे कळत नाही. मला १० वी पासूनच यूपीएससी करण्याचा निश्चय होता. डॉक्टर झाल्यावर तो करावा असा विचार होता. घरची परिस्थिती बरी आहे विशेष नाही. त्यामुळे करिअर बाबतीत विचार मी नेहमी आर्थिक सुरक्षेच्या विचारातून करतो पण मग तो विचार माझ्या आवडीशी जुळत नाही. तर मी यात काय निवडायला हवे?

कार्तिक आधी काय घडलं ते सगळं विसरून जा. आजच्या नीटच्या मार्कातून तुला काय मिळवायचं आहे त्याबद्दल विचार कर. तरच काही चांगल्या गोष्टी तुला मिळू शकतील याबद्दल शंका नाही. लोक काय सांगतात या ऐवजी त्या क्षेत्रात काय घडते याची नेमकी माहिती तू घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीस, असे मला वाटते. हा प्रयत्न खरेतर दोन पद्धतीत करावा लागतो. पास होऊन पाच सहा वर्षे झालेला बीएएमएस डॉक्टर व व्हेटर्नरी डॉक्टर यांना भेटल्यास त्यांना या दोन्ही क्षेत्रांमध्ये काय चालते याचे बरे वाईट अनुभव आलेले असतात त्यातून तुला बोध घेता येणे शक्य असते. समजा दोघांनीही वाईट मत सांगितले तर नवीन दोन माणसे शोधणे क्रमप्राप्त होते. हा प्रयत्न करायला अजून दहा दिवस तुझ्या हाती आहेत. प्रवेश प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. आता तुझ्या इच्छेनुसार तीन क्षेत्राबद्दलची माहिती तुला देतो. बीएएमएस किंवा व्हेटर्नरी पास झाल्यानंतर यूपीएससी देता येऊ शकेल. व्हेटर्नरी डॉक्टर असून आयएएस बनून सरकारी सेवेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून काम केलेले डॉक्टर म्हैसेकर यांचे आत्मचरित्रपर पुस्तक जरूर वाचावे. बीएएमएसअसून एमपीएससी निवड होऊन सेवा देणारी अनेक नावे कार्यरत आहेत. तो रस्ता पदवीनंतरचा आहे. आयुर्वेदातील पदवी घेतल्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनामध्येही तुला पदव्युत्तर पदवी घेता येते. व्हेटर्नरी डॉक्टर झाल्यानंतर खासगी पशुधनाच्या, कुक्कुट पालनाच्या मोठय़ा कारखान्यातून तुला नोकरीची शक्यता आहे. लॉचा विचार सध्या नको. वाटल्यास डॉक्टर झाल्यावर करू शकशील. मी तुला माहिती पुरवली आहे त्यातून विचार करून तुझा तुला निर्णय घ्यायचा आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Effective career counselling tips for career guidance career advice zws