बारावीनंतर ज्या विद्यार्थ्यांना आयआयटी, एनआयटी सारख्या संस्थांमधून इंजिनीअरिंग किंवा आर्किटेक्चर मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांना त्यासाठी जेईई मेन्स परीक्षा देणे आवश्यक आहे. या परीक्षेतील मार्कांद्वारे शॉर्ट लिस्ट केलेल्या विद्यार्थ्यांना आयआयटी प्रवेशासाठी आणखी एक परीक्षा द्यावी लागते ती म्हणजे जेईई एडव्हान्स्ड. मात्र नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) आणि ट्रीपल आयटी या राष्ट्रीय महाविद्यालयातील प्रवेश जेईई मेन्स परीक्षेच्या मार्कांवरच होतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आयआयटी, एनआयटी, ट्रीपल आयटी या संस्थांमध्ये प्रवेश हवा असेल त्यांना जेईई मेन्स परीक्षा देणे अनिवार्य आहे.
ही परीक्षा वर्षांतून दोन वेळा घेतली जाते, नुकतेच त्याचे वेळापत्रक एनटीएच्या संकेतस्थळावर जाहीर झाले आहे. यंदा पहिली परीक्षा २२ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ या दरम्यान होईल. या परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत २२ नोव्हेंबर २०२४ आहे. या परीक्षेचा निकाल १२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत लागेल. यंदाची दुसरी परीक्षा १ एप्रिल ते ८ एप्रिल २०२५ या दरम्यान होईल ज्यासाठी ३१ जानेवारी ते २४ फेब्रुवारी दरम्यान अर्ज करता येतील व या परीक्षेचा निकाल १७ एप्रिल २०२५ पर्यंत लागेल. विद्यार्थी या दोनपैकी कोणत्याही एका परीक्षेला बसू शकतात किंवा दोन्ही परीक्षांना बसू शकतात. दोन्ही परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे दोन्हीपैकी जास्ती असणारे मार्क पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जातात. इंजिनीअरिंग प्रवेशासाठी जेईई मेन्स मधील पेपर १ चे मार्क ग्राह्य धरले जातात तर आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग प्रवेशासाठी पेपर २ चे मार्क ग्राह्य धरले जातात. पेपर १ ची परीक्षा कॉम्प्युटरवर घेतली जाते ज्यात फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स या तीनही विषयांवर प्रत्येकी २५ प्रश्न असतात व प्रत्येक प्रश्नाला ४ गुण असतात. चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांनी हवेत बाण मारणे टाळावे. या तीनशे मार्कांच्या ७५ प्रश्नांच्या पेपरसाठी फक्त १८० मिनिटे उपलब्ध असतात हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी टाईम मॅनेजमेंट चा सराव करणे अत्यावश्यक आहे. आर्किटेक्चरसाठी पेपर २ असतो ज्यात तीन भाग असतात. पहिला भाग १०० मार्कांचा असतो ज्यात मॅथेमॅटिक्स विषयावर २५ प्रश्न असतात तर दुसरा भाग अॅप्टिट्यूड टेस्टचा २०० मार्कांचा असतो ज्यात ५० प्रश्न असतात. हे दोन्ही भाग कॉम्प्युटरवर सोडवावे लागतात. तिसरा भाग ड्रॉईंग टेस्टचा असतो ज्यात १०० मार्कांसाठी दोन प्रश्न ड्रॉईंग पेपरवर सोडवावे लागतात.
विद्यार्थ्यांनी जेईई मेन्सच्या जानेवारी परीक्षेसाठी जीव तोडून मेहनत घेतली तर त्यांना एप्रिल मध्ये ही परीक्षा दुसऱ्यांदा देण्याची वेळच येणार नाही आणि तो वाचलेला वेळ ते जेईई अॅडव्हान्स्ड, महाराष्ट्र सीईटी, बिटसॅट अशा परीक्षांच्या तयारीसाठी उपयोगात आणू शकतात. तसेच या पहिल्या परीक्षेत मार्क कमी पडले तर आत्मपरीक्षण करून एप्रिलमधील परीक्षा आणखी तयारीने देऊ शकतात.
आणखी एक महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील इंजिनीअरिंग कॉलेजमध्येच प्रवेश घ्यायची इच्छा असणारे अनेक विद्यार्थी जेईई मेन्स परीक्षा देणे टाळतात, कारण त्यांचा समज असतो की महाराष्ट्रातील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशासाठी महाराष्ट्राची सीईटी पुरेशी आहे. मात्र महाराष्ट्रातील सर्व विनाअनुदानित इंजिनीअरिंग महाविद्यालयातील १५ जागा या जेईई मेन्सच्या मार्कांवर भरल्या जातात. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील अनुदानित व शासकीय इंजिनीअरिंग कॉलेजेसमधील सुद्धा २० जागा जेईई मेन्सच्या मार्कांवर भरल्या जातात. हे लक्षात घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सीईटी बरोबरच जेईई मेन्स परीक्षा देणेही आवश्यक आहे.