डॉ श्रीराम गीत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझा मुलगा १२ वी विज्ञान शाखेतून बोर्डाची परीक्षा देत आहे. जेईई परीक्षेच्या पहिल्या सत्रामध्ये त्याला ९७.२१ पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. जेईई ॲडव्हान्स आणि आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट देणार आहे. प्रवेश घेऊन त्याने कोणते विषय निवडावेत? त्यानुसार कोणत्या संधी उपलब्ध असतील?

डॉ. स्नेहित

आपल्या मुलाचे पर्सेंटाईल चांगले आहेत. मात्र आयसरच्या प्रवेशासाठी ॲडव्हान्समधून पहिल्या १६९०० मध्ये येण्याची गरज आहे. अन्यथा बारावीच्या कोणत्याही बोर्डाच्या मार्काच्या शेवटच्या एक पर्सेंटाइलमध्ये असल्यास तो आयसरची ॲप्टिट्यूड टेस्ट देऊ शकतो व त्यातूनही त्याचा रस्ता सुरू होऊ शकतो. सध्या बारावीच्या परीक्षेवर त्यासाठी लक्ष केंद्रित करणे खूप गरजेचे आहे. त्या नंतर होणाऱ्या ॲडव्हान्स परीक्षेमध्ये यश मिळावे यासाठी शुभेच्छा. आता राहिला आपला प्रश्न आयसरमध्ये प्रवेश मिळाल्यास विषय कोणते निवडावेत? तिथे प्रवेश मिळाल्यास पहिली दोन वर्षे सर्व विषय सर्वांनाच शिकावे लागतात. त्यानंतरच्या तीन वर्षात आवडीचा विषय निवडता येतो. सहसा शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थी त्यावेळी निर्णय घेतात. थोडक्यात सांगायचे झाले तर फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झूलॉजी, गणित या साऱ्याचा प्राथमिक अभ्यास कोणत्याही विषयातील मूलभूत संशोधना करता गरजेचा असतो.

आपण मूलभूत संशोधनाकडे का वळत आहोत? यावर आपल्या मुलाने सखोल विचार प्रवेशापूर्वी करणे गरजेचे आहे. तेथून पाच वर्षे पूर्ण केलेल्या एखाद्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून याची माहिती तो सहज घेऊ शकतो. त्यासाठी ॲडव्हान्सची परीक्षा झाल्यावर पंधरा दिवस सहज हातात असतात त्यांचा सदुपयोग नक्की करावा.

हेही वाचा >>> UPSC-MPSC : भारतात कोणत्या आधारावर शेतीचे प्रकार पाडण्यात आले?

● मी यूपीएससीची २०२१ पासून तयारी करतोय. पण काही कौटुंबिक, वैयक्तिक कारणास्तव अभ्यासामध्ये सातत्य नाही राहत. माझी तीन शिफ्टमध्ये नोकरी असल्याकारणाने त्याचे नियोजन कशा पद्धतीने करू, याबाबत थोड मार्गदर्शन करा. मला महिन्यातून १२ दिवस सुट्टी असते. परीक्षा इंग्लिशमध्ये द्यायचं ठरवलेलं आहे, पण भाषेची थोडी अडचण येतेय. इंग्लिशच घ्यावं की मराठी घ्यावं थोडा संभ्रम आहे. इंग्रजी घेऊन यशाची टक्केवारी जास्त आहे त्यामुळं काय करावे? सेल्फ स्टडी बाबतही थोडे सांगा. – सूरज घोलप

आपली पदवी कोणती? नोकरीचे स्वरूप काय? आज वरच्या शैक्षणिक प्रवासातील मार्क किती? याबद्दल काहीही न लिहिता सर्व प्रश्न पाठवले आहेत. तयारी करतो आहे म्हणजे काय? त्याचे स्वरूप काय? क्लास लावला होता काय? याचाही उल्लेख नाही. या साऱ्यामुळे माझ्या उत्तराला खूप मर्यादा आहेत. माध्यम कोणचे यावर न अडकता पूर्व परीक्षेचा सखोल अभ्यास करायला सुरुवात करावीत. तो करत असताना मराठीतून वाचून जर उत्तरे इंग्रजीत लिहिता येत असतील तर अडचण येऊ नये. सवयीनुसार काही जणांचा मातृभाषेतून वाचनाचा वेग खूप जास्त असतो. त्याचा या पद्धतीत फायदा होऊ शकतो. शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असल्यास इंग्रजी माध्यम जास्त सोयीचे राहील. शिफ्ट ड्युटीचा व कामाचा बागुलबुवा न करता सुट्टीचे बारा दिवस वाचन व नोट्स काढणे याकरिता वापरावेत. या पद्धतीत एका वर्षात किमान दीडशे दिवस आपल्याला मिळतील. दर दिवशी सहा तासाचा अभ्यास केला तरी एक हजार तासापर्यंत आपला अभ्यास नक्की पोहोचू शकतो. यानंतरच परीक्षा देण्याचा विचार करावा म्हणजे आत्मविश्वास नक्की वाढेल. आपल्या हातात अजून बरीच वर्षे यूपीएस्सी मधून यश मिळवण्यासाठी आहेत.