डॉ श्रीराम गीत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

● मला १० वी ला ७९ टक्के गुण आहे. आणि १२ वी शास्त्र शाखेत ७४ टक्के गुण आहे. मला २०२५ ची कंबाईन करायची आहे. आता मी दुसऱ्या वर्षाला आहे. बीएमध्ये मी जनरल सगळे विषय घेतले आहेत. माझे वय २२ वर्ष आहे. आणि मी मराठी स्टेनो कोर्स करत आहे. मी ६० पास झालेले आहे आणि आता ६ महिन्यांनी मला ८० – १०० आणि १२० द्यायची आहे आणि त्याच्यासाठी पण मला वेळ द्यावा लागतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे दीड वर्षच आहे. घरची परिस्थिती खूप नाजूक आहे. मला शिक्षणासाठी नातेवाईक पैसे देत आहे. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यास कसा करावा हे मला कळत नाही आहे. कृपया करून मार्गदर्शन करावे – दिपाली चंडोल

एमपीएससी कम्बाईन २०२५ची द्यायची आहे व त्यात मला यश मिळवायचे आहे, या ऐवजी पहिला फोकस व सर्व ध्येय मला बीए उत्तम मार्काने होऊन पहिली नोकरी पटकवायची आहे यावर हवा. नोकरी करताना स्टेनो व टायपिंग इंग्रजी व मराठी यावर प्रभुत्व हवे. नोकरी करताना आर्थिक पाठबळ मिळेल. ज्याच्या जोरावर नंतरची तीन ते पाच वर्षात एमपीएससी मध्ये उत्तम यश मिळवून अपेक्षित पदापर्यंत पोहोचणे शक्य होईल. यावर विचार केल्यास मन शांत राहील. लवकर सुरुवात म्हणजे लवकर यश असे नसून परिपूर्ण सुरुवात ही यशाची पहिली पायरी असते. तिथेच बहुसंख्य स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांच्या गोंधळाला सुरुवात होते. कोणाच्या आर्थिक आधारावर अवलंबून राहून परीक्षा देण्याऐवजी स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभे राहिलेल्यांना यशाची शक्यता जास्त असते हा दुसरा महत्त्वाचा घटक आहे. नीट विचार कर.

हेही वाचा >>> नववी ते १२ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांची ओपन बुक परीक्षा होणार?CBSE यंदा नोव्हेंबरमध्ये करणार प्रयोग, काय बदलणार?

● मी आता तृतीय वर्षाला आहे. मला पुढील उच्च शिक्षण करण्याची इच्छा आहे, त्यासाठी कोणत्या परीक्षा असतात? त्यांची तयारी कशी? तसेच मला विदेशात ही एमए करण्यासाठी कशी संधी मिळेल? याबाबत ही आपण मला मार्गदर्शन करावे. ही नम्र विनंती.

धनश्री

मास्टर्ससाठी सर्व चांगल्या व उत्तम संस्थातील प्रवेश हे प्रवेश परीक्षेद्वारा होतात. सीयूईटी नावाची परीक्षा अखिल भारतीय पातळीवर घेतली जाणार आहे. त्याची माहिती सर्व वृत्तपत्रात व महाविद्यालयात आली आहे. पदवीचा तुझा विषय कळवलेला नाहीस. तसेच दहावी, बारावी व पदवीचे मार्कही लिहिलेले नाहीस. इयत्ता बारावीनंतर चार वर्षे पूर्ण केल्यानंतरच त्याला परदेशात पदवी समकक्ष समजले जाते. काही देशात एका वर्षात एमए करता येते असे सांगितले जाते. त्यानंतर तिथे नोकरी नाही व परत आल्यास काहीच मिळत नाही अशी अवस्था होऊ शकते. चांगल्या संस्थेतून मास्टर्स पूर्ण करून तुला जीआरई देऊन नंतर परदेशात नक्की जाता येईल.

● मी आत्ता एल.एल.बी.मध्ये शिकत आहे, मी आत्ता पहिल्या वर्षी आहे, मला एमपीएससी द्यायची खूप आवड आहे, मी एल.एल.बी. करत असतानी तो अभ्यास कसा करू? आणि कोणत्या पदासाठी प्रयत्न करू? कृपया मला मार्गदर्शन करावे. – रोहन

एमपीएससीची आवड आहे हे वाक्य जरा तपासून पहा. परीक्षेचे स्वरूप काय असते? त्यानंतर कोणती पदे मिळतात? याची परीक्षा देणाऱ्यांशी बोलून प्रथम सविस्तर माहिती घे. लॉचा अभ्यास हा व्यवसायिक व गंभीर अभ्यास आहे. तो करत असताना एमपीएससीचा अभ्यास सहसा करू नये असे माझे वैयक्तिक मत. निर्णय तूच सगळी माहिती घेतल्यानंतर घेणार आहेस.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expert answer on career advice questions career advice tips from expert zws 70