डॉ श्रीराम गीत
मी फार्मसी पदवी पूर्ण केल्यानंतर मास्टर्स करू इच्छिते. त्या मार्गाने मला फार्मामध्येच काम करावे लागेल. माझी इच्छा बँकांच्या परीक्षा देऊन त्यात यश मिळवावे अशी आहे. मात्र, मास्टर्स करत असताना बँकेच्या परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही असे लक्षात येते. माझ्या लग्ना बद्दलचा विचार घरात चालू असल्यामुळे हातातील उपलब्ध वेळात मी काय करावे या दुविधेत सापडले आहे. आपण काय सुचवाल?
– शरयू बारपात्रे
बँकांच्या परीक्षा देणे, या संदर्भात अभ्यासाचा आवाका समजून घेतला आहेस का? प्रोबेशनरी ऑफिसरची परीक्षा द्यायची आहे का क्लेरिकलची? सहकारी बँकांच्याही परीक्षा असतात. पुणे येथील नॅशनल बँकिंग स्कूलमधून एमबीए पूर्ण केले तर फायनान्समधील उत्तम करिअर सुरू होऊ शकते. त्याची माहिती घ्यावीस. बालेवाडी येथील इन्शुरन्स अकॅडमीमध्येही सुंदर अभ्यासक्रम आहेत. तुझ्या लग्नाचा उल्लेख केला आहेस म्हणून लिहीत आहे, बँकेच्या नोकरीतील बदल्यांचा नीट विचार करावा व त्याची माहिती घ्यावी. अनेकदा लग्नानंतर गाव सोडून बदली मिळत नाही म्हणून नोकरी सोडावी लागल्याची अनेक उदाहरणे माझ्या माहितीत आहेत. या उलट एम.फार्मा झाल्यास वयाच्या कोणत्याही टप्प्यावर फार्मा इंडस्ट्रीमध्ये नोकरीची उपलब्ध राहू शकते. जागे अभावी थोडक्यात विविध पर्याय लिहीत आहे त्याचा नीट विचार करावास. जमल्यास ती कामे करणाऱ्या मंडळींना भेटून माहिती घ्यावी.
● मी २०२२ मध्ये पीसीबी ग्रुप घेऊन ८८ गुणांनी पास झालो. ‘नीट’ला मागच्या वर्षाचा स्कोअर ३२६ असा आहे. याही वर्षी मी नीटची तयारी करीत आहे. पण बी प्लॅन कोणता असावा या बद्दल मनात गोंधळ आहे. सध्या तरी कोणतीही जबाबदारी नाही. या वर्षी मॅथ्स घेऊन पेपर दिलेला आहे. तरी मला मार्गदर्शन करावे, ही विनंती.
हेही वाचा >>> CBSE Result 2024: सीबीएसई बोर्डाचा दहावी बारावीचा निकाल कधी? वेबसाइट क्रॅश झाली, तर ‘येथे’ पाहा निकाल
– तिरुखे हर्षल तुझ्या निमित्ताने माझ्या गेल्या पंधरा वर्षातील अनुभवावर एक मुद्दा नोंदवत आहे. नीटची परीक्षा पुन्हा पुन्हा देणाऱ्यांच्या मार्का मध्ये दहा टक्क्यांची वाढ होऊ शकते. होतेच असं मात्र घडत नाही. त्यामुळे हाती आलेल्या मार्कातून काय काय उपलब्ध होते याचे मेनू कार्ड तुझ्यासमोर ठेवतो. आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी किंवा परदेशात जाऊन फक्त एमबीबीएसपर्यंत शिक्षण यातील एक रस्ता तुला निवडणे शक्य आहे. परदेशी शिक्षणाचा खर्च ३० लाखाच्या दरम्यान जाईल. गणित घेऊन पुन्हा परीक्षा दिली असली तरी इंजिनीअरिंगसाठीची सीईटी देणार आहेस का नाही याचा उल्लेख नाही. ती दिली असल्यास कोअर शाखेतील इंजिनीअरिंग साठीचा रस्ता तुला उपलब्ध आहे. नीट माहिती करून घेतल्यास फार्मसी पदवीही तू निवडू शकतोस. सायन्स शाखेतून तुझ्यासाठी उपलब्ध असलेले चांगले रस्ते सांगितले आहेत. सायन्स शाखेतून जाणारे अन्य रस्ते हे संशोधनाच्या वाटचालीची सुरुवात असते. तो रस्ता सहसा अजून बारा वर्षे संपता संपत नाही म्हणून त्याचा उल्लेख येथे करत नाही.