माझे बारावी सायन्स ६८ गुण घेऊन नुकतेच पूर्ण झाले. आयुष्यात पुढे काय करावे हे मला उलगडत नाही. काय केले तर पुढे समाधान, आनंद व करियर होईल याचा अंदाज लागत नाही मी पूर्ण गोंधळून गेली आहे. अशा अवस्थेत निर्णय कसा घ्यावा यावर मार्गदर्शन कराल काय?
– साएशा
काही न ठरवताच सायन्स शाखा घेतले तर तुझ्यासारखी अवस्था अनेकांची होते.सायन्स छान असते, घेऊन बघू, खूप स्कोप असतो, कुठेही जाता येते, सायन्स घेतले की मान ताठ राहते, दहावीला ७० टक्के पेक्षा जास्त मार्क पडले की सायन्सच घ्यावे अशा स्वरूपाच्या अनेक समजूतीतून या रस्त्याला वळणारी हजारो नाहीतर लाखो मुलेमुली असतात. काही प्रवाह पतीत होऊन मिळेल ते घेतात. पण समाधान हाती येत नाही. अशांची संख्या दिवसेंदिवस खूप वाढत आहे. मग पहिली पदवी घेतली तर, दुसरी विशेष आवडीच्या भलत्याच विषयात उडी मारून घेतली असेही घडू शकते. खरे तर सायन्स मधून इंजिनीयर, मेडिकल, पॅरामेडिकल, फार्मसी, आर्किटेक्ट, अॅग्रीकल्चर आणि शास्त्रज्ञ बनण्याचे रस्ते जातात. एक विचार तुझ्यासाठी मांडतो. शास्त्र विषय मनापासून आवडत असतील तर तुझ्या आवडीच्या कोणत्याही विषयातून तू बीएस्सी पूर्ण करावेस. सध्याचे टक्के टिकवणे हे मात्र गरजेचे राहील. त्यानंतर सामान्य पदवीधर म्हणून अनेक स्पर्धा परीक्षात तुला भाग घेता येणे सहज शक्य होते. शास्त्रीय विषय आवडत नसतील, कंटाळवाणे वाटत असतील किंवा कळत नसतील तर मात्र तो रस्ता सोडून द्यावा. विविध व्होकेशनल पदवीधर कोर्स आहेत. त्यांची चौकशी करून त्यात प्रवेश घेता येतो. एक वर्ष पूर्ण केल्यास सर्टिफिकेट, दुसरे पूर्ण केल्यास डिप्लोमा, तिसरे पूर्ण केल्यास पदवी अशी सुटसुटीत पद्धती अनेक संस्थांत उपलब्ध आहे. कॉस्मेटोलॉजी, ब्युटी वेलनेस, डाएट न्यूट्रिशन, योगा अँड फिटनेस, टुरिझम, इंटिरियर डिझाईन, ज्वेलरी डिझाईन, रिटेल मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अशातून सेवा क्षेत्रात तुझे पदार्पण होऊ शकते. चौकशी कर. त्या क्षेत्रात काम करणारी माणसे शोध. माझे खूप कन्फ्युजन आहे हा शब्द सोडून दे. कशाकशात कन्फ्युजन आहे असा विचार सुरू कर. हळूहळू समोरची वाट नक्की दिसू लागेल. शास्त्र विषयात अर्धवट, अपुरे गुण अशी अवस्था असलेल्या लाखोंसाठी सुद्धा हा रस्ता उपयुक्त ठरावा.
हेही वाचा >>> यूपीएससी सूत्र : ‘अग्निबाण’चे यशस्वी प्रक्षेपण अन् आरोग्य विम्यांच्या नियमातील बदल, वाचा सविस्तर…
या वर्षी मी १२वी ची परीक्षा दिली. पीसीएमबी घेऊन पुढे फूड टेक्नॉलॉजी करायची इच्छा आहे. या क्षेत्रात नोकरीची संधी किती आहे आणि सीईटी च्या गुणांवर वर कोणते सरकारी कॉलेज आहेत आणि खासगी कॉलेजचे नाव सांगावेत. – सुरभी
डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन तर्फे नोटिफिकेशन येईल त्यावेळेला महाराष्ट्रातील सर्व फूड टेक्नॉलॉजीच्या कॉलेजची यादी उपलब्ध होईल. सरकारी, खासगी यांची यादीत नावे असतात. काही नवीन कॉलेज दरवर्षी यात सामील होतात. सीईटीतील गुणानुसार प्रवेश मिळेल. तो निकाल येणार आहे. शंभर गुण पुरे होतील असा अंदाज. फूड टेक्नॉलॉजीतून पास होऊन काम करणाऱ्या, तीन वर्षे काम झालेल्या मुला मुलींना भेटून माहिती घेतल्याशिवाय प्रवेश घेऊ नये. या क्षेत्रात अनुभवानंतर संधी उपलब्ध होतात. तो उमेदवारीचा काळ खूप मोठा असू शकतो. अर्थातच पहिल्या दिवशी फार मोठे पॅकेज मिळते असे नाही. काहीतरी वेगळे शोधले आहे अशा पद्धतीत या अभ्यासक्रमाकडे पाहणारे तुझ्यासारखे अनेक जण आहेत. वास्तव वेगळेच आहे. कोणत्याही जुन्या वा नामवंत संस्थेने हा अभ्यासक्रम सुरू केलेला नाही ही बाब सुद्धा लक्षात घेण्याजोगी आहे. मात्र, उमेदवारी व्यवस्थित पार पाडली तर या क्षेत्रात मागणी व प्रगती दोन्ही होत जाते.